एक अविस्मरणीय दिवस

0
2322

– श्रुती पार्सेकर
(नानोडा डिचोली)

आजीआजोबांसोबत केक कापला. त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या मायेच्या स्पर्शाने मला अगदी भरून आले. हा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरला.
वृद्धत्व म्हणजे जणू दुसरे बालपणच… ते सुखाचे आणि समाधानाचे व्हावे, आयुष्याची संध्याकाळ रमणीय व्हावी या सद्हेतूने या संस्थेची स्थापना झाली.

यंदाचा जून महिना माझ्यासाठी खूप आठवणींना उजाळा घेऊन आला होता. मला ११ जूनला पंचवीस वर्ष पूर्ण होणार याच आनंदात मी होते. गेल्या पंचवीस वर्षात माझ्या आयुष्यात खूप आनंदाचे तसेच काही दुःखाचे प्रसंग येऊन गेले. माझ्या आईवडिलांनी माझ्यावर एवढे प्रेम केले की मला वाटते असे आईबाबा सगळ्या मुलांना मिळावे. पंचविसावा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करावा असे घरातली सगळी मंडळी बोलत होती. मलापण वाटत होते माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलावून पार्टी करावी. पण मी ठरवले होते यंदाच्या वाढदिवसाला माझ्या आनंदात वृद्धाश्रमातल्या आजीआजोबांना सामील करून घ्यायचे, तसे मी आई बाबाना सांगितले होते. त्यांनाही माझी कल्पना खूप आवडली. आम्ही ११ जूनला राधानगर डिचोली येथे संत गाडगेबाबा छत्रछाया वृद्धाश्रमाला भेट देण्याचे ठरवले. तेथील अध्यक्षांना फोन करून आम्ही कळवले. त्यांनासुद्धा आनंद झाला आणि आम्हांला येण्याची परवानगी दिली. कधी एकदा तो दिवस येतो असे मला झाले होते आणि शेवटी तो दिवस उजाडला.

सकाळी आम्ही वृद्धाश्रमात जायला गाडीत बसलो. मनात असंख्य प्रश्‍न येत होते. म्हातार्‍या आई-वडिलांची अडगळ भासतेय किंवा बायकोच्या आहारी गेल्यामुळे मुले त्यांना वृद्धाश्रमात सोडून जातात… असे चित्र पूर्वीच्या चित्रपटांमध्ये दिसायचे! हे खरं असेल का?
मुलगा आणि सून दोघेही नोकरदार. घरात बोलायला कोणी नाही. दमून भागून कामावरून आलेला मुलगा आणि सुनेसोबत रात्री जेवण्यापुरताच संवाद. निवृत्तीनंतर एकाकी वाटू लागले असावे. पण मार्ग निघत नव्हते. अखेर मुलगा आणि सुनेला सांगून त्यांनी स्वतःचा मार्ग निवडला असेल. नाइलाजास्तव ते वृद्धाश्रमात आले असावे का? आणि तेथे समवयस्कांसमवेत एकाकीपणा संपल्याचे समाधान त्यांना लाभले असावे का?
बदलत्या काळात, बदलत्या कुटुंबव्यवस्थेमुळे वृद्धाश्रमांच्या दिशेने पावले पडण्याच्या कारणांमध्येही बदल झाला आहे. त्यामुळे वृद्धाश्रमात दाखल होणार्‍या ज्येष्ठांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे का? एक ना अनेक प्रश्‍न मनात येत होते, त्या विचारांच्या धुंदीत कधी आम्ही तिथे पोचलो हे कळलेच नाही.

राधानगर डिचोली येथे संत गाडगेबाबा छत्रछाया वृद्धाश्रमाच्या इमारतीसमोर आम्ही सगळे उभे होतो. तेथील शांतता आजूबाजूचा परिसर पाहून सगळ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. आम्ही आत गेलो, तिथे आमचे प्रसन्न चेहर्‍यांनी सगळ्या मंडळींनी स्वागत केले. सगळ्यांनी एकत्र बसून गप्पागोष्टी केल्या. आजी आजोबांशी बोलल्यावर मला माझ्या मनात येणार्‍या काही प्रश्‍नांची उत्तरे मिळाली.

आजीआजोबांसोबत केक कापला. त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या मायेच्या स्पर्शाने मला अगदी भरून आले. हा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरला.
संत गाडगेबाबा छत्रछाया वृद्धाश्रम खासदार निधीतून उभारण्यात आलेला असून उर्वरित खर्च संस्थेमार्फत करण्यात आला आहे. ज्येष्ठांना आधार देण्यासाठी व त्यांची उतारवयात योग्य काळजी घेण्यासाठी चालू असलेली सेवा खूप उत्तम आहे. या संस्थेमध्ये ज्या कुटुंबीयांना ज्येष्ठांची सेवा करण्यासाठी अडचणी उद्भवतात त्यांना या माध्यमातून मदत करण्यासाठी चालू असलेली ही सेवा पाहून आमच्या कुटुंबाला खूप आनंद झाला. येथील टापटीप व देखभाल उत्तम दर्जाची असून सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. येथील कर्मचारी, डॉक्टर व इतर मंडळीतर्फे ज्येष्ठांची सेवा मनोभावे केली जाते.

वृद्धत्व म्हणजे जणू दुसरे बालपणच… ते सुखाचे आणि समाधानाचे व्हावे, आयुष्याची संध्याकाळ रमणीय व्हावी या सद्हेतूने या संस्थेची स्थापना १५ एप्रिल २०१८ रोजी झाली. संस्थेचे अध्यक्ष विष्णू बांदेकर, आनंद खांडेपारकर, लक्ष्मीकांत सुर्लीकर आणि आईशा शिरोडकर यांची मी मनापासून खूप आभारी आहे. त्यांनी आमच्या कुटुंबाला संस्थेला भेटण्याची संधी दिल्यामुळे या सगळ्या आजीआजोबांसोबत माझा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला.