एकत्र कुटुंब ः संस्कारांंची पाठशाळा

0
289
  • सौ. माधुरी रं. शे. उसगावकर

कुटुंब म्हणजे आपुलकी, ममत्व. एकमेकांचा हात पकडून समतोल साधून पुढे जाणे. सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही, पण आनंदाने जे काही कराल त्यात नक्कीच आनंद मिळेल.

दुपारची वेळ. दोन-अडीच वाजले असतील. एवढ्यात ॐ नमः शिवाय… रिंगटोन वाजली.
‘हॅलो!’
‘अगं, तू कशी आहेस? हल्ली बाल्कनीत पण दिसत नाहीस. तब्येत बरी आहे ना?’
‘आहे गं बरी. तू कशी आहेस?’
‘मला काय धाड भरलीय? मी आहे मस्त. हे बघ, आज सकाळी मी तुला रौनकबरोबर चिंतातूर चेहर्‍याने गाडीत बसताना पाहिलं. बरं वाटत नाही का तुला?’
‘जरा ताप येतो व थकवा जाणवतो. म्हटलं टेस्ट करून घेऊ. नंतर पश्‍चात्ताप व्हायला नको. कोरोनाचा उद्रेक चालला आहे ना!’
‘काळजी घे गं. विश्रांती घे.’
‘हो गं घेईन.’ असं म्हणून मी मोबाईल ठेवला.
खरंच, किती आत्मियतेने शेजारची सुचिता विचारपूस करत होती.
तिन्हीसांजेच्या वेळी ती पोळीभाजीचा डबा घेऊन आली. माझे डोळे पाणावले. कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत माणूसकीला जागणारी माणसे पाहून जगण्यातील आत्मविश्‍वास वाढतो आणि वाटतं खरंच, आयुष्य किती सुंदर आहे. घराला घरपण देणार्‍यांची साथ असताना दुःखाच्या सावटाला का घाबरावे?
आमची संकुल म्हणजे छोटी छोटी विभक्त कुटुंबांची एकत्र कुटुंबपद्धतीच. कौटुंबीक ओलावा असणारी आधुनिक एकत्र कुटुंबपद्धती.
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत कितीतरी माणसं एकाच घरात एकोप्याने राहत. कुणाला काही गैर वाटत नसे. मुलांसाठी स्वतंत्र खोल्या नव्हत्या की अभ्यासिका नव्हत्या. सगळे एकमेकांत मिसळून एकमेकांना साह्य करीत एकमेकांत मिळून मिसळून मनं जोडण्यात धन्यता मानायचे. घर प्रत्येकाला मुक्त वाटायचं, अगदी खुल्या मनाप्रमाणे. बंधन तर अजिबात वाटत नसे. कुटुंब म्हणजे ताप नसून संस्कारांची पाठशाळाच असायची. सुसंस्कृत नागरिक बनायला संस्काराची जोड असावीच लागते.

एकत्र कुटुंब हे सुखी संसाराचे द्योतक समजले जायचे. एकत्र कुटुंबात आजी-आजोबा, काका-काकी, वडिलधार्‍यांचे मुलांवर संस्कार होतात. पालकांची निम्मी जबाबदारी परिवारातील माणसंच निभावत त्यामुळे प्रत्येकात कुटुंबीयांविषयी आत्मीयतेची भावना वृद्धिंगत व्हायची. जाणत्यांकडून लहानांना शिकवण मिळायची. त्यातून त्यांना ज्ञान मिळे हे ज्ञान म्हणजेच संस्कार. संस्कार म्हणजे चांगल्या सवयी अंगिकारणे, कुटुंबात सर्वांबरोबर सातत्याने मुलांत संस्काराची रुजवण सहज साध्य होते.

त्यासाठी कुटुंबियांना त्याग, सेवा, तडजोड करावी लागते. यातून माणूस परिपक्व होतो. विश्‍वासाने विश्‍वास वाढतो व कौटुंबीक नात्यांची वीण घट्ट होते. अन्यथा ‘आपले तेच खरे’ असे तुणतुणे वाजवत सत्तेच्या नावावर ढिंढोरा पिटून काय उपयोग? कर्त्याने आपले योग्य म्हणणे सदस्यांना पटवून देण्यात गैरसमज मिटतात. त्यासाठी कुटुंबप्रमुखाचा जबाबदारपणा, कुशाग्र बुद्धी उपयोगात येते. बर्‍या-वाईट परिस्थितीवर सर्वानुमते योग्य तोडगा कसा काढावा आणि तोही कुटुंबियांची मदत घेऊन हे कुटुंबप्रमुख ताळमेळ साधून करायचा.

संकटं कोणावर आली नाहीत? साक्षात देव-देवतांचीसुद्धा सुटका झाली नाही असे पुराणात नमूद आहे. परंतु संकटांना धीरोदत्तपणे सामोरे जाणे हे तत्सम व्यक्तीला पारिवारीक सहकार्याने मानसिक बळ मिळतं. एकट्याचं दुःख हे एकट्याचंच राहत नाही. सगळे दुःख वाटून घेतात. दुःखात सुखाचा सूर मिळवतात. मग ते दुःख, दुःख राहत नाही. आनंदाने घर भरतं. आपसात विवाद न होता संवाद साधतात. पैशांपेक्षा नात्याला जास्त महत्त्व दिलं जातं. तत्कालीन वाडवडील माणसं अशिक्षित पण, संस्कारीत असायची. ज्येष्ठांचं मार्गदर्शन कुटुंबीय श्रेष्ठ मानायचे.
नंतर पुढे हळूहळू नोकरी-व्यवसायानिमित्त स्थलांतर होत गेलं.

कमावणार्‍यांची संख्या वाढली. आपल्या त्रिकोणी-चौकोनी कुटुंबाकरिता मूळ गावातून शहरात भरणा वाढला आणि विभक्त कुटुंबांची संख्या वाढत गेली. काही कायमचे शहरात, परदेशी स्थायिक झाले. संयुक्त परिवारातून विभक्त परिवाराला व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळालं. परंतु पालकांची जबाबदारी वाढली. मुलभूत संस्कारांना फाटा बसला. अर्थार्जन समाधानकारक होतं. मुलांचे कोडकौतुक, चोचले पुरविले जातात. शैक्षणिक प्रगती झपाट्याने होत आहे. मुलांच्या आई-वडिलांना नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर जावं लागतं आणि मुलांची होते दाई हीच आई. परिस्थितीनुसार पालक पाळणाघराचा आश्रय घेतात. अशा वातावरणात मूलं वाढतात. पालकांकडे काही इलाज नसतो, तर कधी ते यातच आनंद, सुख शोधतात. बहुतांशी वडिलधारी मूळ घर, गाव सोडायला तयार नसतात. त्यांना शहरात करमत नसेल किंवा त्यांची तिथे व्यवस्था होईलच हेही सांगता येत नाही.

अर्थार्जन हे एक कारण विभक्त कुटुंबासाठी आहे हे नाकारता येत नाही. आधुनिक यांत्रिक युगात एकट्याच्या कमाईने घर-संसार चालवताना नाकी नऊ येतात हेही खरं. त्यामुळे दोघांना आर्थिक भार उचलावा लागतो.

पालकांचे मुलांच्या सर्वांगिण प्रगतीवर योगदान असावंच लागतं. मुख्यत्वे नैतीक मुल्ये. मुलांचे पालक संयुक्त कुटुंबातील असतात. त्यामुळे सुविचारांची, संस्कारांची रुजवण मुलांच्या मनात होईलच असे गृहित धरले जाते.

आजकाल पाश्‍चात्य संस्कृतीचं अंधानुकरण केलं जात आहे. जे उत्तम, उदात्त आहे ते अवश्य स्वीकारावं. असं म्हणतात की कालमान- परिस्थितीनुसार जे बदलतील ते टिकतील. काळाप्रमाणे माणसानं जरूर बदलावं. पण कसं, केव्हा हे ज्याच्या त्याच्या मनोवृत्तीवर अवलंबून असतं. उदा. पाश्‍चात्य पद्धतीनुसार पोशाख, वयानुसार आपली भुमिका विचारात घेऊन पोषाखाचा विचार करणे हितकारक ठरेल ना! पण नको तिथं अंगप्रदर्शन करणारे विदेशी पोषाख मुलांनी, महिलांनी टाळलेले बरे. अत्याचारास का उद्युक्त करावे? मुलांना अवास्तवतेकडे का प्रवृत्त करावे? यावर सारासार विचार करून आपले मत ठरवावे. त्याचप्रमाणे सुपाच्य आहार, मनोरंजनाचे कार्यक्रम, वागण्यात शालीनता असणे ही भारतीय संस्कृती आहे.

आज स्त्री अबला, अशिक्षित राहिलेली नाही, हे स्तुत्य आहे. प्रत्येक गोष्ट पडताळून पहावी व आपल्याला रुचेल, पटेल, झेपेल तरच अंगिकारावी. मग ते अंधानुकरण होऊच शकत नाही. फक्त डोळ्यांनी पाहणे काही विशेष नाही. दृष्टी असणं महत्त्वाचं. त्यामुळे चांगलं वाईट पारखता येतं.
तसं पाहिलं तर संयुक्त कुटुंबपद्धतीतही फायद्याबरोबर तोटेही असतातच. संयुक्त पद्धतीत सगळेच कर्तव्यतत्पर असतात असे नाही. एखाद-दुसरा आळशी असतो. त्याचं आपलं आरामात चाललेलं असतं. ‘कुणी निंदा, कुणी वंदा स्वहिताचा धंदा’ या उक्तीनुसार. लग्न झालं, मूलं झाली तरी संसाराची जबाबदारी सोयीस्करपणे झटकून टाकायची. कुटुंबप्रमुख जबाबदारी घेत आहे असं म्हणत कानाडोळा करायचा. कर्तव्यात कुचराई करायची. आता जेष्ठांना तरी किती जबाबदार धरावं? त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत एकत्र कुटुंबाची जबाबदारी पेलतच अखेरचा श्‍वास सोडावा का? हा भेडसावणारा प्रश्‍न उपजतोच.

अगदी परवाचा मेसेज. माझ्या सखीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बहिणीने सखीच्या परिवाराचा सुंदर एकत्र फोटो मोबाईलवर पाठवला व सोबत खाली मॅसेज – ‘लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! आपलं एकत्र कुटुंब बघून फार बरं वाटतं.’ मेसेज वाचला. तिला कृतकृत्य झाल्याचं समाधान मिळालं. पण त्यामागेच आसुडाचे वळ उमटलेलेही जाणवले.

‘‘फुलं ओवता ओवता धागा कसा कुमकुवत होतो, हे धाग्यालाच माहीत असतं. फुलं मस्त मजेत असतात. त्या पुष्पहारातील धाग्याप्रमाणे कुटुंबातील ज्येष्ठांची अवस्था होते याची जाण त्या विहिणबाईला कशी येईल म्हणा! यह तो अंदर की बात!’’ सहजच ती मनातलं बोलून गेली.
आजच्या बदलत्या काळात ज्येष्ठांना सगळं निभावताना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. कुटुंबप्रमुख जबाबदारी घेतो म्हणून मुलं, सुना जबाबदारी स्वीकारतातच असं नाही. किंबहुना ती गाफील राहतात. कारण त्यांना ती आपली जबाबदारी वाटत नसते. त्यामुळे ज्येष्ठांना तणाव आला तर त्यातून मार्ग काढता काढता किती दमछाक होते हे सांगता सोय नाही. असेही अनुभव आजकाल समजल्या जाणार्‍या एकत्र कुटुंबपद्धतीत येतात.

एकत्र कुटुंब व विभक्त दोन्ही संस्कारयुक्त असतात. काही नियमावली आचरणात आणली तर दुग्धशर्करायोग म्हणावा. चोवीस तास घरात असलेल्या गृहीणीला व नोकरी करणार्‍या स्त्रीला कुटुंबात समान दर्जा दिला जावा. अर्थार्जन जेवढे महत्त्वाचे तेवढंच घरात राहून घरच्या बाबतीत योगदान देणे त्याहीपेक्षा महत्त्वाचे असे मी म्हणेन. सर्वांचं आरोग्य सांभाळणारी गृहिणी, रसना तृप्त करणारी म्हणजे अन्नपूर्णा. घरातल्या लहान थोर कुटुंबीयांच्या सेवेत वेळ घालवणारी काळजीवाहू. कोणी श्रेष्ठ नाही की कनिष्ठ नाही.

स्वयंपाकघर, बाजारहाट, बिलं भरणं, मुलांचा अभ्यास इत्यादीत परिवारातील सदस्यांनी आळीपाळीने लक्ष दिले तर तक्रारीचा सूर निपटून टाकला जातो. विभक्त कुटुंबात पती पत्नी दोघांनी घरकामात सहकार्य दिल्याने भार हलका होतो. टीव्ही, मोबाईलच्या आहारी न जाता एकमेकांशी संवाद साधला जावा. कुटुंब आनंदी ठेवायचं असेल तर ‘वादा’चा त्याग केला पाहिजे. वाद सोडला तर नाते टिकते.

घराला घरपण देणारी माणसं कुटुंबाचा भरभक्कम आधार असतात. घराला सरपण देणारी माणसे नव्हे. शेवटी कुटुंब म्हणजे आपुलकी, ममत्व. एकमेकांचा हात पकडून समतोल साधून पुढे जाणे. सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही, पण आनंदाने जे काही कराल त्यात नक्कीच आनंद मिळेल.