एंडोमेट्रिओसिस ः स्त्रियांसाठी त्रासदायक

0
4
  • डॉ. मनाली महेश पवार

मागील काही दिवसांत तिशी-चाळिशीतल्या महिला पाळीच्या तक्रारी घेऊन येत होत्या. काहींना पाळीच्या दरम्यान ओटीपोटीत व कंबरेत तीव्र वेदना जाणवत होत्या. पाळीत रक्तस्राव खूप किंवा स्पोटिंग, त्याचबरोबर थकवा, बद्धकोष्ठता, कधी अतिसार, निद्रानाश किंवा अतिनिद्रा अशाच प्रकारची लक्षणे साधारण सगळ्या रुग्णांमध्ये होती. अशा महिलांची सोनोग्राफी केल्यावर लक्षात आलं की त्या ‘एंडोमेट्रिओसिस’च्या शिकार आहेत.

कधीकधी दवाखान्यात एखादा दिवस असा येतो की साथ आल्यासारखे एकाच प्रकारचे रुग्ण यायला लागतात, तेव्हा मन थोडेसे धास्तावते. हे काय चाललंय? का चाललंय? कुठं चुकतंय? असे अनेक प्रश्न मनात येतात व वाटतं, येथे आरोग्याबाबत जागृती व्हायला हवी. मागील काही दिवसांत तिशी-चाळिशीतल्या महिला पाळीच्या तक्रारी घेऊन येत होत्या. काहींना पाळीच्या दरम्यान ओटीपोटीत व कंबरेत तीव्र वेदना जाणवत होत्या. पाळीत रक्तस्राव खूप किंवा स्पोटिंग, त्याचबरोबर थकवा, बद्धकोष्ठता, कधी अतिसार, निद्रानाश किंवा अतिनिद्रा अशाच प्रकारची लक्षणे साधारण सगळ्या रुग्णांमध्ये होती. आणि या बायका काय त्रास झाला आणि लगेच आल्या असे होत नाही. सगळ्या महिला क्षमतेपेक्षा जास्त सोसणार, नंतर अंगावर बेततंय असं दिसलं की डॉक्टरकडे येणार. अशा महिलांची सोनोग्राफी केल्यावर लक्षात आलं की त्या ‘एंडोमेट्रिओसिस’च्या शिकार आहेत. कारण साधारण महिनाभर औषधे घेऊन यश मिळत नव्हतं. म्हणून प्रथम ‘एंडोमेट्रिओसिस’ म्हणजे काय हे जाणून घेऊ.

‘एंडोमेट्रिओसिस’ म्हणजे काय?
‘एंडोमेट्रिओसिस’ म्हणजे गर्भाशयातील एन्डोमेट्रिअम अस्तरासारख्या ऊती गर्भाशय व गर्भाशयाच्या बाहेर आणि शरीराच्या इतर भागात वाढतात, जिथे खरेतर त्या ऊतींचा काहीही संबंध नसतो. बहुतेकदा या ऊती अंडाशय, फॅलोपियन ट्यूब, गर्भाशयाच्या आत, गर्भाशयाचा बाह्य पृष्ठभाग, योनी, गर्भाशय, ग्रीवा, मूत्राशय किंवा गुदाशय या ठिकाणी वाढू शकतात.

‘एंडोमेट्रिओसिस’ची लक्षणे

  • वेदना हे सर्वात सामान्य लक्षण आहे. या वेदना अनेक प्रकारच्या असतात. मासिकपाळीच्या वेळी पोटात वेदनादायक पेटके येतात व कालांतराने वाढून असह्य होतात.
  • कंबर व ओटीपोटीत असह्य वेदना व त्याही दीर्घकालीन.
  • संभोग करताना किंवा नंतर असह्य वेदना.
  • आतड्यासंबंधी वेदना.
  • मासिकपाळीच्या दरम्यान लघवी करताना वेदनादायक आतड्यांची हालचाल.
  • मासिकपाळीच्या दरम्यान अतिरक्तस्राव किंवा स्पॉटिंग. रक्तस्राव दीर्घकाल चालू राहू शकतो. कोणत्याच औषधोपचाराने बंद होत नाही.
  • वंधत्व हेही लक्षण ‘एंडोमेट्रिओसिस’चा त्रास असणाऱ्या महिलांमध्ये दिसून येतो.
  • पचनाच्या समस्या. यामध्ये अतिसार, बद्धकोष्ठता, पोटफुगी, मळमळ यांसारखी लक्षणे विशेषतः मासिकपाळीच्या दरम्यान दिसून येतात.
  • जेव्हा या ऊती अंडाशयात वाढतात तेव्हा फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक होतात व अंडाशयात अडकलेले रक्त सिस्ट तयार करू शकते. जळजळ, सूज, चिकटपणा निर्माण होतो.

आधुनिक उपचारांमध्ये हार्मोनल थेरपी व शस्त्रक्रियांचा समावेश आहे. वेदनास्थापनासाठी वेदनाशामक गोळ्या, इंजेक्शनचा वापर केला जातो. यामध्ये मूळ समस्या सुटत नाही व कधीकधी इतर साईड इफेक्ट निर्माण होतात. म्हणून बऱ्याच महिला रुग्ण आयुर्वेदिक औषधोपचारांकडे वळतात.
आयुर्वेदानुसार ‘एंडोमेट्रिओसिस’ ही प्रामुख्याने पेशींच्या वाढत्या संचयनामुळे आणि ट्यूमरप्रमाणे वाढणारी म्हणजे कफदोषाची समस्या आहे. रक्त, हार्मोन्स, मासिकपाळी, तसेच रोगाच्या दाहक स्वरूपामुळे पित्ताची समस्या असू शकते. तसेच ‘एंडोमेट्रिओसिस’चे वेदनादायक स्वरूप वाताला केंद्रस्थानी ठेवते. मासिकपाळीच्या खालच्या दिशेने हालचालींमध्ये अपानवायूचा सहभाग आणि रक्ताभिसरणात वाताचा सहभाग असतो. गर्भाशयातील एंडोमेट्रिअल पेशींचे त्यांच्या मूळ स्थानापासून बाहेरील ठिकाणी विस्तापन हे अपानवायूचे असंतुलन दर्शविते. म्हणजे ‘एंडोमेट्रिओसिस’ ही एक त्रिदोष विकृतीजन्य स्थिती आहे, ज्यांमध्ये तीनही दोषांचा समावेश आहे. फक्त प्रत्येकाचे प्रमाण प्रत्येक रुग्णानुसार काही प्रमाणात बदलू शकते. म्हणजेच अपानवायू विकृत होऊन पित्त (रक्त) धरून ठेवतो आणि त्याला वर आणि आजूबाजूला हलवितो. पित्तविकृतीनंतर प्रचंड रक्तस्राव व जळजळ होते. हे पित्तविकृतीकरण एक चिडचिड निर्माण करते, ज्यामुळे कफ चिडलेल्या भागात आच्छादन करून आराम देण्यासाठी आत प्रवेश करतो. कफाच्या प्रभावाने नंतर पेशींचा संचय आणि अतिवृद्धी होते. अशा प्रकारे रोगाचे सान्निपातिक स्वरूप दिसून येते.
आयुर्वेदशास्त्रात ‘एंडोमेट्रिओसिस’ या आजाराचे वर्णन तशाच तसे आढळत नाही. पण लक्षणांनुसार योनीविपदांशी साधर्म्य आढळते.

उपचार
हा रोग विषारी पदार्थांचे संचय, खराब पोषण, खराब पचन, मन आणि मज्जासंस्थेतील असंतुलन यामुळे होतो. त्यामुळे दोषांचे असंतुलन दुरुस्त करण्यासाठी आहार व मनावर चिकित्सा करणे गरजेचे ठरते.

  • दोषांना मूळ स्थानांवर परत आणण्यासाठी आयुर्वेदशास्त्रात पंचकर्मा चिकित्सापद्धती सांगितली आहे. पंचकर्मापूर्वी स्नेहन-स्वेदन करावे. वाताची मुख्य चिकित्सा बस्ती असल्याने योगबस्ती द्यावी. काढ्याची व तेलाची बस्ती द्यावी. वाताला योनिविकाराची सामान्य चिकित्सा देत असताना स्नेहनासाठी यमक स्नेहाचा म्हणजे तेल आणि तूप यांचा वापर करावा. तिळतेल, एरंडतेल, सहचर तेल, बला तेल इत्यादी तेलांचा उपयोग करावा.
  • काही वेळा फक्त तिळतेलाचा अभ्यंग उपयोगी पडतो. अत्याधिक वेदना असल्यास मोहरीचे तेल किंवा मोहरी बारीक वाटून वेदनायुक्त भागी लावल्यास आराम मिळतो.
  • वातघ्न औषधांनी सिद्ध काढ्याने योगी धावन करावे.
  • योनीभागी अभ्यंगासाठी शतधौत धृत, चंदनादी तेप यांचा उपयोग करावा.
  • मृदुविरेचन धात्री, मनुका, बहावा, त्रिफळा, गंधर्व हरितकी यांपैकी एक औषध सतत चालू ठेवावे.
    संशोधन व स्थानिक चिकित्सेनंतर शमन चिकित्सा द्यावी. औषधांमध्ये शतावरी, लोध्र, अशोक, अर्जुन, हरिद्रा, विदारीकंद, चंद्रप्रभा, अश्वगंधा, त्रिफळा, गोक्षुर, काचनार गुग्गुळ, प्रदरांतक लोहसारख्या औषधांचा उपयोग होतो. वैद्याच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत.
    ‘एंडोमेट्रिओसिस’मध्ये मुख्यतः वात-पित्त दोषांबरोबर रक्तधातू दूषित होऊन अतिप्रमाणात स्रवत असतो म्हणून रक्तस्तंभक अशी चिकित्सा द्यावी. लोध्र, वसा, नागकेशर, स्फटिक, मौक्तिक, प्रवाळ, शतावरीसारख्या औषधांचा उपयोग होतो. यामध्ये रक्त स्तंभन होऊन हळूहळू थांबते.
  • बऱ्याच वेळा भरपूर रक्तस्राव व वेदना असण्याने रुग्ण थकते, अशक्त होते, स्त्री अत्यंत कृश होते, फिकट व निस्तेज दिसते. यासाठी जीवनीय औषधांनीसिद्ध दूध व तूप घ्यावे. फळांचे रस घ्यावेत.
  • कडधान्यांचे कढण यांचा आहारात समावेश करावा.
  • मांसाहारी रुग्णांनी मांसरस घ्यायला हरकत नाही.
  • आहारात खारीक, खोबरे, अहलीव यांची खीर, लाडू खावे.
  • अतिमसालेदार पदार्थ, अवेळी भोजन, जागरण बंद करून खाण्यामध्ये दूध, तूप, फळे, वरणभात, पोळीभाजी असे पदार्थ खायला द्यावेत.
  • ब्रेड, मैद्याचे पदार्थ खाऊ नयेत.
  • दुधी, पडवळ, तांदुळजा, चाकवत या भाज्या, कडधान्यांचे सूप, ताजे गोड ताक, वेळच्या वेळी जेवण व निद्रा हे पथ्यकर आहे. तसेच योनीभागाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.