ऋषभ पंतची वनडे संघात निवड

0
100

नवी दिल्ली
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी काल गुरुवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. १४ सदस्यीय संघात यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला प्रथमच संधी देण्यात आली आहे. भुवनेश्‍वर कुमार व जसप्रीत बुमराह यांना कसोटीप्रमाणेच वनडेसाठीदेखील विश्रांती मिळाली असून मोहम्मद शामीचे वर्षभरानंतर संघात पुनरागमन झाले आहे. पंतला जागा देण्यासाठी दिनेश कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर कार्तिकने १३ डावांत ५०च्या सरासरीने व ७१.५७च्या स्ट्राईकरेटने ३५० धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला वगळण्याचा घेण्यात आलेला निर्णय आश्‍चर्यकारक मानला जात आहे.
केदार जाधव पहिल्या दोन सामन्यांसाठी तंदुरुस्त झालेला नसून उर्वरित तीन सामन्यांसाठी त्याचा विचार शक्य आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या पाठदुखीतून सावरला नसल्याने त्याला निवडण्यात आलेले नाही. आशिया चषक स्पर्धेत प्रत्येकी एक सामना खेळलेले दीपक चाहर व सिद्धार्थ कौल यांना नारळ देण्यात आला आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेत पंजाबविरुद्ध ५३ धावांत ३ गडी बाद करतानाच फलंदाजीत १४ चेंडूंत ३० धावा केलेल्या शार्दुल ठाकूरला पुन्हा स्थान मिळाले आहे. आपल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर डावखुरा वेगवान गोलंदाज खलिल अहमदने स्थान राखले आहे. आशिया चषकात रवींद्र जडेजाने यशस्वी पुनरागमन केल्याने पूर्णपणे तंदुरुस्त होऊनही अक्षर पटेलला बाहेर बसावे लागले आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला वनडे सामना २१ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे व दुसरा सामना २४ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. उर्वरित तीन सामने पुणे, मुंबई व तिरुअनंतपुरम येथे होतील.
भारतीय संघ ः विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद व शार्दुल ठाकूर.