उमेदवारीसाठी विरियातो फर्नांडिस, रमाकांत खलप यांचे नाव आघाडीवर

0
2

गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी काल पुन्हा एकदा नवी दिल्ली येथे बैठक घेतली. या बैठकीत प्रामुख्याने उत्तर गोव्यासाठी रमाकांत खलप व दक्षिण गोव्यासाठी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या नावांवर चर्चा झाली. दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारीसाठी ते प्रबळ दावेदार आहेत. या शर्यतीतून अन्य उमेदवार मागे पडले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांची नावे शनिवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित न झाल्याने काँग्रेस पक्ष प्रचारामध्ये मागे पडला आहे. लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी गोव्यातील उमेदवार निश्चित करण्यासाठी शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीला गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उपस्थिती लावली.

काँग्रेसच्या केंद्रीय उमेदवार निवड समितीच्या यापूर्वी बैठकीत अमित पाटकर, युरी आलेमाव यांनी उपस्थिती लावली होती. त्या बैठकीत उमेदवारीसाठी विचारात घेण्यात आलेल्या नावांना योग्य समर्थन मिळू शकले नाही. त्यामुळे कॉँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ कायम आहे. काँग्रेसतर्फे उत्तर गोव्यात रमाकांत खलप आणि दक्षिण गोव्यात कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची नावे जाहीर केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.