आरबीआयकडून रेपो दर ‘जैसे थे’

0
3

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नवीन पतधोरण जाहीर केले आहे. त्यानुसार रेपो दरामध्ये आरबीआयने कोणतेही बदल न करण्याची घोषणा काल केली. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यासंदर्भातील माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने सलग सात वेळा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. रिझर्व्ह बँकेने 6.5 टक्के व्याजदर कायम ठेवला आहे. त्यामुळे कर्जदारांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढील आढावा बैठकीपर्यंत हा 6.5 टक्के व्याजदर कायम राहणार आहे. त्यामुळे पुढील कमीत-कमी तीन महिने व्याजदरांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे काल स्पष्ट झाले आहे. वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज किंवा वाहनांसाठी घेतलेल्या कर्जाच्या ‘ईएमआय’मध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याने कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.
आरबीआयच्या नवीन आर्थिक वर्षाची पहिली पतधोरण आढावा बैठक गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली 3 एप्रिल ते 5 एप्रिल या दरम्यान झाली. या बैठकीत रेपो दरामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला.