उपमुख्यमंत्रीपद न मिळाल्यास विरोधात बसणार : शिवसेना

0
81

महाराष्ट्रातील भाजपप्रणीत फडणवीस सरकारला विधानसभेच्या पटलावर बहुमत सिध्द करण्यासाठी आठवडाभराचाच अवधी असला तरी अद्याप सत्तेत भागीदार होऊ इच्छिणार्‍या शिवसेनेची उपमुख्यमंत्रीपदाची मागणी पूर्ण करण्यास भाजप राजी नसल्याचे वृत्त आहे. उपमुख्यमंत्रीपद ही शिवसेनेची मुख्य मागणी असून ती पूर्ण न झाल्यास विरोधी बाकांवर बसण्यास शिवसेनेची तयारी असल्याची माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिल्ली.प्रारंभीच्या ताठर भूमिकेनंतर ऐनवेळी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या शपथविधीस उपस्थित राहिले होते. त्यानंतर शिवसेनेला सरकारात सहभागी करून घेण्यासंदर्भात उभय पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली असली तरी सत्ता सहभागाचे घोडे उपमुख्यमंत्रीपदाच्या प्रश्‍नावर अडून बसले असल्याचे सांगण्यात आले.
शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले की उपमुख्यमंत्रीपदाची आमची मागणी आहे. मात्र ती मान्य करण्यास भाजप तयार नाही. आम्ही अन्य कोणत्याही खात्यासंदर्भात तडजोड करण्यास तयार आहोत. मात्र उपमुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालेच पाहिजे असे हा नेता नाव उघड न करण्याच्या अटीवर म्हणाला.
याआधी १९९५मध्ये भाजपला कमी जागा मिळाल्या होत्या तेव्हा भाजपला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. तीच पध्दत अवलंबिण्यात यावी असे शिवसेनेचे पहिल्यापासून म्हणणे आहे. ही पध्दत त्यानंतर १५ वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्या सरकारांनीही कायम ठेवली होती. मात्र आता भाजपला ही पध्दत मोडायची आहे असे या नेत्याने सांगितले. गृह, वित्त, महसूल, शहर विकास ही खाते याआधीच भाजप मंत्र्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे आम्ही शनिवारपर्यंत वाट पाहणार आहोत. तोपर्यंत प्रमुख मागणी मान्य झाली नाही तर विरोधात बसण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही या नेत्याने स्पष्ट केले.