उद्या मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

0
117

>> १७ ते २२ जणांना मंत्रिपद मिळणार; देशातील प्रादेशिक पक्षांनाही देणार संधी

केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जाहीर होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात १७ ते २२ मंत्री शपथ ग्रहण करण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार करणार आहेत. सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण केली आहे. सरकारी सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, पहिला विस्तार सर्वसमावेशक होण्याची शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील बर्‍याच जणांना संघटनात्मक जबाबदार्‍या दिल्या जाऊ शकतात. नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहर्‍यांचा समावेश असू शकतो. मंत्रिमंडळात प्रादेशिक पक्षांना समाविष्ट करण्याचीही मोदी सरकारची तयारी आहे.

महाराष्ट्रातून तीन नावे चर्चेत
महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हीना गावित यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. तसेच रणजित नाईक निंबाळकर यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

उत्तर प्रदेशला प्राधान्य
उत्तर प्रदेशातून तीन ते चार मंत्र्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. त्यात अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.
बिहारमधून कोण?
बिहारमधून दोन ते तीन मंत्री मंत्रिमंडळात नव्याने दाखल होतील. भाजपचे सुशील मोदी, जेडीयूचे आर. सी. पी. सिंह आणि लोक जनशक्ती पक्षाचे पशुपती कुमार पारस यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

ज्योतिरादित्य शिंदेंना मंत्रिपद मिळणार
मध्य प्रदेशातून दोन नावांची जोरदार चर्चा असून, ज्योतिरादित्य शिंदे आणि राकेश सिंह यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे.

पश्‍चिम बंगालमधील दोघांना संधी
पश्चिम बंगालमध्ये शांतनू ठाकूर, निशीथ प्रामाणिक यांना केंद्रात काम करण्याची संधी मिळू शकते.

चार राज्यांतून एकेकाला संधी
राजस्थान, जम्मू-काश्मीर, लडाख, आसाम आणि ओडिशामधून एकाला मंत्रिपद दिले जाऊ शकते. याशिवाय जेडीयू, एलजेपी आणि वायएसआर या भाजपच्या सहकारी पक्षांनाही केंद्रात मंत्रिपद दिले जाऊ शकते.