‘त्या’ मुलीवरील बलात्कार प्रकरणात दहा जणांचा सहभाग

0
128

>> विविध संघटनांचा आरोप; डिचोली पोलीस स्थानकावर धडक देत संशयितांच्या अटकेची मागणी

डिचोलीतील एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाला नवे वळण लागले असून, या प्रकरणात आणखी दहा संशयित गुंतले असल्याचा आरोप विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी काल डिचोली पोलीस स्थानकावर धडक देत केला. या प्रकरणातील अन्य संशयितांना चार दिवसांत गजाआड करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

डिचोली परिसरातील एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी लैंगिक अत्याचारानंतर गरोदर राहिल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने डिचोली पोलीस स्थानकात २५ जूनला नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलीची सखोल चौकशी केली असता, तिने संशयित अरमान खान याचे नाव उघड केले. त्यानंतर पोलिसांनी मुस्लिमवाडा-डिचोली येथील अरमान खान (१९) याला २५ जूनला अटक केली होती.

या प्रकरणी सोमवारी शैलेंद्र वेलिंगकर, तारा केरकर, प्रिया जाधव, रेश्माला बिजली, सलमान खान, किशोर राव, ऐश्वर्या साळगावकर आदी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी डिचोलीचे पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांची भेट घेत तातडीने तपास करण्याची मागणी निवेदन देत केली.

या प्रकरणातील अटकेतील संशयिताची शैलेंद्र वेलिंगकर यांनी सोमवारी भेट घेतली. या प्रकरणात अजून दहा संशयित गुंतल्याची माहिती अटकेतील संशयिताने आपल्याला भेटीदरम्यान दिली असल्याचा दावा वेलिंगकर यांनी केला. ही बाब वेलिंगकर यांनी जाहीर करताच पोलीस स्थानकाच्या आवारात विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. तसेच याबाबतचे व्हिडीओ रेकॉर्डिंग पोलिसांना दिलेल्या मोबाईलमध्ये असल्याचा दावा विविध संघटनांनी केला. तसेच सर्व संशयितांच्या अटकेची मागणी संघटनांनी केली.

दरम्यान, या प्रकरणी जिल्हा न्याय दंडाधिकार्‍यांसमोर शुक्रवार दि. ९ जुलै रोजी सदर पीडित मुलीची साक्ष होणार असून, त्यानंतर अधिक माहिती उपलब्ध होणार आहे, असे पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांनी सांगितले.