>> कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसणे कठीण : ठाकरे
शिवसेनेतील बंडळीनंतर पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे काल पार पडले. या मेळाव्यांतूनशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. शिवसेनेतून काही लोकांनी गद्दारी केली. होय, त्यांना गद्दारच म्हणणार. कारण मंत्रिपदे तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहे; पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही, असा हल्लाबोल ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील मेळाव्यात केला.
आत्तापर्यंत रावण १० तोंडांचा होता; पण आता तो ५० खोक्यांचा झाला आहे. हा खोकासूर आहे. काळ बदलतो, तसा रावणही बदलला आहे, असे ठाकरे म्हणाले. भाजप आणि शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचे असे ठरले होते, मग त्यावेळी या गद्दारांनी का आवाज उठवला नाही, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
शिवसेना पक्ष पूर्णत: संपवण्यासाठी आता सर्व काही सुरू आहे. आमदार आणि मंत्रिपद दिल्यानंतरही त्यांनी गद्दारी केली. आताही मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा त्यांची गद्दारी सुरुच आहे. ही बाप चोरणारी औलाद आहे.
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना.
बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी तुम्ही केली : शिंदे
बीकेसी येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. खोके आणि गद्दार यावरुनही त्यांनी विरोधकांना सुनावले. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी तुम्ही केली, आम्ही केलेली गद्दारी नाही, तर ते ‘गदर’ आहे, असे शिंदे म्हणाले.
वारसा हा विचारांचा असतो, तो जपायचा असतो. आम्ही मात्र बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जीवापाड जपला आहे. त्यामुळे विचारांचे पाईक आणि शिलेदार कोण आहे? हे महाराष्ट्राला समजले आहे. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी केली आणि या राज्याच्या मतदारांशी गद्दारी केली, असा पलटवार शिंदेंनी केला.
महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही बेईमानी केली. तुम्ही विश्वासघात केला, तुम्ही गद्दारी केली आणि तुम्ही आम्हाला गद्दार म्हणताय. आम्ही केलेली गद्दारी नाही, तर ते ‘गदर’ आहे. गदर म्हणजे क्रांती, उठाव होय.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र.