उत्तरेतील किनारी भागांसाठी वेगळी पीडीए ः मंत्री सरदेसाई

0
193

उत्तर गोव्यातील किनारी भागाच्या नियोजित विकासासाठी वेगळी पीडीए स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे, अशी माहिती नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहे. बेकायदा बांधकामाबाबत नगरनियोजन विभागाला माहिती सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. परराज्यातील मोठ्या बिर्ल्डरनी ग्रामीण भागात जमिनी विकत घेऊन बेकायदा रूपांतर करण्यास सुरूवात केली आहे, असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.

झारखंड येथील एका मोठ्या बिर्ल्डरला स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जाळ्यात पकडण्यात आले आहे. त्याच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंत्र्याला, विशेष अधिकार्‍यालासुद्धा परराज्यातील बिर्ल्डर जुमानत नाहीत. आपण मंत्र्यालासुद्धा भीत नाही, असे मंत्र्याच्या ओएसडीला सांगितले जाते अशी माहिती मंत्री सरदेसाई यांनी दिली.

दि. ३० ऑक्टोबर रोजी होणार्‍या नगरनियोजन मंडळाच्या बैठकीत नवीन पीडीएबाबत निर्णय घेतला जाईल. किनारी पीडीएबरोबरच पर्वरी बांबोळी, ताळगावचा समावेश असलेले पीडीए स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे मंत्री सरदेसाई यांनी सांगितले. सरकारी पातळीवर या पीडीएच्या स्थापनेबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. नगरनियोजन खात्याचे अधिकारी लोकांची कामे प्राधान्यक्रमाने करण्यापेक्षा आपलेच प्रश्‍न मांडण्याला प्राधान्य देत आहेत, असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले. तियात्रांना जीएसटीमधून सुट मिळाली पाहिजे. वर्षाला साधारण ५० ते ६० तियात्रांचे सादरीकरण केले जाते. या तियात्रांच्या माध्यमातून अडीचशे ते तीनशे जणांना रोजगारसुद्धा मिळतो. तियात्रांना जीएसटी लागू केल्यास ना नफा ना तोटा या तत्वावर तियात्राचे सादरीकरण करावे लागणार आहे. यामुळे तियात्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या माध्यमातून हा विषय केंद्रीय पातळीवर मांडण्यात येणार आहे, असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.

पुराभिलेख व पुरातत्व खात्याला भेट
मंत्री सरदेसाई यांनी मळा पणजी येथील पुराभिलेख व पुरातत्व खात्याच्या कार्यालयाला सोमवारी भेट दिली. यावेळी पुराभिलेख आणि पुरातत्व खात्याकडील जुन्या दस्ताऐवजांचे डिजिटायझेशन करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती मंत्री सरदेसाई यांनी दिली. खात्याच्या इमारतीच्या सुरक्षेबाबत उपाययोजना हाती घेतली जाणार आहे. अग्निशामक दलाच्या सूचनेनुसार नवीन सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आगामी दोन वर्षात पुराभिलेख व पुरातत्व विभाग मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. आल्तिनो, सांतइनेज येथे पुरातत्व उभारण्याचे प्रस्ताव आहेत. परंतु जमिनीचा प्रश्‍न महत्वाचा आहे, असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.