‘अपना घर’मधील वातावरण सकारात्मक बनविणार ः राणे

0
143

>> मेरशीत नवीन वास्तूचे उद्घाटन

‘अपना घर’ हा संवेदनशील विषय असून अपना घरातील एंकदर वातावरण सकारात्मक बनविण्यावर भर दिला जात आहे. येत्या चार – पाच दिवसात सर्व विषयांवर तोडगा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

मेरशी येथील अपना घराच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वास्तूचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना मंत्री राणे म्हणाले की, अपना घर वेगवेगळ्या गोष्टीमुळे सदैव चर्चेत राहत आहे. यापुढे गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही. मुलांना वेगळ्या वातावरणामुळे येथे आणले जाते. येथे त्यांच्यावर चांगले संस्कार होण्याची गरज आहे. अपना घरच्या कारभारात सूसूत्रता आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. अपना घरातील दूषित वातावरण दूर करण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. सरकारी अधिकारी लेव्हीनसन्स मार्टीन यांनी तयार केलेल्या अमंलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. महिला व बाल कल्याण खात्याच्या विविध समित्याच्या बैठका घेऊन भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यात येणार आहेत. अपना घरातील कर्मचार्‍याच्या समस्या सुध्दा जाणून घेऊन सोडविण्यात येणार आहेत. अपना घरातील वातावरण सकारात्मक बनविण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या ठिकाणी इमारतीचे नूतनीकरण योग्य पद्धतीने केले आहे. आतील वातावरण चांगले असले तरच येथील मुलांवरसुद्धा त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

यावेळी गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर, उपाध्यक्ष तथा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, महिला व बालकल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई, बाल न्यायालयाच्या दंडाधिकारी पूजा कवळेकर व इतरांची उपस्थिती होती.

नूतनीकरणासाठी २.८ कोटी
अपना घरामध्ये मुलांसाठी चिंत्राच्या माध्यमातून आल्हाददायक वातावरण, मुलांना वयानुसार ठेवण्यासाठी खास व्यवस्था, कॉमन एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सर्वच खोल्यात स्पीकरची सोय, डॉमेट्रीला जोडून टॉयलेटची सोय, मुलांना खेळण्यासाठी बगिचा व इतर सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. अपना घराच्या नूतनीकरणाच्या कामावर २.८ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.