Home बातम्या उगवत्या वर्षाला सलाम…!

उगवत्या वर्षाला सलाम…!

0

– रमेश सावईकर

सन २०११ वर्ष सरले आहे. त्याला निरोप देताना नि नववर्ष २०१२ चे स्वागत करीत असताना अनेक विचारांचे थवे मनात गर्दी करीत आहेत. कालचक्र पुढे असेच जात राहणार आहे. एक वर्षाचा कालखंड हा तसा एखाद्या संस्था किंवा देशाच्या इतिहासात मोठा नसला तरी व्यक्तीच्या जीवनकालात महत्त्वपूर्ण असतो. आता तर मनुष्याचे आयुमान कमी होत जाऊ लागल्याने आयुष्यातील प्रत्येक वर्षाला अनन्य साधारण महत्त्व आहे हे ध्यानात घेऊनच आपण पुढे जायला हवे.

सरत्या वर्षाला निरोप देताना झालेल्या चुका, चुकलेली गणिते, भोगलेले दुःख, पदरी आलेली निराशा, वाट्याला आलेले अपयश, त्याचबरोबर मिळविलेले सुख, आनंद, यश यांचा लेखाजोगा प्रत्येकाने मांडावा. जे त्याज्य आहे ते त्यागावे. अमंगलाची कात टाकावी अन् ‘जुने जाऊ द्या मरणालागून जाळून किंवा पुरून टाका’ असे म्हणत शत्रुत्व, वैरत्व अन् तमाम कुप्रवृत्ती भावनांना कायमची सोडचिठ्ठी देणे यथोचित ठरेल.

सूर्य उगवतो आहे, चंद्र चांदणे शिंपितो आहे, झरे झुळझुळू वाहत आहेत, वारा वाहतो आहे, कोंबडा आरवतो आहे, कावळा काव काव करतो आहे, ….अन् स्वर्गातील देव, जगन्नियंता सारी सूत्रे आपल्या हाती घेऊन असल्याने जगात सर्व ठीक आहे असे म्हणण्याचे दिवस गेले. जीवनपद्धती बदलत गेली तसे सारे जगही बदलले. म्हणून आपण फक्त आशावादी बनून चालणार नाही. तर श्रमाशिवाय पर्याय नाही असे म्हणून कार्यशील बनण्यात आपले यश आहे याची जाणीव सरत्या वर्षाला निरोप देत असताना होणे गरजेचे आहे.

नववर्ष २०१२ चे स्वागत करताना नवे संकल्प, नव्या आशा, नवी उमेद, नवा जोम, नवा उत्साह, नवचेतना, अन् नव स्फुल्लिंग आदींचे अनुग्रहण करून २०१२ ला सलामी देऊया. प्रथमतः आपण स्वतः बदलण्याची गरज प्रत्येक नागरिकाने ओळखली अन् त्यानुसार कृती करण्याचे ठरवून संकल्प सोडला तर पर्यायाने ग्राम, राज्य अन् राष्ट्र प्रगतीकडे खर्‍या अर्थाने घोडदौड करील.

२०११ ला निरोप देताना आपल्या गोवा राज्याचा विचार करायचा झाल्यास सकारात्मक दृष्टीने पाहता आपण अत्यावश्यक गोष्टी गमावत आहोत असे खेदाने म्हणावे लागेल. २०१० च्या तुलनेत गोव्यात २०११ मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले. अपघात, घातपात वाढले. अप्रिय घटना वाढल्या. आम आदमीवर अन्याय वाढले, त्यांचे प्रश्‍न, समस्या वाढत राहिल्या. महागाईने जनसामान्यांचे जीवन हैराण झाले! ही आगेकूच पोषक आहे असे कोण म्हणेल?

नैसर्गिक आपत्ती-संकटांना गोमंतकीयांना सामोरे जावे लागले. उत्तर व दक्षिण गोव्यातील काही भागांत पावसाळ्यात पूर येऊन घरे कोसळणे, शेती बागायती बुडणे, आदी घटनांमुळे लोकांचे नुकसान झाले. डिचोलीत खाणी कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. वास्कोत वायुगळती झाली. या घटनांत प्राणहानी वित्तहानी झाली. सर्व नुकसानग्रस्त पीडितांना नुकसानभरपाई मिळून त्यांचे जीवन पूर्वपदावर आले असे काही झाले नाही.

गोमंतकीयांनी बेकायदा भू उत्खननाला विरोध चालूच ठेवला आहे. नैसर्गिक जलस्रोत नष्ट होत चालले आहेत. वनसंपत्तीचा र्‍हास वाढला अन् या नाशक वातावरणामुळे भातशेती, सुपारी, काजू, नारळ आदी पिके घटली. मध्यंतरीच्या काळात राज्याला होणारा वीजपुरवठा अडचणीत आल्याने गोमंतकीय जनतेला वीज समस्येला सामोरे जावे लागले. समस्यांच्या विळख्यात जनता अडकली की गाडून टाकलेल्या काही वादग्रस्त विषयांची मढी उकरून काढण्याचेही प्रकार झाले. प्राथमिक शिक्षण माध्यम, मोपा विमानतळ हे त्यापैकीच होत.

प्रादेशिक आराखडा २०२१ चे भूत कामत सरकारने, आपल्या सरकारला किती पाठिंबा आहे, जनता खूष आहे की नाही, याची चाचपणी करण्यासाठी तर नाही ना मानगुटीवर बसवले? त्यांनाच बहुधा खरा उद्देश नि खरे कारण ज्ञात असावे. ‘पेटते प्रश्‍न, अस्वस्थ जनता अन् सुस्त सुशेगाद मायबाप सरकार!’ अशीच आपली गोव्याची परिस्थिती. विरोधी वातावरण वाढतेय असे दिसले की, जनतेला उत्सवात गुंतवून ठेवायचे अन् आपण सरकारी पाहुणचार घेत जनतेपुढे खाक्या मिरवायचा अशी जणू गोवा सरकारची चालरुढीच बनली आहे, असे म्हटल्यास ते अप्रस्तुत ठरू नये. अन्न महोत्सव, लोकोत्सव, बालोत्सव, युवा महोत्सव, नाट्योत्सव, फिल्मोत्सव याशिवाय अन् कितीतरी सरकारी महोत्सव. कशासाठी हा अट्टहास? कशाला चाललीय ही असीम वित्त उधळपट्टी?

पर्यटनाच्या नावाखाली गोव्यात काय चालते, काय चाललेय याबद्दल कोण कोणाला काय सांगणार? अहो काय चालत नाही ते विचारा? आता तर सरत्या २०११ वर्षाला निरोप देण्याच्या निमित्ताने गोव्याचे सागर किनारे देशी विदेशी पर्यटकांनी फुलून गेले. त्यामध्ये गोमंतकीय युवा-युवती अन् सनबर्न पार्टीची चटक लागलेले असे कितीतरी यात पार्टीत बरेच बेधुंद होतील. त्याच धुंदीत २०११ ला अलविदा म्हणत २०१२ चे स्वागत करतील झिंगत नि पेंगत!

अशा पार्श्‍वभूमीवर ही मंडळी काय संकल्प सोडणार? याची कल्पना करा. ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’ म्हणणार्‍या कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेला ध्येयाचा किनारा, आम्हां गोमंतकीयांना अशा परिस्थितीत कसा दृष्टिपथात येणार?

नववर्ष २०१२ चे स्वागत करण्यासाठी गोवा राज्याच्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण मात्र एव्हानाच रंगू लागले आहे. विविध रंगांची बरसात करत राजकीय वातावरणाने तप्त झालेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याच्या कामी बरेच राजलोक लागले आहेत. भूलभुलैय्याचे वातावरण रंगविण्यात राजकीय तट्टू व्यस्त होत आहेत.

मार्च २०१२ मध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनियुक्त मायबाप सरकार अधिकारावर येईल. नवा विटी दांडू नव्या स्वरूपात रंगतो की तोच विटी दांडू नव्या स्वरूपात जनतेला बघावा लागतो हे कालांतराने कळेलच. तथापि सरकार कोणाचेही असो, नवे वर्ष, नवे सरकार, गोव्याला लाभेल ही नववर्षाची भेट..!

सरत्या २०११ वर्षाला निरोप देत आपण २०१२ चे स्वागत करताना आदर्श नागरिक बनून लोकशाही सशक्त, सक्षम बनविण्याचा संकल्प सोडूया..!

आपला भारत लोकशाहीच्या पायावर उभा आहे. हा पाया कोसळू न देता तो अबाधित रहावा या देशभक्तीभावाने लोकशाही सशक्त, समृद्ध नि अधिक सक्षम करीत संवर्धन करणे हे आम्हां नागरिकांचे कर्तव्य आहे. नागरिकत्वाचे अधिकार उपभोगीत असताना याचा विसर पडू देता कामा नये. तमाम जनमनाची भावना वृद्धिंगत करण्याचा संकल्प २०१२ चे स्वागत करताना सोडूया..! आपला भारत नि गोवा राज्य आदर्श बनवण्यासाठी..!