ईडीएमना विरोध करण्यात अर्थ नाही : पर्यटनमंत्री

0
215

गोव्याच्या पर्यटनाचा फायदाच होत असून अशा महोत्सवांना विरोध करण्यात अर्थ नसल्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी वागातोर येथे २७, २८ व २९ रोजी होणार्‍या संगीत व नृत्य महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले.

गोव्यात पर्यटक येतात ते मौजमजा करण्यासाठी संगीत व नृत्य महोत्सवासाठी देश-विदेशातील पर्यटक गोव्यात येतात. त्यामुळे गोव्याला व पर्यायाने सरकारलाही आर्थिक फायदा होतो. अशा महोत्सवात अमली पदार्थांचा वापर केला जाऊ नये याकडे आमचे लक्ष असते. कटाक्षाने आम्ही त्याकडे लक्ष देतो. त्यासाठी पोलीस फौजफाट्याची व्यवस्था केली जाते, असे ते म्हणाले.

वागातोर येथे होणार्‍या संगीत व नृत्य रजनीसंबंधी बोलताना गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन नीलेश काब्राल म्हणाले की ह्या महोत्सवासाठी दर दिवशी सुमारे ५० हजार लोक हजर राहणार असून त्यात पर्यटकांची संख्या मोठी असेल. पर्यटन उद्योगातील लोकांना व गोवा सरकारला त्यामुळे चांगला महसूल प्राप्त होणार आहे. ह्या महोत्सवामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी उपाय योजना करण्यात येणार असल्याचे पर्यटन खात्यातील सूत्रानी सांगितले.