‘इस्रो’ची गगनझेप

0
221

श्रीहरीकोट्याच्या सतीश धवन स्पेस सेंटरने काल आपल्या पीएसएलव्ही – सी ३४ प्रक्षेपकाद्वारे एकाच वेळी तब्बल वीस उपग्रह अवकाशात सोडून इतिहास रचला. ‘इस्रो’च्या आजवरच्या सफल कामगिरींवरील हा एक मानाचा तुरा म्हणावा लागेल. आठ वर्षांपूर्वी ‘इस्रो’ने एकाच वेळी दहा उपग्रह अवकाशात सोडले होते. कालची संख्या त्याच्या दुप्पट आहे एवढेच केवळ त्याचे महत्त्व नाही, तर त्याद्वारे भारताच्या या क्षेत्रातील अधिकारावर जणू जागतिक मान्यतेची एक मोहोर या विक्रमातून उठली आहे. सी ३४ प्रक्षेपकाने एकावेळी जे वीस उपग्रह अवकाशात सोडले, त्यात अमेरिकेसह कॅनडा, जर्मनी, इंडोनेशिया अशा विविध देशांच्या उपग्रहांचा समावेश होता आणि अन्यत्र या उपग्रहांच्या अवकाश प्रक्षेपणाला जेवढा खर्च येतो, त्याच्या जवळजवळ निम्म्या खर्चात ‘इस्रो’ने हे उपग्रह अवकाशात पोहोचवले आहेत. आज अवकाशात उपग्रह वा यानाचे प्रक्षेपण करण्याचा मान केवळ अवकाश संशोधन संस्थांचाच राहिलेला नाही. विदेशांत त्याचे केव्हाच खासगीकरण झाले आहे. अमेझॉन या ई – कॉमर्स कंपनीचा संस्थापक जेफ बेझॉसची ‘ब्ल्यू ओरिजिन’ किंवा एलन मस्क या अब्जाधीशाची ‘स्पेसएक्स’ या क्षेत्रात बरीच पुढे गेली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यावसायिक प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ‘इस्रो’ चे हे यश लक्षणीय आहे. जे छोटे – मोठे उपग्रह काल एकाच वेळी अवकाशात सोडले गेले, त्यामध्ये जसे विद्यापीठीय विद्यार्थ्यांनी बनवलेले उपग्रह आहेत, तसेच गुगलसारख्या बड्या कंपनीचेही उपग्रह आहेत. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ‘स्वयम्’ हा उपग्रह काल अवकाशात सोडला गेला आहे. हॅम संदेशांचे दळणवळण करण्यास तो साह्य करील. चेन्नईच्या सत्यभामा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी हरितवायूंच्या अभ्यासासाठी बनवलेला सत्यभामासॅटही अवकाशात सोडला गेला आहे. ‘गुगल’च्या मालकीच्या टेराबेला या कंपनीने बनवलेला अर्थ इमेजिंग म्हणजे पृथ्वीचे छायांकन करणारा उपग्रहही अवकाशात रवाना केला गेला. विविध देशांच्या उपग्रहांबरोबरच आपला भारताचा ‘कार्टोसॅट – २’ हा ‘कार्टोसॅट’ या उपग्रह मालिकेतील दुसरा उपग्रहही अवकाशात सोडला गेला आहे. पृथ्वीवरील अगदी साठ सेंमी. ची वस्तूदेखील अवकाशातून टिपू शकेल अशी या उपग्रहाची क्षमता आहे. आजच्या अद्ययावत दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये उपग्रह प्रक्षेपण हे अत्यावश्यक ठरले आहे. त्यामुळे त्याची जागतिक मागणी प्रचंड वाढली आहे. म्हणूनच व्यावसायिकदृष्ट्याही त्याचे प्रक्षेपण लाभदायक ठरू शकते. ‘इस्रो’ने आपल्या क्षमता ओळखून हीच व्यावसायिकता आज अंगिकारलेली दिसते. गेली अनेक वर्षे ‘इस्रो’ एकामागून एक असे यशाचे नवनवे मानदंड प्रस्थापित करीत चालली आहे. ‘पीएसएलव्ही’ आणि ‘जीएसएलव्ही’ विकसित करून या संस्थेने त्या क्षेत्रात आपला अधिकार प्रस्थापित केला. ‘चंद्रयान’ आणि ‘मंगलयान’ च्या माध्यमातून भारताची मान अवघ्या जगामध्ये उंचावली. गेल्याच महिन्यात पुनर्वापर करता येण्याजोगा प्रक्षेपक बनवण्यात त्यांना यश आले. पुढच्या महिन्यात संपूर्णतः देशी बनावटीच्या ‘स्क्रॅमजेट’ इंजिनाची चाचणी घेतली जाणार आहे. ‘इस्रो’ ही केवळ एक संस्था नाही. ती एक कार्यसंस्कृती आहे. पं. जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विक्रम साराभाईंसारख्या द्रष्ट्या संशोधकाने देशभरातून प्रतिभावान संशोधकांना एकत्र आणून साठच्या दशकात तिची स्थापना केली, तेव्हापासून तिची कामगिरी देदीप्यमान राहिली आहे. सतीश धवन, यू. आर. राव, के. कस्तुरीरंगन, जी. माधवन नायर अशा दिग्गजांचे नेतृत्व तिला लाभले. वादांच्या वावटळी आल्या नाहीत असेही नाही. मध्यंतरी ‘अंतरिक्ष’ या ‘इस्रो’च्या उपांगाने केलेल्या एका कंत्राटावरून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही झाले. परंतु तरीही या संस्थेने आजवर अवकाश संशोधन आणि आनुषंगिक गोष्टींमध्ये घेतलेली झेप थक्क करणारी आहे. बैलगाडीवरून प्रक्षेपक वाहून नेण्यात येत असतानाचे ते ऐतिहासिक छायाचित्र आणि आज एकाच वेळी वीस उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याचे संस्थेमध्ये आलेले सामर्थ्य या दोन गोष्टींची तुलना स्तिमित करते. ‘इस्रो’ थेट पंतप्रधानांशी जोडलेली असते हे लक्षात घेतले तर तिचे स्थान आणि महत्त्व याची कल्पना येईल. भारताला भूषणावह असणार्‍या अशा संस्था भ्रष्टाचारापासून आणि गैरव्यवहारापासून मुक्त ठेवणे हे खरोखर आव्हानात्मक आहे. बुद्धिमत्तेला योग्य प्रोत्साहन आणि उत्तेजन जर मिळाले, पुरेसे स्वातंत्र्य मिळाले तर चमत्कार घडू शकतात हे ‘इस्त्रो’ची आजवरची वाटचाल सिद्ध करते आहे. नवनव्या विक्रमांसाठी ती सज्ज आहे आणि या सज्जतेतच तिची शान आहे.