रूबी रेसिडेन्सी विरोधात काणकोणात नागरिकांचा मोर्चा

0
108

>>वादामुळे शांतताभंगाची भीती

 

काणकोण तालुक्यात पालिका क्षेत्रात चालू असलेल्या भारत डेवलॉपर्सच्या रुबी रेसिडेन्सी, पाळोळे प्लाझा या प्रकल्पाविरुद्ध काणकोणच्या जागृत नागरिकांनी कडक पवित्रा घेतला असून मंगळवारी (२१ रोजी) संध्याकाळी नागरिकांनी नगर्से येथे चालू असलेल्या भारत डेवलॉपर्सच्या बांधकामाच्या ठिकाणी धडक मोर्चा नेऊन काम बंद करण्याची ताकीद दिली. दोन वर्षांपूर्वी चावडीवरील रूबी रेसिडेन्सी इमारत जशी कोसळली तोच प्रकार या ठिकाणी देखील घडण्याचा संभव असून परप्रांतीय लोक स्थानिकांच्या जिवाशी खेळतात असा स्पष्ट आरोप मोर्चेकरांनी केला. या प्रकरणी शांतताभंग होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नगर्से येथे चालू असलेल्या बांधकामा संबंधीची चौकशी करून काणकोण पालिकेने तपासणी करावी या संबंधीची तक्रार राजेश देसाई यांनी केली होती. मात्र मागच्या तीन दिवसात पालिकेचे मुख्याधिकारी तसेच अभियंता बांधकामाची तपासणीसाठी ङ्गिरकले नसल्यामुळे स्थानिक नागरिक खवळले असून नगर्से येथील इमारतीचे बांधकाम त्वरित बंद करण्यात यावे अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे.
दरम्यान, नगर्से येथे सर्वे. क्र. १६३/१ ए या
जमिनीवर चालू असलेल्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी २५ पेक्षा अधिक व्यक्तींनी अकस्मात अतिक्रमण करून आपल्या कामगारांना धमकी दिली, मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली अशी लेखी तक्रार भारत डेवलॉपर्सचे संचालक परदीप सिंग बिरींग यांनी द. गोव्याचे पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक तसेच काणकोणच्या पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
दोन वर्षांपूर्वी रूबी रेसिडेन्सी इमारत दुर्घटना झाल्यानंतर आपल्या बांधकामाचा परवाना रद्द करण्यात आला. या दुर्घटनेमुळे आपल्या कंपनीत ज्या व्यक्तींनी सदनिकांसाठी अर्ज केले होते त्यांची खूप गैरसोय झाली. प्रशासकीय लवादाने मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या दुर्घटनेत जे कामगार मरण पावले त्यांना नुकसान भरपाई देतानाच, फ्लॅट धारकांना फ्लॅट देण्याचे काम सध्या चालू असून आपण परप्रांतीय आहे याचा लाभ उठवित आपली सतावणूक चालू असल्याचे बिरींग यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे भारत डेवलॉपर्स आणि कोस्टर बिल्डर्स यांच्यातील वाद विकोपाला गेला असून या ठिकाणी शांतता भंग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.