Home बातम्या इस्रायल-इराणकडून विध्वंस सुरुच

इस्रायल-इराणकडून विध्वंस सुरुच

0

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष चौथ्या दिवशीही सुरू असून, हा संघर्ष आता युद्धाकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी रात्री इस्रायलने इराणच्या परराष्ट्र मंत्रालयावर हल्ला केला होता. त्यात 100 हून अधिक जण जखमी झाले होते. इस्रायलने काल गाझा मदत केंद्रावर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला, त्यात तब्बल 38 पॅलेस्टिनी ठार झाले. इराणमध्ये आतापर्यंत 224 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1,277 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, इराणने सोमवारी सकाळी इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. इराणी सैन्याने मध्य इस्रायलमध्ये अनेक ठिकाणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून, 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इराणच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलने इराणवर हवाई हल्ले करताना इराणमधील तेल डेपो, गॅस रिफायनरी प्रकल्प देखील लक्ष्य केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच इस्रायलने इराणच्या आकाशावर ताबा मिळविल्याचा दावा केला आहे, तर इराणची मिसाईल इस्रायलवर आघात
करत आहेत. सध्या इस्रायलने इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य केले असून, इराणनेही इस्रायलमधील जेरुसलेम व तेल अवीवसह अनेक शहरांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत.

इस्रायलने तेहरानमधील इराणच्या सरकारी टीव्ही स्टुडिओच्या मुख्यालयावर काल हल्ला केला. तेहरानमधील राष्ट्रीय टीव्ही वृत्तवाहिनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंगच्या इमारतीवर बॉम्ब हल्ले करण्यात आले. लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना हल्ला झाल्यामुळे महिला अँकरला जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याची वेळ आली.