‘इसिस’ ची दस्तक

0
246

लखनौमधील ठाकूरगंज भागात दहशतवाद विरोधी पथकाने जवळजवळ बारा तास झुंज देऊन यमसदनी पाठविलेला सैफुल्ला हा आयएसआयएसचा म्हणजे ‘इसिस’चा दहशतवादी आणि त्याने आखलेले स्फोटांचे कटकारस्थान पाहता ही संघटना आता भारतात शिरकाव करण्यात यशस्वी ठरली असल्याचीच निशाणी आहे. आजवर भारतातून पळून जाऊन आयएसआयएसला इराक आणि सिरियामध्ये मिळालेले अनेकजण आढळून आले, परंतु खुद्द भारतात दहशतवादी कारवाया करण्यात त्या संघटनेला यश मिळाले नव्हते. पण जी माहिती सध्या समोर आली आहे, ती पाहता आयएसआयएस भारतात सक्रिय झाल्याचे दिसते आणि हा राष्ट्रीय सुरक्षेला निर्माण झालेला आजवरचा सर्वांत गंभीर धोका मानावा लागेल. सैफुल्लाला जिवंत पकडता आले असते तर या संघटनेच्या भारतातील वळवळीचा संपूर्ण छडा लावता आला असता, परंतु अश्रुधूर सोडून आणि मिरची बॉम्ब फोडूनही तो दडलेल्या खोलीतून बाहेर न आल्याने त्याला ठार मारण्यावाचून कमांडोंना पर्याय राहिला नाही. आता दरवेळेप्रमाणे ह्या चकमकीसंदर्भात नाना शंका उपस्थित केल्या जातील. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमधील महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान व्हायचे असताना पूर्वसंध्येला ही कारवाई झाल्याने तिचा संबंध निवडणुकीशी जोडण्यासाठी दिग्विजयसिंगादी मंडळी पुढे सरसावल्यावाचून राहणार नाहीत. स्वतःचे प्राण पणाला लावून दहशतवाद्यांच्या निःपातासाठी झुंजणार्‍या आपल्या वीर जवानांचे मनोबल खच्ची करणार्‍या तथाकथित मानवतावाद्यांची आपल्याकडे कमी नाहीच. त्यामुळे या सैफुल्लाच्या मनसुब्यांची संगतवार माहिती सबळ पुराव्यांनिशी उघड करण्याचे आव्हान आज दहशतवाद विरोधी पथकापुढे आहे. भोपाळ – उज्जैन रेलगाडीमध्ये झालेला कमी क्षमतेचा बॉम्बस्फोट आणि हा सैफुल्ला यांचा संबंध असल्याचे तपासात आढळले आहे. म्हणजेच रेलगाड्यांमध्ये भीषण बॉम्बस्फोट घडविण्याचे एखादे मोठे षड्‌यंत्र असू शकते आणि वरील स्फोट ही त्याची चाचणी असावी. गेले दोन महिने विद्यार्थी असल्याच्या बहाण्याने लखनौत वास्तव्य करून असलेल्या या सैफुल्ला आणि त्याच्या सहकार्‍यांचे धागेदोरे कुठे कुठे आणि कसे कसे जुळलेले आहेत, हे उघड होऊ शकले तर त्यातून आयएसआयएसच्या भारतात विणल्या जाणार्‍या जाळ्याचा पर्दाफाश होऊ शकेल. आयएसआयएस खुरासानचा हा सैफुल्ला हस्तक असावा. खुरासान प्रांत म्हणजे पूर्वीचा ईशान्य इराण, दक्षिणी तुर्कमेनिस्तान, उत्तर अफगाणिस्तान आणि भारताचा काही भाग यांचा मिळून बनलेला प्राचीन प्रदेश. तेथे आपली खिलाफत स्थापन करण्यासाठी आयएसआयएस गेली काही वर्षे प्रयत्नशील आहे हे काही लपून राहिलेले नाही. आजवर भारतात उचापती करण्याचे बरेच प्रयत्न या मंडळींनी केले, परंतु गुप्तचर यंत्रणांनी वेळोवेळी ते हाणून पाडले. दहशतवादविरोधी पथकाने यावेळीही हा प्रयत्न हाणून पाडला. उत्तर प्रदेशमध्ये अनेक संवेदनशील ठिकाणे आहेत. काशी आहे, मथुरा आहे, अयोध्या आहे. ताजमहाल आहे. त्यामुळे या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा कट आयएसआयएस खुरासानने आखलेला असू शकतो. त्या दिशेनेही तपास होणे गरजेचे आहे. पाकिस्तानमध्ये गेल्याच महिन्यात शाहबाज लाल कलंदर दर्ग्यावर झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात ऐंशी जण ठार झाले, तो हल्ला आयएसआयएस खुरासाननेच केल्याचा कयास आहे. आजवर भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या या मानवतेच्या शत्रूने आता भारतामध्ये दस्तक दिलेली आहे. हे आव्हान आपली सुरक्षा यंत्रणा कशी पेलते, त्यावर देशाची सुरक्षितता अवलंबून आहे. ही विषवल्ली रुजण्यापूर्वीच छाटण्याची आज गरज आहे.