Home बातम्या इफ्फीचा उद्घाटन सोहळा पणजीतील जुन्या जीएमसीसमोर

इफ्फीचा उद्घाटन सोहळा पणजीतील जुन्या जीएमसीसमोर

0

महोत्सवासाठी एक दिवस वाहतूक कोंडी सहन करा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) उद्घाटन सोहळा यंदा जुन्या गोमेकॉ इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या जागेत होणार असल्याने 20 नोव्हेंबर रोजी पणजी शहरात वाहतुकीची मोठी कोंडी होईल याची आपणाला जाणीव आहे. मात्र, ह्या अत्यंत महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय कार्यक्रमानिमित्त पणजी व आसपासच्या लोकांनी वरील दिवशी कळ सोसावी आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरून वाद निर्माण करू नये, असे आवाहन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

इफ्फीचा हा सोहळा अत्यंत चांगला व भव्यदिव्य असा असेल. दरवर्षी इफ्फी गोव्यात होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे ह्या एक दिवशी वाहतूक कोंडी सहन करूया, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

यंदा इफ्फीचा उद्घाटन सोहळा हा बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार नसून, तो पणजीत आयनॉक्सजवळील गोमेकॉच्या जुन्या वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या जागेत होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 च्या दरम्यान हा उद्घाटन सोहळा होणार असून, या सोहळ्यामुळे पणजी, मिरामार मार्ग दुपारपासून रात्रीपर्यंत बंद ठेवावा लागणार असल्याने पणजी शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होणार आहे. पत्रकारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना काल त्याबाबत छेडले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

इफ्फी संचालकांच्या शिफारशीनुसार 56 व्या इफ्फीचे उद्घाटन खुल्या स्थळी होणार आहे. त्यानिमित्त पणजीतील जुने सचिवालयापासून कला अकादमीपर्यंत एक भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यात 12 सरकारी चित्ररथ व 11 चित्रपट निर्मिती कंपन्यांचे चित्ररथ असतील. या मिरवणुकीतून गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात येणार असून, शिमगोत्सव व कार्निव्हल यांचा समावेश असेल. त्यानंतर जुन्या गोमेकॉ इमारतीच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळील मोकळ्या जागेत इफ्फीचा उद्घाटन सोहळा होईल.