इंडिया आघाडी 48 तासांत पंतप्रधान निवडेल

0
15

>> स्पष्ट जनादेश मिळेल, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा दावा

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला स्पष्ट आणि निर्णायक जनादेश मिळेल आणि निकालानंतर 48 तासांत पंतप्रधानांची निवड केली जाईल, असा दावा काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. इंडिया आघाडीत जो पक्ष सर्वाधिक जागा मिळवेल, तोच पक्ष पुढच्या नेतृत्वाचा स्वाभाविक दावेदार असेल. सरकार बहुमत मिळाल्यानंतर एनडीएतील काही पक्षही सहभागी होऊ शकतात; मात्र त्यांचा इंडिया आघाडीत समावेश करायचा की नाही, याचा निर्णय काँग्रेस हायकमांडला घ्यावा लागणार आहे, असेही ते म्हणाले.

मला संख्याबळावर बोलायचे नाही, तर निर्णायक बहुमत मिळेल एवढेच सांगायचे आहे. 272 हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे पण तो निर्णायक नाही. जेव्हा मी निर्णायक जनादेश म्हणतो, तेव्हा माझा अर्थ 272 जागांच्या वरची संख्या आहे. इंडिया आघाडीला लोकसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 272 च्या आकड्यापेक्षा जास्त जागा मिळतील, असे रमेश म्हणाले.

ज्या पक्षांत प्रामाणिकपणा आणि माणुसकी आहे, परंतु ते एनडीएमध्ये आहेत, ते इंडिया आघाडीत सामील होतील. जनतेचा जनादेश मिळाल्यावर जे सरकार स्थापन होईल, ते हुकूमशाही नाही, तर ते जनतेचे सरकार असेल, असेही रमेश म्हणाले.
राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेस चांगली कामगिरी करेल आणि महाराष्ट्रात फायदेशीर स्थितीत असेल, असा दावा रमेश यांनी केला. उत्तर प्रदेशातही काँग्रेसला फायदा होईल. भाजपला मात्र 2019 मध्ये मिळालेल्या 62 जागांच्या पुढे जाता येणार नाही, असेही रमेश म्हणाले.