इंग्लंडच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी जोनाथन ट्रॉट

0
143

पाकिस्तानविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने माजी कसोटीपटू जोनाथन ट्रॉट याची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आहे. ट्रॉटचा वॉर्विकशायर संघातील सहकारी व न्यूझीलंडचा ३९ वर्षीय माजी फिरकीपटू जीतन पटेल व वॉर्विकशायरचा जलदगती गोलंदाज ग्रीम वेल्श त्याच्या जोडीला असतील. ब्रुस फ्रेंच यांची यष्टिरक्षक प्रशिक्षक म्हणून तर कार्ल हॉपकिन्सन यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ट्रॉट हा ग्रॅहम थॉर्प यांची जागा घेणार आहे. २०१९च्या विश्‍वचषकापूर्वी मार्क रामप्रकाश यांना हटवण्यात आल्यानंतर संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदासह फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारीदेखील थॉर्प यांच्याकडे देण्यात आली होती.

ट्रॉट याने इंग्लंडकडून ६८ वनडे व सात टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १८,६६२ धावा आहेत. इंग्लंडकडून ५२ कसोटींत त्याने ३८२५ धावा केल्या आहेत. २००९-२०१५ या कालावधीत तो इंग्लंडच्या संघाचा सदस्य होता. कसोटीत प्रथम क्रमांक मिळविलेल्या संघाचादेखील तो भाग होता. इंग्लंडच्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेला बुधवारपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे तर उर्वरित दोन्ही सामने साऊथहॅम्पटनमधील एजिस बाऊल येथे खेळविले जाणार आहेत.