आव्हान राखण्याचे यजमानांचे ध्येय!

0
149

>> विंडीज – इंग्लंड दुसरी कसोटी आजपासून

>> ज्यो रुट याचे पुनरागमन

यजमान इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून खेळविला जाणार आहे. पहिला सामना जिंकून विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून यजमान संघ आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
ज्यो डेन्लीचे अपयश व स्टुअर्ट ब्रॉडच्या अनुभवापेक्षा मार्क वूडच्या वेगाला प्राधान्य दिल्यामुळे इंग्लंडला पहिल्या कसोटीत ४ गड्यांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. नियमित कर्णधार ज्यो रुट यांची अनुपस्थितीदेखील त्यांना जाणावली होती. परंतु, आता रुट संघात परतला आहे. त्याने डेन्लीची जागा घेणे अपेक्षित आहे.

गोलंदाजी विभागात देखील वूडच्या जागेवर स्टुअर्ट ब्रॉडला संघात घेण्याचे संकेत प्रशिक्षक सिल्वरवूड यांनी दिले आहेत. ही दुकली संघात परतल्यास विंडीजला सोपे जाणार नाही. रुटच्या संघात परतण्यामुळे इंग्लंडची फलंदाजी फळी अधिक मजबूत झाली आहे. रुटचा अपवाद वगळता आघाडी फळीतील फलंदाजांकडे कसोटी क्रिकेटचा अल्प अनुभव आहे. त्यांची संघातील जागादेखील निश्‍चित नाही. त्यामुळे चांगले प्रदर्शन करून आपली जागा मजबूत करण्यावर त्यांचा भर असेल. विंडीजच्या फलंदाजांचा फॉर्मदेखील समाधानकारक नाही. आघाडी फळीतील फलंदाजांनी मधल्या फळीतील फलंदाजांना दबावाखाली आणण्याचे काम केले आहे. त्यामुळे सलामीवीर क्रेग ब्रेथवेट, शेय होप, रॉस्टन चेज या अनुभवी फलंदाजांवर विंडीजची मदार असेल. नवोदित ब्रूक्स, कॅम्पबेल यांच्याकडूनही उपयुक्त योगदानाची अपेक्षा आहे.

गोलंदाजीचा विचार केल्यास पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या अनुभवी जेम्स अँडरसनला अपेक्षित यश मिळाले नाही. ‘थुंकी’ बंदीचा परिणाम त्याच्या स्विंगवर झाल्याचे अनेकवेळा दिसून आले. या तुलनेत आर्चरने प्रभावी मारा केला. हंगामी कर्णधार बेन स्टोक्स यानेदेखील आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले. संघातील एकमेव फिरकीपटू डॉम बेस हा मात्र अचूक मारा करूनही बळींच्या बाबतीत थोडा कमनशिबीच ठरला.
विंडीज संघातील गोलंदाजीत वैविध्यता आहे. पण किमार रोच या प्रमुख वेगवान गोलंदाजाचा मंदावलेला वेग व त्यांच्या गोलंदाजीतील बोथट झालेली धार पहिल्या कसोटीत स्पष्ट दिसत होती. वर्षभरापूर्वी ताशी १४०-१४५ किमी वेगाने गोलंदाजी करणारा रोच १३०-१३२ किमीच्या वेगाने पहिल्या कसोटीत गोलंदाजी करत होता. शेन्नन गॅब्रियलने जीव तोडून गोलंदाजी केली असली तरी त्याच्या तंदुरुस्तीची खरी कसोटी दुसर्‍या सामन्यात लागेल. जेसन होल्डरच्या फॉर्मबद्दल वाद नसून अल्झारी जोसेफची चांगली साथ त्याला लाभत आहे. इंग्लंड संघात दोन बदल अपेक्षित असून विंडीज आपल्या संघात बदल करण्याची शक्यता फार कमी आहे. पहिल्या दिवशी वातावरण काहीअंशी ढगाळ असेल.

इंग्लंड संभाव्य ः ज्यो बर्न्स, डॉमनिक सिबली, ज्यो रुट, झॅक क्रॉवली, बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर, डॉम बेस, जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड
वेस्ट इंडीज संभाव्य ः जॉन कॅम्पबेल, क्रेग ब्रेथवेट, शेय होप, शेमार ब्रूक्स, रॉस्टन चेज, जर्मेन ब्लॅकवूड, शेन डावरिच, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किमार रोच व शेन्नन गॅब्रियल.