आल्तिनो येथील न्यायालय फोडले

0
5

>> दागिने व रोख रक्कम लंपास

आल्तिनो, पणजी येथील प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आवारातील मुद्देमाल विभागात चोरीच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. हा चोरीचा प्रकार काल सकाळी उघडकीस आला. न्यायालयाच्या आवारातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे हा चोरीचा प्रकार घडला आहे, असे उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
न्यायालयातील कामकाजाची पूर्ण माहिती जाणून घेऊन ही चोरी करण्यात आली आहे. चोरट्याने मागील बाजूच्या दरवाजातून पळ काढला आहे. संशयित चोरट्याने मंगळवारी कामकाज संपल्यानंतर न्यायालयाच्या आवारात लपून राहून ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चोरट्याने मुद्देमाल असलेल्या विभागातील मुद्देमाल साठवून ठेवलेली कपाटे फोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. चोरट्याने वापरात नसलेल्या जुन्या नोटा नेलेल्या नाहीत, असे पोलीस अधीक्षक वाल्सन यांनी सांगितले.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून संशयित चोरट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक वाल्सन, पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. न्यायालयातील अधिकाऱ्यांकडून मुद्देमालाचा आढावा घेतला जात आहे. पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


चोरट्यांचा कसून शोध
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून संशयित चोरट्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक वाल्सन, पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.