- – डॉ. मनाली महेश पवार
त्वचा म्हणजे जणू आरोग्याचा आरसाच होय. सर्व शरीर व्यापून राहणारे त्वचा हे एकमेव ज्ञानेंद्रिय आहे. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे त्वचा मांसधातूचा उपधातू आहे. आहारापासून रस, रक्त, मांसादी धातू तयार होतात. त्यांचे पोषण होते व त्याप्रमाणे त्वचेचेही पोषण चांगल्या आहारानेच होते.
त्वचा म्हणजे जणू आरोग्याचा आरसाच होय. सर्व शरीर व्यापून राहणारे त्वचा हे एकमेव ज्ञानेंद्रिय आहे. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे त्वचा मांसधातूचा उपधातू आहे. आहारापासून रस, रक्त, मांसादी धातू तयार होतात. त्यांचे पोषण होते व त्याप्रमाणे त्वचेचेही पोषण चांगल्या आहारानेच होते.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे त्वचेची उत्पत्ती सांगताना तापवलेल्या दुधाचे उदाहरण दिले आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे दूध तापत असताना त्यावर साय येते, त्याचप्रमाणे पुरुषबीज व स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ बनत असताना, रक्ताचे पचन होत असताना येणारी साय म्हणजे त्वचा. म्हणूनच आहार जितका सकस तितकाच शुद्ध आराहरस, तितकाच शुद्ध रस, रक्तादी धातू. रक्तधातू जितका शुद्ध असेल तेवढी त्वचा अधिक तेजस्वी व नितळ असते. याउलट चुकीच्या आहार-विहाराने रक्तामध्ये दूषित द्रव्ये, अनावश्यक द्रव्ये साठत गेली की त्याचे पडसाद हलके हलके त्वचेवर उमटायला सुरुवात होते. रक्तधातूबरोबरच त्वचेच्या सौंदर्यासाठी व स्वास्थ्यासाठी रसधातू हाही महत्त्वाचा घटक आहे.
नितळ, नाजूक व सतेज कांतीयुक्त त्वचा ही रसधातू उत्तम व सारवान असल्याचा पुरावाच होय. ही त्वचा जशी अयोग्य आहार-विहाराने बिघडू शकते, तसेच या गुलाबी थंडीतही त्वचेचे काही विकार डोके वर काढतात. अशाप्रकारचे ऋतुपरत्वे आहार टाळण्यासाठीच दिनचर्या व ऋतुचर्या आयुर्वेदशास्त्रात सांगितली आहे.
हिवाळा हा खरे तर सुखद ऋतू. पण या दिवसांत तापमान एकदम कमी होऊन त्वचा व ओठ फुटणे, टाचांना भेगा पडणे, केस कोरडे पडणे या गोष्टी होतातच. जसे आपण थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालून काळजी घेतो, तशीच त्वचेचीही काळजी घेणे गरजेचे आहे.
थंडीत त्वचेतला वात वाढतो आणि त्यातील ओलावा, स्निग्धपणा कमी होतो. कोरड्या त्वचेमुळे दिवसा व रात्रीही त्वचेला खाज येते. स्पर्श खरखरीत होतो. जास्त कोरडी पडली तर त्वचेची सालपटेही निघतात. खासकरून टाचांना भेगा पडतात, ओठ फुटतात, त्वचा खवल्याप्रमाणे दिसते.
काहीजणांमध्ये त्वचेला येणारी खाज इतकी प्रचंड असते की ती खाजवून-खाजवून त्वचेवर ओरखडे पडतात व त्यातून रक्तही निघते. ओठ फुटल्याने खाताना, बोलताना त्रास होतो. कधीकधी चिरा पडून रक्त येते. बोचर्या थंडीमुळे चेहर्यावर कोरडेपणाचे डाग पडतात. त्वचेवर सतत कसला तरी पॅक लावल्यासारखा, खेचल्यासारखा वाटतो. त्वचेतून स्निग्धता, ओलावा निघून गेल्याने चेहरा निस्तेज वाटतो.
वरील सर्व त्वचेच्या तक्रारी टाळण्यासाठी त्वचेची सातत्याने काळजी घेणे, निगा राखणे गरजेचे आहे. त्रिदोषांपैकी वातदोष व पित्तदोष- दोघांचेही त्वचा हे स्थान आहे. औषध शरीरामध्ये प्रवेशित करण्यासाठी त्वचा हे एक महत्त्वाचे साधन आहे असे आयुर्वेदात समजले जाते. उदा.
- औषधी तेलाने अभ्यंग करणे.
- औषधी द्रव्यांचा शरीरावर लेप करणे.
- औषधांबरोबर तांदूळ, उडीद, कुळीथ वगैरे धान्ये शिजवून त्याच्या सहाय्याने शरीरावर मसाज करून आतील शरीरघटकांची झीज भरून काढण्याचा प्रतत्न करणे.
अशा अनेक प्रकारे त्वचेसाठी उपयोग आयुर्वेदशास्त्राने करून घेतलेला आहे. या सर्व उपायांनी त्वचेचे पोषण होते, औषधी घटक शरीराच्या आतपर्यंत पोचवले जातात व अपेक्षित कार्यसिद्धी होते. - चांगल्या आयुर्वेदिक तेलाचे संपूर्ण शरीरावर अभ्यंग करावे.
- खोबरेल तेलाचा अंश असलेला उत्तम दर्जाचा साबण किंवा उटणे लावावे.
- त्वचेला लावण्यासाठी दुधावरची साय किंवा ताज्या कोरफडीचा रस, नारळाचे दूध, चण्याचे पीठ, चंदन वापरल्याने त्वचा चांगली होते.
- पंचकर्मापैकी विरेचन व अनुवासन बस्तीचा खूप चांगला उपयोग होतो. पंचकर्मामुळे एकूणच शरीराचा कायाकल्प होत असल्याने त्वचेचे वय कमी दिसून त्वचा सुंदर व आकर्षक दिसते.
उत्तम अशा त्वचेसाठी आपल्या रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश या दिवसांत जरूर करावा.
- लोणी ः ‘वर्णबलाग्निकृत्’ म्हणजेच ताजे घरचे लोणी हे वर्ण, बल व अग्नी यांची वृद्धी होण्यास उत्तम होय.
- तूप ः ‘कान्तिसौकुमार्वस्वरार्थिनाम्’ – घरचे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले साजूक तूप उत्तम कांतीचा लाभ करून देते.
- दूध ः ‘जीवनीयं रसायनम्’ म्हणजेच रस, रक्त, मांस अशा त्वचेसाठी आवश्यक असणार्या सर्वच शरीरघटकांना पोषण देणारे आहे व म्हणूनच पर्यायाने त्वचेच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे.
- केशर ः ‘कायाकान्तिकृत’- त्वचेची कांती वाढवून शरीर तेजःपुंज करणारे आहे.
- मध ः वर्ण्य तसेच प्रसादन करणारा सांगितलेला आहे.
- हळद ः ‘वर्णकटी विशोधनी’- वर्ण सुधारणारी व त्वचा शुद्ध करणारी म्हटलेली आहे.
चंदन, केशर, क्षीरकाकोली, श्वेतदूर्वा, ज्येष्ठमध, पद्मकाष्ठ, वाळा, मंजिष्ठा, अनंता ही औषधे वर्ण्य आहेत. या औषधांचा उपयोग वैद्याच्या सल्ल्यानेच करावा.
त्वचेची काळजी
- त्वचा कोरडी झाल्यास, फुटत असल्यास दुधाची साय किंवा लोणी किंचित हळदीसह हलक्या हातांनी चोळावे.
- पाव चमचा लिंबाचा रस व थोड्या पाण्यामध्ये एक चमचा जिर्याची पूड व चमचाभर बेसन रात्रभर भिजत घालून ते सकाळी आंघोळीपूर्वी अंगाला लावावे व कोमट पाण्याचे आंघोळ करावी. याने त्वचा सतेज दिसते.
- चंदन व बदाम पाण्यात किंवा दुधात सहाणेवर उगाळून तयार केलेल्या गंधात दोन चिमूट हळद घालून हे मिश्रण चेहर्यावर २० ते २५ मिनिटे लावावे व नंतर कोमट पाण्याने धुवावे. याने त्वचा सतेज व मुलायम होते.
- त्वचा सतेज होण्यासाठी चंदन व दालचिनीचा लेपही उपयोगी पडतो.
- दोन चमचे बेसन, पाव चमचा हळद, चिमूटभर कापराचे चूर्ण एकत्र करून आंघोळीच्या वेळी साबणाऐवजी वापरल्यास त्वचा सतेज व मऊ होते.
- संत्र्यांच्या सालींची पेस्ट किंवा पावडर दुधात कालवा आणि चेहर्याला लावा. १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा म्हणजे चेहर्यावर सतेजपणा येईल.
- आंघोळीसाठी गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करावा.
- आंघोळीच्या वेळी साबण, फेसवॉश किंवा बेसनादी पीठाचा कमीत कमी वापर करावा. थंडीत त्वचा घासणे नक्कीच टाळावे.
- टॉवेलने त्वचा खसाखसा पुसू नये. मॉईश्चराइज्ड म्हणून तूप, तेल (तीळ) किंवा लोणी वापरावे.
आहार सकस घ्यावा व आपल्या त्वचेची काळजी घ्यावी.