Home बातम्या आर्या यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास नकार

आर्या यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास नकार

0

गोव्याचे पोलीस महासंचालक डॉ. आदित्य आर्या यांच्या विरोधात सादर केलेली फसवणुकीची तक्रार दाखल करून घेण्यास पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक रमेश गावकर यांनी नकार दिला आहे.

गोव्याचे पोलीस महासंचालक डॉ. आदित्य आर्या यांनी केलेल्या गोकर्ण दौर्‍यासंदर्भात ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केलेली तक्रार हा दखलपात्र खटला होत नसल्याचे निरीक्षक रमेश गावकर यांनी ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

गोव्याचे पोलीस महासंचालक डॉ. आदित्य आर्या यांनी १६ ऑक्टोबर रोजी कर्नाटक राज्यातील गोकर्ण या ठिकाणी जाण्यास जीए ०८, जी-००६४ या क्रमाकांच्या सरकारी वाहनाचा दुरुपयोग करीत ३९३ किलोमीटरचा खाजगी प्रवास केला असून त्यामुळे सरकारी तिजोरीला नुकसान झाले असल्याची तक्रार ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी पणजी पोलिस स्थानकात दाखल केली होती. सरकारच्या नियमानुसार सरकारी वाहन राज्याबाहेर न्यायचे झाल्यास त्यासाठी मुख्य सचिवांची लेखी परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे, याकडे ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी तक्रारीत लक्ष वेधले आहे. पोलीस महासंचालक डॉ. आदित्य आर्या यांनी सदर कृती हा फसवणुकीचा प्रकार असून भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत सदर गुन्हा हा शिक्षापात्र असल्याचेही आयरिश यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे.