आरक्षणाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस घेणार राज्यपालांची भेट ः शेख

0
6

कॉंग्रेस पक्षाच्या कॉंग्रेस भवन – पणजी येथे काल झालेल्या नवनिर्वाचित गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती प्रतिनिधींच्या बैठकीत राज्यातील पदव्युत्तर स्तरावरील वैद्यकीय आणि दंतविज्ञान अभ्यासक्रमांमध्ये ओबीसी, एससी आणि एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावर गोव्याच्या राज्यपालांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी दिली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर होते. बैठकीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, केपेंचे आमदार एल्टन डिकॉस्टा, हळदोणेचे आमदार कार्लोस अल्वारेस फेरेरा, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन आदींची उपस्थिती होती.
ओबीसी, एसटी आणि एससीसाठी वैद्यकीय अभ्यासक्रमात पदव्युत्तर स्तरावरील जागा राखीव ठेवण्याच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. सदर मागणीसाठी चालू असलेल्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात राज्यपालांना भेटून ओबीसी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्याचेही ठरले, असे वरिष्ठ उपाध्यक्ष शेख यांनी सांगितले.

या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यात आला. तत्काळ सर्व गट समित्या आणि दोन्ही जिल्हा समित्यांचे फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि विधिमंडळ गटनेते युरी आलेमाव यांनी भारत जोडो यात्रेत भाग घेतल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीची व चर्चेची माहिती प्रतिनिधींना दिली. राहुल गांधींनी पक्ष बांधणीसाठी केवळ निष्ठावान आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांनाच जबाबदार्‍या देण्याची सूचना केल्याचे स्पष्ट केले.