आयपीएल सामन्यावर सट्टाप्रकरणी 14 जणांना अटक

0
3

>> पर्वरी येथे परप्रांतीय टोळीविरोधात पोलिसांची कारवाई

>> संशयितांकडून 25.38 लाखांचे साहित्य जप्त

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने पर्वरी येथे आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश केला असून 14 जणांना अटक काल केली आहे.
पोलिसांनी रोख 38 हजार रुपये, 47 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप, 3 एलईडी टीव्ही, 3 नेट राऊटर, 3 टाटा स्काय सेट टॉप बॉक्स, एक राऊटर मोडेम आणि इतर गेमिंग इलेक्ट्रिक उपकरणे असा एकूण 25 लाख 38 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये बाराजण छत्तीसगडचे रहिवासी असून बिहार, उत्तर प्रदेश येथील दोघांचा समावेश आहे. पर्वरी येथील विद्या एन्क्लेव्ह येथे डायनेस्टी व्हिला नंबर 1 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन सामन्यावर सट्टा घेतला जात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रणजीत गणेश गेडाम (28 वर्षे), प्रवीण राजपूर सिंग (24 वर्षे), अंकित चंद्रभूषण चौधरी (24 वर्षे), नंदा किशन मुरलीझर दलवानी (54 वर्षे), ज्योतिप्रकाश कौशल रे किशन (38 वर्षे), केशम कुमार विजय यादरो (20 वर्षे), अयाज खान नियामत खान (26 वर्षे), जगदिश अर्जुन वर्मा (24 वर्षे), कवल प्रीतम सिंग (40 वर्षे), पंकज गौतम चौरे (27 वर्षे), मनजीत सिकतान सिंग (41 वर्षे), नितीश बालेंद्र पांडे (19, हे सर्व मूळचे छत्तीसगडचे रहिवासी), मोहितकुमार ब्रिजदेव तिवारी (28 वर्षे, बिहार) आणि राजन राकेश दुबे (23 वर्षे, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी गोवा जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 आणि 4 खाली सर्व संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.