Home बातम्या आयपीएल सट्टेबाजीप्रकरणीसांगोल्ड्यातून 6 जण अटकेत

आयपीएल सट्टेबाजीप्रकरणीसांगोल्ड्यातून 6 जण अटकेत

0

गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने सांगोल्डा बार्देश येथे 15 एप्रिल रोजी मध्यरात्री छापा घालून ऑनलाईन आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी 6 जणांना अटक केली. संशयित आरोपींकडून 6 लॅपटॉप, 31 हजार रुपये रोख, 50 एटीएम कार्ड, अनेक म्युल अकाउंट किट्स आणि मोबाईल फोन जप्त केले. जप्त केलेल्या ऐवजाची एकूण किंमत 10 लाख रुपये आहे. या सट्टेबाजी प्रकरणामध्ये संशयित आरोपी म्हणून राज दिलीपभाई गेडीया नीलेश रतीभाई हिरानी, शनी दीपकभाई चावडा (सर्व रा. सुरत, गुजरात), भीमराज मीणा (रा. उदयपूर, राजस्थान), रोकाड यश जयसुखभाई (रा. अमरेली, गुजरात) आणि प्रशांत हरिश त्रिवेदी (रा. वर्धमान, पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या नावांनी आणि क्रेडेन्शियल्सवर नोंदणीकृत असलेल्या आणि वाय-फायने जोडलेल्या अनेक मोबाईल फोनद्वारे एमजी लायन आणि कबूक 1 या बेटिंग ॲप्सवरील क्रिकेटच्या बेट्स ऑनलाइन स्वीकारताना आणि हे बेटिंगचे पैसे आरोपींनी चालवलेल्या अनेक म्युल खात्यांमध्ये हस्तांतरित करताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले, अशी माहिती सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक राजू राऊत देसाई यांनी दिली.