आयडीसीच्या भूखंड शुल्कवाढीला उद्योजकांचा विरोध

0
112

>> गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि औद्योगिक वसाहत असोसिएशनच्या बैठकीत संताप

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स र्ऍड इंडस्ट्रीज आणि औद्योगिक वसाहत असोसिएशन यांच्या काल झालेल्या संयुक्त बैठकीत औद्योगिक वसाहतीमधील भूखंड शुल्कवाढीला विरोध करण्यात आला.

राज्य सरकारच्या औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक वसाहतीतील भूखंडांसाठीच्या वार्षिक शुल्कात वाढ केल्याने उद्योग क्षेत्रात नाराजी पसरली आहे. महामंडळाच्या भाडेवाढीच्या विरोधात उद्योजकांनी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स या राज्यव्यापी संघटनेकडे तक्रार केली आहे.

गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने वसाहतीतील भूखंडांच्या शुल्कवाढीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी काल एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शुल्कवाढीवर चिंता व्यक्त करण्यात आली. शुल्कवाढीमुळे उद्योजकांना आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
उद्योजकांकडून विविध कराच्या माध्यमातून सरकारकडे शुल्क भरणा केला जातो. तसेच वीज, पाणी व इतर शुल्कही भरले जातात. शुल्कवाढ कमी करण्यासाठी गोवा औद्योगिक विकास महामंडळाला निवेदन सादर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

साधन सुविधांच्या देखरेखीसाठी सरकारने महामंडळाला वार्षिक अनुदान द्यावे किंवा साधन सुविधांची देखभाल सार्वजनिक बांधकाम, वीज खात्याकडे द्यावी, अशी सूचना करण्याचे ठरविण्यात आले आहे. महामंडळ उद्योजकांना योग्य साधनसुविधा उपलब्ध करण्यात अपयशी ठरले आहे, अशी उद्योजकांची तक्रार आहे.