आमदार रोहन खंवटे कॉंग्रेसच्या वाटेवर

0
22

>> अनेक कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे हे गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लवकरच कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असून खंवटे यांचे खंदे समर्थक असलेले जिल्हा पंचायत सदस्य गुपेश नाईक यांच्यासह खंवटे यांच्या अन्य कित्येक समर्थकांनी काल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यात साल्वादोर-द-मुंद व पेन्ह-द-फ्रान्स या पंचायतीच्या पंच सदस्यांचा समावेश आहे.

दरम्यान, काल पत्रकार परिषदेत बोलताना रोहन खंवटे यांनी आपण लवकरच कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. राज्यातील भाजप सरकारचा पराभव करण्याची गरज असून त्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत खंवटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
सर्वधर्म निरपेक्ष विरोधी पक्षांनी कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली एकत्र येऊन सत्ताधारी भाजपचा पराभव करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आपण कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस नेत्यांनी आपणाशी संपर्क साधला असून कॉंग्रेस नेत्यांबरोबर आपली बोलणी चालू असल्याचे खंवटे यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षाची पाळेमुळे गोव्यात रूजलेली आहेत व भाजपचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे हात बळकट करण्याची गरज असल्याचे खंवटे म्हणाले.

तृणमूल कॉंग्रेस हा पश्‍चिम बंगालमधील पक्ष असून गोव्यात तो नुकताच आलेला आहे. अन्यही काही पक्ष गोव्यात आलेले असून कोण मोफत वीज, तर कोण आणखी काही मोफत देण्याची घोषणा करीत आहेत. असे असले तरी ऐन निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात आलेल्या या पक्षांना राज्यात स्थान नसल्याचे खंवटे म्हणाले. कॉंग्रेस पक्षच भाजपचा पराभव करू शकतो असे सांगून कॉंग्रेसचेच हात बळकट करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.