आमदारांची अपात्रता याचिका ः ७ ऑगस्टला सुनावणी

0
136

कॉंग्रेस पक्षातून राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेले दहा आमदार व मगोतून राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेले दोघे आमदार अशा बारा आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर येत्या ७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, मगो पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले दोघे आमदार बाबू आजगावकर व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पावस्कर यांच्याविरुद्धची मगो पक्षाची अपात्रता याचिका काल सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. त्यासंबंधीची सुनावणी काल सर्वोच्च न्यायालयात झाली.

कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेलेल्या दहा आमदारांविरुद्ध कॉंग्रेस पक्षाने जी अपात्रता याचिका दाखल केलेली आहे, ती याचिका व मगोची याचिका सर्वोच्च न्यायालयाने एकत्र सुनावणीसाठी घेतलेली असून ही सुनावणी आता येत्या ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

सुनावणी विनाविलंब
घ्यावी : ढवळीकर
दरम्यान, मगोचे नेते व याचिकादार सुदिन ढवळीकर यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले, आपल्या याचिकेवर विनाविलंब सुनावणी घेऊन ती गोवा विधानसभेच्या सभापतींना लवकरात लवकर निकालात काढायचा आदेश द्यावा. तसेच या याचिकेवरील निकाल येईपर्यंत मगोतून फुटून गेलेल्या दोन्ही आमदारांना त्यांच्या पदावरून पायउतार करण्यास सभापतींना आदेश द्यावेत, अशी विनंती आपण आपल्या याचिकेतून सर्वोच्च न्यायालयाकडे केल्याचे ढवळीकर म्हणाले. ही सुनावणी व्हर्च्युअल पद्धतीने झाली व गोव्यातून आपण व आपले ऍड. कार्लुस परेरा हे त्यात सहभागी झाल्याचे ते म्हणाले.