‘आप’ गोव्यात ३५ जागा जिंकणार

0
93

>> मडगावात महिला संवाद कार्यक्रमात अरविंद केजरीवाल यांचा दावा

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनोहर पर्रीकर यांनी भ्रष्टचारमुक्त सुशासन देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवू जनतेने भाजपाला बहुमताने सत्तेवर आणले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत कॉंग्रेसपेक्षा जास्त भ्रष्टाचार करून भाजपाने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. सध्या कॉंग्रेस निपचित पडली असल्याने आगामी निवडणुकांत गोव्यात भाजपा व आम आदमी पक्षामध्ये स्पर्धा खरी आहे. गोव्यातील जनतेकडून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिल्यानंतर या निवडणुकीत राजकीय क्रांतीची खात्री असून ३५ जागा जिंकून आम आदमी पक्ष गोव्यांत सरकार स्थापन करणार अशी खात्री आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.
काल मडगाव येथील आदर्श सभागृहात प्रचंड संख्येने उपस्थितीत असलेल्या महिलांच्यासमोर दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी महिलांशी वार्तालाप केला. आदर्शमधील दोन्ही सभागृहे पुरुष व महिला, तरूणांनी भरली होती. सासष्टी तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी सरकार विरोधातील तक्रारी व मागण्या मांडल्यानंतर केजरीवाल यांनी शंकांचे निरसन करीत भाषण केले.
गोव्यात कॅसिनो जुगाराला सरकारने मान्यता दिली. अमली पदार्थ व्यवहार पोलिसांच्या डोळ्यांदेखत चालत असल्याचा आरोप करून राजकारण्यांच्या दबावाखाली ते कारवाई करीत नाहीत. सरकारातील सर्व मंत्री भ्रष्टाचारांत गुंतलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामाच्या फाईली सरकार दरबारांत फिरत राहतात. हे घाणेरडे राजकारण गोव्यात चालू असल्याने सामान्य जनतेमध्ये असंतोष पसरला आहे. एकवेळ आम आदमी पक्षाला सत्ता द्या. सर्व प्रश्‍न सोडवू असे आश्‍वासन देत त्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे असे केजरीवाल यांनी सांगितले.
सत्तेवर आल्यास विशेष दर्जा
भाजपाने गोव्याला खास राज्याचा दर्जा देण्याचे आश्‍वासन दिले होते. केंद्रात व गोव्यांत भाजपाचे सरकार असल्याने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना हवे असल्यास ते विनाविलंब दर्जा मिळवून देऊ शकतात. पण त्यांना दिलेली आश्‍वासने पाळण्याची वृत्ती नाही, असा टोला केजरीवाल यांनी लगावला. आपले सरकार आल्यानंतर सर्वप्रथम राज्याचा दर्जा मिळवून देऊ. गोव्याला खास राज्याच्या दर्जाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीत आपले सरकार येण्या अगोदर २००६ पासून झोपडपट्टी विभागात पाणी पुरवठा व शौचालये नव्हती. सरकार आल्यानंतर गरजेनुसार सार्वजनिक शौचालये बांधण्याचे काम हाती घेतले असून मार्च २०१७ पर्यंत ते पूर्ण होईल. गोव्यांतही झोपडपट्टी विभागात स्वच्छता, पाणी पुरवठा व शौचालये बांधण्यात येतील, असे आश्‍वासन त्यांनी दिले. गोव्यातील मांडवी पुलासाठी ४०० कोटींचा अंदाज होता. आतापर्यंत ८०० कोटी खर्च झाले आहेत, ही दु:खाची गोष्ट असल्याचे सांगून आपण दिल्लीत तीन उड्डाण पूल अंदाजापेक्षा दोनशे कोटी कमी खर्चून बांधले अशी माहिती त्यांनी दिली. गोव्यांतील जनतेला प्रामाणिक सरकार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
गोव्यातील जनतेने अजेंडा ठरवावा. आम्ही दिल्लीहून ठरविणार नाहीत असेही त्यांनी सांगितले. या चर्चेच्या वेळी अनेक महिलांनी मागण्या केजरीवाल यांना सादर केल्या.