आपली जलसंस्कृती व अपेक्षित कृती

0
342
  • श्रीरंग व्यंकटेश जांभळे

पाणी एवढे अमूल्य असूनही पाणी विनामूल्य असल्याप्रमाणे आपण वागतो. दैनंदिन घरगुती वापरासाठी अनियंत्रित नळ सोडणे, शॉवरचा वापर, पिण्यासाठी वापरायला घेतलेले व पिउन उरलेले पाणी टाकून देणे, नळ – पाईपलाईन गळणे याद्वारे आपण बरेच पाणी फुकट घालवतो.

स्वतःला खरोखर किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले आणि या मुद्याचा प्रसार केला तरी खूप काही साध्य होईल.

‘जल म्हणजे जीवन’ या वाक्यानेच पाण्याचे महत्त्व अधोरेखित होते. पुरातन काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये पाण्याचे असलेले पूजनीय स्थान पुरातन साहित्यातून प्रतिबिंबित होते. वेद, पुराणे यामध्ये तर पाण्याविषयी सुक्ते आढळतात. भारतीय परंपरांचा पर्यावरण संरक्षणाशी खूप जुन्या काळापासून संबंध आहे. प्रकृती संवर्धन व संरक्षणाचे संस्कार भारतदेश सोडून अन्य ठिकाणी अभावानेच आढळतात. पाश्‍चात्य देशांनी निसर्गाचे अमाप नुकसान केले आहे. आपल्या सनातन परंपरांमध्ये निसर्गाला देवता मानून त्याच्या संरक्षणाची सूत्रे सांगितली आहेत. यात वनस्पती, नदी, पर्वत, ग्रह, नक्षत्र, अग्नी, वायुसहित प्रकृतीच्या विभिन्न रुपांशी मानवी नाते जोडले आहे. वृक्षाची तुलना आपल्याशी केली आहे तर नदीला माता म्हटले आहे. ग्रह, नक्षत्र, पर्वत, वायु, अग्नी यांना देव मानले आहे. म्हणूनच प्राचीन काळापासून भारतात प्रकृतिसोबत संतुलनपूर्ण व्यवहार ठेवण्याचा संस्कार आहे. आपल्या ऋषींना ज्ञात होते की पृथ्वीचा आधार जल आणि जंगल आहे. म्हणूनच त्यांनी पृथ्वीच्या रक्षणासाठी वृक्ष आणि पाणी महत्त्वाचे मानले आणि सांगितले- ‘वृक्षाद् वर्षति पर्जन्यः पर्जन्यादन्न संभवः’- अर्थात वृक्षांमुळे जल व पाण्यामुळे अन्न संभवते. भारतीय संस्कृतीत जलस्रोतांचेही मोठे महत्त्व आहे. बहुतेक गाव नदीकिनारी वसले आहेत. जे गाव नदीकिनारी नाहीत तिथे गावकर्‍यांनी मोठे तलाव बनवले आहेत. नदी किंवा तलावाशिवाय गाव/नगराची कल्पनाच केली गेली नाही. घराच्या जवळ शुद्ध जलयुक्त जलाशय असावा असे अथर्ववेदात सांगितले आहे. शुद्ध पाण्याशिवाय जीवन केवळ अशक्य आहे.

जलस्रोतांच्या संवर्धन व संरक्षणासाठी म्हणूनच ऋषीमुनींनी मार्गदर्शन केले आहे. पूर्वजांनी अखंड प्रवाहमान गंगा, यमुना, सरस्वती यांनाच नव्हे तर सर्व जीवनदायिनी नद्यांना माता म्हटले आहे. धार्मिक कार्यक्रमांच्यावेळी म्हणून जलयुक्त कलशाची पूजा केली जाते. महर्षि नारदांनी सर्वत्र विभिन्न स्वरुपात पाणीच असून पाणी म्हणजेच ब्रह्मा असल्याचे सांगितले आहे. कौटिल्याने अर्थशास्त्रविषयक ग्रंथात राजाच्या कर्तव्यांची यादी करताना जनतेसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याला प्राधान्य दिले आहे.

मानवी जीवनात पाण्याला अत्यंत महत्त्व आहे. पृथ्वीवर पाणी मुबलक आहे पण हे सर्वच पाणी मानवासाठी उपयोगी नाही. पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या साठ्यापैकी ९७% पाणी महासागरात खार्‍या पाण्याच्या स्वरुपात आहे व फक्त ३% गोड्या पाण्याच्या स्वरुपात आहे. परंतु या ३% पाण्यापैकी २.१% पाणी घनस्वरुपात आहे. त्यामुळे माणसाला त्याचा विशेष उपयोग होत नाही तर फक्त ०.९ टक्के पाण्याचाच, जे पाणी नद्या, सरोवरे, तलाव, विहिरी इ.च्या स्वरुपात आहे. त्याचाच उपयोग करावा लागतो.

गोवा हे किनारपट्टीवरील राज्य आहे. राज्यात वर्षाला सरासरी ३००० मिमिपेक्षा जास्त पाऊस पडतो. पश्‍चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या काही गावात तर ३५००मिमिपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचे आढळते. प्रत्येक गावात लहान-मोठ्या तळ्या आहेत, ज्यातील पाण्याचा वापर घरगुती कामे व शेतीसाठी केला जातो. खाजन शेतीमध्ये ‘पोंय’ (अंतर्गत पाण्याचे नाले) तेथील सजीव सृष्टी समृद्ध करतात. पावसाचे पाणी ओहोळांद्वारे नदीकडे धाव घेते. या प्रवाहादरम्यान ओहोळाच्या काठावर व परिसरात असलेली शेती-बागायती पिकवण्यासाठी याच पाण्याचा बांधबंदिस्ती करुन नंतर उपयोग केला जातो. तसेच विविध वनस्पती, प्राणी यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी आवश्यक वातावरण निर्मितीमध्येही या पाण्याचा मोठा सहभाग आहे. राज्यात ११ मुख्य नद्या वाहतात. या नद्या म्हणजे राज्याची जीवनरेखा आहेत. याला ४० उपनद्या जोडलेल्या आढळतात. गोव्यातील मासेमारी, पर्यटन, अंतर्गत मालवाहतूक यासारख्या आर्थिक गतिविधी मोठ्या प्रमाणात यावर अवलंबून आहेत. ज्या हिरवळ आणि समुद्रासाठी गोवा जगात परिचित आहे, ज्याच्यावर येथील पर्यावरणीय चक्र व त्यावर अवलंबून असलेली निसर्गातील असंख्य साधने अवलंबून आहेत व ज्याच्यावर पर्यायाने माणसाचे जीवन व उद्योग जोडलेले आहेत. या सर्वाचा आत्मा पाणी हाच आहे. आत्मा गेल्यावर शरीर निरुपयोगी होते अर्थात आत्म्यामुळे शरीराला किंमत आहे. तद्वतच पाण्यामुळे या सृष्टीला किंमत व अर्थ आहे. म्हणून पाण्याला जपणे म्हणजे आत्म्याला जपण्याासरखे आहे.

  • जागतिक जल दिन –

आपल्याकडे असलेल्या पाण्याचे महत्त्व लोकांना कळावे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने २२ मार्च १९९३ पासून ‘जागतिक जल दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. प्रतिवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या देशांकडून हा दिवस साजरा केला जातो. त्यासाठी प्रतिवर्षी एक नवी संकल्पना मांडली जाते. त्या संकल्पनेला अनुसरून वर्षभर उपक्रम राबवले जातात. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्‍वत संरक्षणासाठी कार्यरत रहावे याचा संदेश देण्यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे. सन २०२१ साठीची संकल्पना पाण्याच्या मूल्याशी संबंधित आहे. पाण्याची पैशांमध्ये व्यावहारिक किंमत केली जाते. परंतु पाणी अमूल्य आहे. जलस्रोतांशी निगडित पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांचा विचार केल्यास या जलस्रोतांचे मूल्य फारच जास्त आहे, हे लक्षात येते. प्राणवायूनंतर पाणी हा जीवनासाठी सर्वांत महत्त्वाचा नैसर्गिकरीत्या उपलब्ध घटक आहे.

  • पाण्याचा दैनंदिन र्‍हास –

पाणी एवढे अमूल्य असूनही पाणी विनामूल्य असल्याप्रमाणे आपण वागतो. दैनंदिन घरगुती वापरासाठी अनियंत्रित नळ सोडणे, शॉवरचा वापर, पिण्यासाठी वापरायला घेतलेले व पिउन उरलेले पाणी टाकून देणे, नळ – पाईपलाईन गळणे याद्वारे आपण बरेच पाणी फुकट घालवतो. गटार, ओहोळ पाण्याच्या वहनासाठी स्वच्छ व मोकळे असण्याची आवश्यकता असतानाही इतस्ततः कचरा फेकण्याच्या आपल्या सवयीमुळे गटारे तुंबलेली आढळतात. पाणी प्रवाही असणे पाण्याच्या गुणवत्तेच्या दृष्टीने आवश्यक असते. परंतु या तुंबलेल्या पाण्यात डास, शेवाळे वाढल्यामुळे दुर्गंधी वाढते, पर्यावरण बिघडते व मानवी आरोग्यालाही धोका संभवतो. बांधकाम खातेही गटारांचे बांधकाम करताना तळाला कॉंक्रीटचा वापर करण्यासंबंधी आराखडे मंजूर करते. किंबहुना अशाच आराखड्याचा नमूना गटार बांधकामासाठी खात्याने तयार केला आहे. यामुळे पाणी जिरण्याची प्रक्रियाच बंद होते. आल्तिनोसारख्या डोंगराळ भागातून अशा पाणी न जिरणार्‍या व उताराकडे घसकन् पाणी वाहून जाणार्‍या मॉडेल(?) गटारांमुळे पणजीच्या सखल भागात मोठ्या पावसादरम्यान पाणी तुंबण्यास मदत होते. यामुळे सखल भागातील लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो. ओहोळ व पाण्याचे अन्य स्रोत कचरा फेकल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेले आपण पाहतो. यामुळे पाण्याच्या बायॉलॉजिकल ऑक्सीजन डिमांड (बीओडी)मध्ये वाढ होते. त्यामुळे पाण्यातील जीवजंतूंवर याचा विपरीत परिणाम होतो. पाण्याला दुर्गंधी येते. पर्यावरण बिघडल्याने रोगराई पसरते. ओहोळ व नदीच्या किनारी उघड्यावरील प्रातर्विधीमुळे हे महत्त्वाचे पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचेही आढळते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी याची पाहणी केली आहे. सद्यस्थितीत वाळू काढण्याचे अनियंत्रित व मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर काम गोव्यात चालू आहे. या कामासाठी परराज्यातून आलेले मजूर बेकायदेशीर झोपडपट्‌ट्यातून वास्तव्य करतात व सर्व नैसर्गिक विधी नदीच्या पाण्यातच करतात. अशामुळे पाण्यातील ई.कोलाय नावाचे बॅक्टेरीया मोठ्या प्रमाणात वाढल्याचे अहवाल सरकार दरबारी आहेत. यामुळे गोव्यातील महत्त्वाच्या नद्यांतील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे आढळले आहे.

  • अपेक्षित कृती –

स्वतःला खरोखर किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले आणि या मुद्याचा प्रसार केला तरी खूप काही साध्य होईल. आणखी एक उपाययोजना म्हणजे, आटलेले व दुर्लक्षित जलस्रोत उदा. पाणलोट क्षेत्र, ओढे, तलाव, विहिरी इत्यादींना पुनर्जीवित करणे आणि वाहून वाया जाणारे गोडे पाणी बंधारे घालून अडवणे, जिरवणे, साठवणे. जलसंधारण ही काळाची गरज आहे. पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, पर्यावरण संवर्धनासाठी, अन्नधान्यसमृद्धीसाठी, उद्योगधंद्यांच्या विकासासाठी, विद्युतनिर्मितीसाठी व इतर मनोरंजनाच्या साधनांसाठी पाण्याचा पुरवठा नियमित करणे हे जलसंधारणाचे मुख्य उद्दिष्ट असावे. पाण्याचा अपव्यय टाळणे, प्रदूषण टाळणे हे अत्यंत आवश्यक आहे. जलसाक्षरता गरजेची आहे.
कोणत्याही लोकोपयोगी योजनांसाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी आपली अपेक्षा असते. परंतु शासन दरबारी आर्थिक प्राथमिकतांचा अभाव, अस्थिर सत्ता, इच्छाशक्तीचा अभाव अशा विविध समस्यांमुळे या योजना प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत. यासाठी सामाजिक चळवळी व प्रयत्नांतूनच या समस्यांवर मात केली पाहिजे. यासाठी अनेक चळवळी व या चळवळींतून उभे राहिलेले यशस्वी प्रयोग सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायक आहेत. आपली सांस्कृतिक मुल्ये अक्षुण्ण ठेवणारी प्रत्येक कृती महत्त्वाची आहे, समाजहितासाठी ती आवश्यक आहे.