आरसा

0
437
  • प्राजक्ता प्र. गावकर
    (नगरगाव- वाळपई)

वय लपवण्यासाठी आपण केसांना कलप लावतो. चेहर्‍याच्या सुरकुत्या घालवण्यासाठी, चेहरा कांतीमय दिसण्यासाठी आपण फेशियल करतो. पण याचा उपयोग फक्त दहा-पंधरा दिवसांपुरताच. पंधरा दिवसांनी आरसा तुम्हाला वाढत्या वयाची जाणीव करून देतोच.

प्रत्येक माणसाला एक सवय असते- स्वतःला आरशात पाहण्याची. ‘मी कसा दिसतो?’ ‘मी कशी दिसते?’ हा प्रश्‍न बहुतांश सर्वच स्त्री-पुरुषांना पडलेला असतो.

आरशाला संस्कृतमध्ये ‘दर्पण’ म्हणतात तर हिंदीमध्ये ‘आईना’ असे म्हणतात. तर असा हा आरसा स्त्रीवर्गाचा तर अत्यंत जिव्हाळ्याचा दोस्त! समस्त स्त्रीवर्ग आपल्या पर्समध्ये छोटासा का होईना एक आरसा बाळगतात.
कुठेही प्रवासाला गेलेल्या ठिकाणी ‘केस विस्कटले तर नाहीत ना?’, ‘चेहरा खराब तर झाला नाही ना?’… हे प्रश्‍न आरसा जवळ असल्यास उद्भवत नाहीत.

हे आपण भिंतीवरच्या आरशाबद्दल म्हणतो आहोत. पण आपल्या मनाचा आरसाच जर स्वच्छ नसेल तर… आपण स्वतःला कधीही सुंदर म्हणू शकणार नाही. कारण आपले मन हासुद्धा एक आरसाच आहे. जर आपले मन स्वच्छ असेल तर आपला चेहरा आपल्याला सुंदर दिसेल. चेहराच का..सारे जग सुंदर दिसेल. अस्वच्छ मनाला जगातली कोणतीही वस्तू अगर गोष्ट सुंदर दिसत नाही.

छोटा नरेंद्र लहान असताना ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्या गुरुगृही राहत होते. त्यांचे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस सर्व शिष्यांना सारखीच शिकवण देत असत. अत्यंत तेजस्वी बुद्धिमत्ता लाभलेला नरेंद्र सर्व विद्यांत चांगला निपुण झाला. ते पाहून इतर शिष्य त्याचा द्वेष करत.

एकदा रामकृष्ण आपल्या सर्व शिष्यांना म्हणाले, सुविचार लिहून दाखवा. त्यांच्या एका शिष्याने लिहिले, ‘‘मन हा एक आरसा आहे. त्यावर धूळ, घाण बसू देऊ नये’’. गुरुदेवांनी त्याला शाबासकी दिली. नंतर त्यांनी नरेंद्रला सुविचार लिहायला सांगितला. नरेंद्रने वरील सुविचाराखाली आपला सुविचार लिहिला-
‘‘जिथे मनच नाहीसे झाले आहे तिथे कुठली धुळ अन् कुठली घाण?’’
गुरुंनी नरेंद्रकडे याचे स्पष्टीकरण मागितले. तेव्हा नरेंद्रने सांगितले, ‘‘आपले मन हा एक आरसा असला तरी आपणच तो स्वच्छ ठेवावा. म्हणजे आपले मन देवाच्या चरणी अर्पण केल्यावर त्या मनाला धूळ- घाणच काय तत्सम वाईट विचार स्पर्शदेखील करू शकत नाहीत. म्हणून आपले मन सुविचारी ठेवावे. आपल्या मनाचा आरसा नेहमीच निर्मळ, पवित्र ठेवावा. मग सारे जगच तुम्हाला सुंदर दिसेल’’… असे नरेंद्रने सांगितले. पुढे हाच नरेंद्र स्वामी विवेकानंद म्हणून प्रसिद्ध झाला.

‘‘मी कशाला आरशात पाहू गं? मी कशाला बंधनात राहू गं, मीच माझ्या रुपाची राणी गं’’… असे गाणे गात लहान मुलगी आरशात पाहत नाचताना पाहून खरोखरच तिचे कौतुक करावेसे वाटते.
एक वेळ माणूस खोटे बोलू शकतो. पण आरसा कधीही खोटे बोलू शकत नाही. ‘‘दर्पण झूठ ना बोले!’’वय लपवण्यासाठी आपण केसांना कलप लावतो. चेहर्‍याच्या सुरकुत्या घालवण्यासाठी, चेहरा कांतीमय दिसण्यासाठी आपण फेशियल करतो. पण याचा उपयोग फक्त दहा-पंधरा दिवसांपुरताच. पंधरा दिवसांनी आरसा तुम्हाला वाढत्या वयाची जाणीव करून देतोच.

भले आपण कितीही ‘अजून यौवनात मी’ असा आव आणून राहिलो तरीसुद्धा आरशापुढे आपली डाळ शिजत नाही. सुरकुतलेल्या आपल्या गालावर तोंडातून जिभेने आतल्या बाजूने दाब देऊन गालावरच्या सुरकुत्यांच्या जाळीवर चापडून चोपडून पावडरचा थर देताना सत्तर वर्षांच्या म्हातारीला म्हणतात, ‘‘सत्तर वर्षांची म्हातारी असून वय सांगते सोळा!’’
आपल्याला काय शोभते किंवा काय नाही हेदेखील आरसाच सांगू शकतो. असा हा आरसा गोष्टींमध्ये, गाण्यांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवून देतो. ‘‘स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी.’’ बघा, आरसा आपल्याला स्वतःचे केवळ रूपच दाखवत नाही तर त्या रुपाच्या आतले ंअंतर्रुपही दाखवतो.