आपत्तींचा वेढा

0
30

एकीकडे देशामध्ये भलभलत्या विषयांवरून वातावरण तापवले जाते आहे आणि दुसरीकडे या देशाचा ईशान्येकडील मोठा भूभाग अतिवृष्टी आणि महापुरांनी उद्ध्वस्त झाला आहे. ईशान्येकडील आसाम, अरुणाचल, मेघालयमध्ये गेले काही दिवस महापुराने थैमान घातले आहे, परंतु दुर्दैवाने ईशान्येचा भाग राष्ट्रीय प्रसारमाध्यमांत नेहमीच उपेक्षित राहत असल्याने लाखो लोकांचा संसार तेथे उघड्यावर पडला असला तरी उर्वरित देशाला त्याची फारशी जाणीवही झालेली दिसत नाही. एकट्या आसाममधील २९ जिल्ह्यांतील अडीच हजारांवर गावे पुराने कोलमडली आहेत. आठ लाख लोक बेघर झाले आहेत. लाखो मदत छावण्यांमध्ये आश्रयाला गेले आहेत, तर असंख्य लोकांना अक्षरशः उघड्यावर लोहमार्गावर अन्नपाण्याविना आसरा घेणे भाग पडले आहे. ईशान्येतील पूरपरिस्थिती खरोखर भीषण आहे. एनडीआरएफ आणि सेनेचे मदतकार्य जोरात असले तरी आभाळाच फाटले आहे तेथे कोण कोणाला पुरे पडणार अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते.
आसाम आणि अन्य राज्यांमध्ये महापुरामुळे झालेले नुकसान नेमके कितीचे आहे हे कळायला अजून काही काळ जावा लागेल, परंतु ज्या तर्‍हेने गावागावांतील पूल कोसळून पडले आहेत, रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, हजारो घरे कोसळली वा पाण्याखाली गेली आहेत, ते पाहिल्यास ही राष्ट्रीय आपत्तीच म्हणावी लागेल.
दुर्दैवाने उर्वरित देशाला ईशान्येतील राज्यांतील या हलकल्लोळाची फारशी माहिती नव्हती वा दखल घ्यावीशी वाटली नाही. परंतु महापुराने केलेल्या या नुकसानीतून आसाम आणि शेजारील राज्यांना पुन्हा उभे करायचे असेल तर अवघ्या देशाला मदतीचा हात पुढे करावा लागेल. यापूर्वी दक्षिणेतील तामीळनाडू, केरळसारख्या राज्यांमध्ये महापुराने हलकल्लोळ माजवला तेव्हा देश मदतीला धावला होता. बिहार आणि उत्तरेतील पठारी प्रदेशात असे पूर नेहमीचे आहेत. देशाच्या पूर्व किनारपट्टीवर तर सतत वादळे धडकत असतात.
एका आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकताच आपला एक अहवाल दिला आहे, त्यातील आकडेवारीनुसार गेल्या वर्षामध्ये आपल्या देशाला तब्बल ऐंशी नैसर्गिक आपत्तींनी तडाखा दिला. पूर, वादळे, अतिवृष्टी यांतून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान कोसळणारा नैऋत्य मोसमी पाऊस आणि ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानचा ईशान्य मोसमी पाऊस या दोन्हींच्या काळात महापुरांनी अनेक प्रदेशांना झोडपले. शिवाय यास, तौक्ते, गुलाब अशा वादळांनी नुकसानी घडविली ती वेगळीच. शेती आणि बागायतींचे अशा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान होत असते. यावर्षी तर पश्‍चिम आणि दक्षिण भारतामध्ये एकीकडे अवकाळी पाऊस होत असताना तिकडे उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट उसळली होती. निसर्गचक्रच असे उलटेपालटे झाल्याने त्याचा फटका खावा लागणे आता नित्याचे होऊन बसले आहे.
प्रत्यक्ष चक्रीवादळात किंवा पुरांमुळे होणारी हानी मोठी असतेच, परंतु या वादळांचा परिणाम म्हणून जे पर्यावरणीय परिणाम इतर प्रदेशांतही दिसून येतात, त्या हवामान बदलांमुळे वार्षिक पिके आणि फळफळावळीच्या उत्पादनावरही मोठे दुष्परिणाम होत असतात. यावर्षी गोव्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. परिणामी त्याचा फटका शेतकरी आणि बागायतदारांना बसला. महाराष्ट्रात अभूतपूर्व गारपीट झाली. त्यातून शेतकर्‍यांचे नुकसान झाले. ह्या अशा घटनांमुळे देशातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. आधीच शेती बागायती हे बेभरवशाचे व लहरी हवामानावर सर्वस्वी अवलंबून असलेले व्यवसाय, त्यामुळे असे आभाळ फाटते तेव्हा शेतकरी आणि बागायतदार आपला आत्मविश्वासच गमावून बसतो. सरकार मदतीची आश्वासने देते, नेते आपत्तीग्रस्त भागाचे दौरे करतात, बहुधा हवाई पाहण्या करतात, परंतु प्रत्यक्ष जमिनीवरच्या आपत्तीग्रस्तांपर्यंत ती मदत पोहोचायला अक्षम्य विलंब लागत असतो. त्यामुळे या बेभरवशाच्या परिस्थितीला तोंड देत आपला आत्मवि श्वास टिकवणे हे बळीराजासाठी मुळीच सोपे राहिलेले नाही. पूर्वीच्या तुलनेत आपले हवामान खाते अधिक आधुनिक झालेले आहे, त्यामुळे हवामानाचे अचूक आगाऊ अंदाज आज उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांच्या आधारे आणि डॉप्लर रडारच्या मदतीने व्यक्त करता येतात. प्रशासनही त्यासाठी कामाला लागते, परंतु तरीही नुकसान टाळता येत नाही, कारण आभाळच फाटलेले असते. यापुढे अशा आपत्ती नेहमीच्याच मानून या आपत्तीग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देणारी व्यवस्था सरकारने उभारली तरच यातून निभाव लागू शकेल.