एका क्लिकवर मिळणार पालिका क्षेत्रातील घरांची माहिती

0
13

>> नगरविकासमंत्री विश्‍वजीत राणे यांची माहिती

>> ‘जिओ मॅपिंग’द्वारे जमवला जाणार घरांचा डाटा

राज्यातील पालिका क्षेत्रातील सर्व घरांची आता एका क्लिकवर उपलब्ध होणार असून, त्यासाठी ‘जिओ मॅपिंग’चा वापर केला जाणार आहे. या पद्धतीमुळे पालिकेला योग्य महसूल मिळेल आणि जिओ मॅपिंगमुळे घरपट्टी करात वाढ होईल,, असा विश्‍वास नगरविकासमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केला. जिओ मॅपिंग अमलात आणताना राज्यातील सर्व पालिकांना विश्वासात घेतले जाईल, असेही ते म्हणाले.

फोंडा पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीची काल पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष अर्चना नाईक डांगी, पालिका मुख्याधिकारी योगिराज गोसावी उपस्थित होते.
पालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागातील बांधकामे तसेच अन्य माहिती जिओ मॅपिंगद्वारे उपलब्ध होणार असल्याने बेकायदा बांधकामांना चाप बसेल. नगरविकास खात्यातर्फे सध्या ५०० चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामांसाठीच्या अटी शिथिल आहेत. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्व पालिकांतील सुमारे शंभर कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. पालिका प्रशासन पारदर्शक करताना लोकांची कामे प्रलंबित राहणार नाही, याकडे लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. याशिवाय पालिका क्षेत्रातील जन्म-मृत्यू नोंदणी ऑनलाईन करताना घरबसल्या दाखले देण्यासंबंधीची कार्यवाही देखील सुरू करण्यात येईल, असे राणे म्हणाले.
रितेश नाईक यांनी पालिकेला विकासकामांसाठी सरकारने जादा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली.

रवी नाईक यांची मागणी पूर्णत्वास
फोंड्याच्या विकासासाठी मास्टरप्लॅनची आवश्यकता स्थानिक आमदार रवी नाईक यांनी अनेकवेळा केली आहे. त्यामुळे गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या बैठकीत मास्टरप्लॅनची योजना मंजूर करण्यात आली असून, पणजी शहरानंतर जर कोणत्या शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल, तर ते फोंडा शहर असेल, असे विश्वजीत राणे यांनी जाहीर केले.