आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होणार : मुख्यमंत्री

0
237

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करताना हे अंदाजपत्रक आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारे असल्याचे सांगितले. या अंदाजपत्रकातून सरकारने कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची जी तरतूद केली आहे त्याचा त्यांनी खास उल्लेख केला.
आत्मनिर्भर भारतासाठीच्या अंदाजपत्रकामुळे स्वयंपूर्ण भारतासाठीचा एक भक्कम असा पाया घातला जाणार असल्याचे सांगून या अंदाजपत्रकामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवनात सकारात्मक असे बदल झालेले दिसून येतील, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
या अंदाजपत्रकातून आरोग्य, शिक्षण, पायाभूत विकास, कृषी विकास याबरोबरच सर्व क्षेत्रांचा विकास होणार असल्याचा आशावाद सावंत यांनी व्यक्त केला.

गोव्यातील कृषिक्षेत्राला फायदा
गोव्याविषयी बोलायचे झाल्यास गोव्याच्या कृषी क्षेत्राला या अंदाजपत्रकाचा मोठा फायदा होणार आहे. गोवा हे किनारपट्टीवरील राज्य असल्याने गोव्याच्या मत्स्य उद्योगालाही मोठा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. खाण उद्योगानंतर गोव्यातून जर कसली मोठी निर्यात होत असेल तर ती मासळीची असे सांगून आता मासळी निर्यातीला आणखी चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दुग्ध उद्योगालाही चालना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

फोंड्यात एकलव्य विद्यालय
अनुसूचित जमातींसाठीच्या विद्यार्थ्यांसाठीचे एक एकलव्य विद्यालय गोव्याला मिळाले आहे. ते फोंडा येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी यावेळी दिली.
अंदाजपत्रकातून कौशल्य विकासावर भर देण्यात आलेला असून त्याचाही फायदा गोव्याला मिळणार आहे. कौशल्य विकासासाठी भारताने संयुक्त अरब अमिरात व जपान या देशांशी भागीदारी केली असल्याची माहिती देऊन हा चांगला निर्णय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्याची राजभाषा असलेल्या कोकणीचे डिजिटलायझेशन करण्यासाठीही कौशल्य विकासाचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.
केंद्राची मिशन पोषण, आयुर्विमामधील थेट विदेशी गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय, एलआयसीची निर्गुंतवणूक, स्टार्टअप्सना आणखी एक वर्ष कर सवलत देण्याचा निर्णयही उल्लेखनीय असल्याचे सावंत यांनी सांगितले.
७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न फक्त पेन्शन असेल तर त्यांना आयकर परतावा भरण्यापासून सूट देण्याचा निर्णय फार चांगला असल्याचे त्यांनी सांगितले.

विकासासाठी ३०० कोटी वापरणार
गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही केंद्राकडे १०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, केंद्राने १०० कोटींच्या जागी ३०० कोटी देऊन सुखद धक्का दिला आहे. हा निधी गोव्याच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

या निधीचा राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके व ऐतिहासिक स्थळांच्या दुरुस्तीसाठी वापर करण्यात येईल. त्याचबरोबर राज्यातील गरीब जनता कोविडमुळे हवालदिल झालेली असून त्यांच्या कल्याणासाठीही या निधीचा वापर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आपण हा निधी मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती, असे सावंत म्हणाले.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अंदाजपत्रक मांडताना आपल्या प्रारंभीच्या निवेदनातून गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवाचा खास उल्लेख केल्याने राज्य सरकारला फार आनंद झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय अंदाजपत्रकाच्या प्रारंभीच्या निवेदनातून अशा प्रकारे गोव्याचा उल्लेख कधीही झाला नव्हता, असे सावंत म्हणाले. आत्मनिर्भर गोवा योजनेसाठी केंद्राकडून मिळालेल्या निधीची बरीच मदत होणार असल्याचेही यावेळी सावंत यांनी स्पष्ट केले.