- डॉ. मनाली म. पवार
सांतईनेज, पणजी
मधुर रसात्मक पदार्थ सेवन करावे हे जरी खरे असले तरी मधुर रस पचायला जड असतो. हे लक्षात घेऊन दोन घास कमीच खावे. योग्य आहार- विहाराचे आचरण केल्यास शीतपित्तासारखे पित्तज विकार उत्पन्न होणार नाही. भीती, काळजीही दूर ठेवा म्हणजे पित्तज विकाराबरोबर कोरोना विषाणूही दूर राहील.
ऍसिडिटी, मूळव्याध, कावीळ तसेच अंगावर गांधी उठणे अशा प्रकारचे आजार सध्या उत्पन्न होत आहेत किंवा वाढलेत असे अनेक रुग्ण सांगताना दिसतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगावर गांधी उठल्या म्हणजे भीती वाटते. मनात अनेक संभ्रम होऊ लागतात. ऍक्शन-रिऍक्शन, का-कसे असे प्रश्न निर्माण होतात. एखाद्या औषधाची रिऍक्शन आली असेल काय? कोरोना संक्रमणाचे एखादे लक्षण तर नसेल?…असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात थैमान घालतात. पण घाबरू नका. अहो, तुम्ही विसरता आहात, वर्षा ऋतू संपून शरद ऋतू सुरू होत आहे. म्हणजे दोषस्थिती बदलते आहे.
सद्यःस्थितीत वातावरणात बदल झालेला दिसतो आहे. काही वेळा एखादी मोठीशी सर येते तर मध्येच पिवळे धमक ऊन पडलेले दिसते. कधी कधी सकाळी कडक ऊन पडते व सायंकाळी गडगडाटी पाऊस येण्याची शक्यता. सूर्यसंताप हा असा अचानक वाढल्याने त्या वाढलेल्या उष्णतेने वर्षा ऋतूत संचित झालेल्या पित्ताचा अधिकच प्रकोप होतो व म्हणून पित्तप्रकोपाची (दूषित पित्ताची) अनेक लक्षणे दिसत आहेत. याच वाढलेल्या सूर्यसंतापामुळे शैत्य कमी झाल्याने वर्षा ऋतूत प्रकूपित झालेल्या वाताचे मात्र शमन होऊ लागते. वाढलेल्या, प्रकूपित झालेल्या पित्तामुळे ही विचित्र रोगांची उत्पत्ती होते आहे. विशेषतः अर्श, रक्तपित्त, कामला, शीतपित्त, अम्लपित्त इत्यादी. काही वेळा तर हे आजार साथीच्या स्वरूपात आढळून येतात. म्हणूनच सगळ्यांच आजारांना कोरोना विषाणूशी जोडायची गरज नाही. ऋतुबदलाप्रमाणे उत्पन्न होणारे आजार आहेतच ना!
शीतपित्त (अंगावर गांधी उठणे) –
ज्या रोगामध्ये सर्वांगावर गांधी उठतात म्हणजेच गांधीलमाशी चावल्यावर येतात तशा प्रकारची मंडले निर्माण होतात, उत्सेध येतो, दाह-कंडू व आरक्तवर्णता असते. त्या व्याधीला शीतपित्त असे म्हणतात.
सामान्य लक्षणे –
- सर्वांगावर गांधीलमाशी चावल्याप्रमाणे मंडले उत्पन्न होणे.
- त्या ठिकाणी खाज येणे, दाह असणे
- सारखी तहान लागणे
- अरुची
- मळमळल्यासारखे होणे
- अंगदुखी, जड झाल्यासारखे वाटणे
शीतपित्तामध्ये कंडू (खाज येणे) हे अत्यंत त्रासदायक असे लक्षण असते. यासाठी घरातल्या घरात प्रथमोपचार करावेत. खाज कमी करण्यासाठी सोड्याचे पाणी तयार करून ते सर्वांगावर चोपडावे किंवा अमसुलाचे पाणीही याप्रकारे लेपनासाठी व पिण्यासाठीही वापरतात. - दाह प्रशमनासाठी कामदुधा, मौक्तिक, गैरीक यांसारख्या शीतवीर्य द्रव्यांचा उपयोग होतो.
- सारिवा, मंजिष्ठा, गुडूची, निंब, धमासा ही द्रव्येही रक्तशोधन करणारी म्हणून उपयुक्त ठरतात.
- सूतशेखर, आरोग्यवर्धिनी, गंधकरसायन हेही शीतपित्तात उपयुक्त ठरणारे कल्प आहेत.
शीतपित्तासाठी व या ऋतूसाठी आहार –
- पित्तप्रकोप असल्याने आहारात पित्तशामक अशा मधुर, तिक्त व कषाय रसांच्या द्रव्यांचे आधिक्य असणे आवश्यक आहे. तसेच बल्य पदार्थांची जोड आहारास देणेही संयुक्तिक ठरते.
- सद्यःस्थितीत भात, ज्वारी, गहू या द्रव्यांचा आहारात प्रामुख्याने उपयोग करावा.
- याच्या जोडीला मूग, मटकी, हरभरा, मटार यांसारखी तुरट रसाची व मधुर अनुरस असणारी द्विदल धान्येही भरपूर प्रमाणात घेतली पाहिजेत.
- भरपूर दूध व तूप हेही घ्यावे.
- नारळ हा मधुर रसाचा, शीतल, आल्हाददायक, पित्तप्रशमन करणारा असल्यानेच त्याचा उपयोग होतो.
- या मधुर रसाच्या द्रव्याबरोबर कडू पदार्थही पित्तशामक असल्याने आहारात आले पाहिजेत.
- कडवट पदार्थांपैकी कारल्याची भाजी, मेथीची भाजी यासारख्या भाज्या अधिक खाल्ल्या पाहिजेत.
- स्वयंपाकामध्येही मेथी, हळद, कढीपत्ता यासारख्या द्रव्यांचा वापरही भरपूर झाला पाहिजे.
- पित्त प्रशमनासाठी अमसुलांचा उपयोग करावा.
- आवळा हे कषाय अम्लरसाचे द्रव्य हे उत्कृष्ट, पित्तघ्न आहे. आवळ्यापासून बनविला जाणारा मोरावळा, च्यवनप्राश वापरणे अत्यंत हितावह आहे.
आवळा व्याधिप्रतिकार शक्ती वाढवणारा आहे. तसाच पित्त शमन करणारा आहे. - मधुरसाची चिक्कूटसारखी फळे व लिंबाच्याच वर्गातील मधुर, अम्ल रस असणारी संत्री, मोसंबी इत्यादी फळे खावीत.
- हिरवी मिरची कमी वापरावी. तिखटपणासाठी आले भरपूर प्रमाणात वापरावे आल्याचा विपाक मधुर असतो, म्हणून पित्तशामक ठरते.
- आले, ओली हळद व लिंबू यांपासून बनविलेले लोणचे किंवा केवळ लिंबाचे लोणचे खावे. कैरीचे लोणचे मात्र खाऊ नये. पोटभर, तडस लागेपर्यंत काही खाऊ नये. मधुर रसात्मक पदार्थ सेवन करावे हे जरी खरे असले तरी मधुर रस पचायला जड असतो. हे लक्षात घेऊन दोन घास कमीच खावे.
- पावसाळ्यात लसूण अधिक प्रमाणात खावी, तीच लसूण आता मात्र पूर्ण निषिद्ध आहे, कारण लसूण हे द्रव्य पित्त वाढवणारी आहे. त्यामुळे पूर्णतः वर्ज्य आहे.
- धने, जिरे, कोथिंबीर, आले, दालचनी अशा प्रकारच्या मसाल्यांचा आहारात वापर करावा.
- दूध, तूप अधिक प्रमाणात सेवन करावे. दूध हे स्निग्ध, मधुर, बल्य, मृदुरेचक व म्हणूनच पित्तघ्न. चांगले तापवलेले दूध निववून मग त्यात बदाम, खारीक, पिस्ता यासारखी मधुर, बल्य द्रव्ये घालावीत.
- वेलदोड्याचा उपयोग करावा. भरपूर साखर घालावी असे तयार केलेले दूध प्राशन करावे.
- पिण्यासाठी वापरण्याच्या पाण्यात वाळा घालावा.
- पित्तशमन व्हावे यासाठी तांदळाची किंवा रव्याची खीर, गव्हाचा किंवा रव्याचा शिरा, दुधी हलवा, सागरभात, मुगाचे लाडू, पेठा, उकडीचे मोदक अशा गोड पदार्थांचे आवर्जून सेवन करावे.
- उन्हात विशेषतः दुपारच्या उन्हात जाऊ नये.
- शरीराला थकवा येईल असा व्यायाम करू नये.
- फार कढत पाण्याने स्नान करू नये.
- रात्री जागरण करू नये, तसेच दुपारी झोपू नये.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पित्त स्वाभाविकच वाढत असल्याने मृदू विरेचन घ्यावे. यासाठी त्रिफळा, आरग्वध, मनुका इत्यादींचा उपयोग करता येतो. पित्त कमी करणारे अविपत्तिकर चूर्ण, योग्य पद्धतीने तयार केलेले प्रवाळ भस्म, मोती भस्म वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यावे.
योग्य आहार- विहाराचे आचरण केल्यास शीतपित्तासारखे पित्तज विकार उत्पन्न होणार नाही. भीती, काळजीही दूर ठेवा म्हणजे पित्तज विकाराबरोबर कोरोना विषाणूही दूर राहील.