मनःशांती उपनिषदातून

0
418

जिज्ञासू, तेजस्वी नचिकेता

  • प्रा. रमेश सप्रे

यमराजानं आधी जीवनाची दोन प्रमुख ध्येयं सांगितली. प्रापंचिक वैभव नि आध्यात्मिक किंवा पारमार्थिक अनुभव दोन्हीही यथार्थ नि कृतार्थ जीवनासाठी आवश्यक आहेत. सांसारिक सुखं नि त्याची साधनं मिळवताना (प्रेयस) मनुष्य जीवनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट मुक्ती (श्रेयस) याचा विसर पडता कामा नये.

आपल्या या लेखमालेच्या ‘मनःशांती उपनिषदातून’ या नावात आधी ‘मनःशांती’ शब्द आहे. त्याचा अर्थ उघड आहे. गीता असो वा उपनिषद, रामायण असो वा महाभारत, ज्ञानेश्‍वरी असो वा दासबोध, ऋषीमुनींची शिकवण असो वा साधुसंतांचा बोध… मुख्य विषय मनःशांती हाच असतो. विशेषतः आजच्या मानसिक ताणतणावाच्या काळात तर हा विषयच नव्हे तर प्रत्यक्ष मनःशांतीचा अनुभव ही परमोच्च आवश्यकता बनलीय.

‘आयुष’ या आरोग्य पुरवणीत मुख्यतः दोन प्रकारचं लेखन असतं. शरीराच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन करणारं नि मनाच्या स्वास्थ्यासाठी समुपदेशन करणारं. आपला मुख्य केंद्रबिंदू असतो- मनःस्वास्थ्य, ज्यातून अनुभवाला येते मनःशांती. यासाठी उपनिषदांच्या काळातील ऋषीमुनींनी मौलिक दिग्दर्शन केलं आहे. सध्या आपण या दृष्टीनं सर्वांत प्रभावी नि उपयुक्त अशा कठोपनिषदाच्या माध्यमातून मनःशांतीचा शोध नि बोध घेत आहोत.
भगवद्गीतेवर सर्वाधिक प्रभाव या उपनिषदातील विचारांचा आहे. काही श्‍लोक तर जवळजवळ तसेच गीतेतील अध्यायात घेतले आहेत. इतकंच नाही तर तुकाराम, समर्थ रामदास यांच्या विचारांवर नि अनुभवावर कठोपनिषदाचा प्रभाव पडलाय. हेच पहा ना- समर्थ रामदास भीमरूपी स्तोत्रात जे वर्णन करतात- ‘वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा’ किंवा ‘ब्रह्मांडाभोवते वेढे वज्रपुच्छे करू शके’ हे काही फक्त हनुमंताचंच वर्णन नाही. आपले विचार शून्यमंडळाचा म्हणजे आकाशाचा – अवकाशाचा – अनंताचा वेध घेऊ शकतात. मनाच्या म्हणजे भावभावनांच्या आणि बुद्धीच्या म्हणजे विचार- कल्पनांच्या माध्यमातून आपण अनंताला गवसणी घालू शकतो. हा एक दिव्य अनुभव असतो. तुकोबांच्या शब्दात.
‘अणुरणीया थोकडा, तुका आकाशाएवढा’
म्हणजे सूक्ष्म झाला तर तुकाराम अणूपेक्षाही लहान होतो नि भव्य झाला तर हाच तुका आकाशाएवढा किंवा त्याहूनही महान होतो. हे नुसते शब्द नसून संतांचे प्रत्यक्ष जीवनानुभव असतात. ऋषींची स्वानुभूतीही अशीच असते. ते सिद्धांताच्या रूपात आपले अनुभव व्यक्त करतात –

  • अणोरणीयान् महतोमहीयान् आत्मास्य जंतोः निहितो गुहायाम्‌|
  • तम् अक्रतुः पश्यति वीतशोको धातुप्रसादान् महिमानमात्मनः ॥

म्हणजे आपण सारे जीवात्मा (जंतोः) आहोत. देह आणि देही, शरीर अन् शरीरी असे दोन पैलू आहेत आपल्या अस्तित्वाला. देहाकडचं म्हणजे देहभोगाकडचं लक्ष कमी करून देहीकडे म्हणजेच आत्म्याकडे अधिक ध्यान दिलं पाहिजे. यालाच संत म्हणतात ‘देहबुद्धि ते आत्मबुद्धी करावी’ यासाठी मुख्य म्हणजे – ‘विवेके क्रिया आपुली पालटावी’, तर सर्वांच्या हृदयरूपी गुहेत वसत असलेला आत्मा (म्हणजेच परमात्मा) अणूपेक्षाही सूक्ष्म (अणोः अणीयान्) आहे त्याचवेळी तो महानाहून महान (महतः महीयान्) सुद्धा आहे. परमात्म्याच्या या महानतेला (महिम्याला) कामनारहित (अक्रतुः) नि चिंतारहित (वीतशोकः) असे अत्यंत दुर्मीळ साधकच पाहू (अनुभवू) शकतात तेही सर्वाधार परब्रह्म परमेश्‍वराच्या कृपेनं (धातुः प्रसादात्)! धातु म्हणजे परमेश्‍वर. विष्णुसहस्रनामात ‘धातु’ हे एक विष्णूचं नाम म्हणून आलंय. (अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः|)
उपनिषदात तसेच गीतेत एक गोष्ट स्पष्ट सांगितली आहे की इंद्रियं (देह)- मन- बुद्धी यांच्यापलीकडे आत्मा म्हणजे आत्मस्वरूप आहे.. देह- मन- बुद्धीची एक मर्यादा आहे ती म्हणजे कोणतीही गोष्ट समजण्यासाठी, तिचं आकलन होण्यासाठी तिच्यासंबंधी काही गोष्टी समजणं आवश्यक असतं. गु. बाबा बेलसरे म्हणतात- ‘बुद्धीने कोणत्याही वस्तूचे ग्रहण केले तरी का, केव्हा, कोठे या ‘काकेको’मध्ये ती बसवावी लागते. अखिल विश्‍वाला व्यापून उरणारा आत्मा काकेकोच्या बंधनापलीकडे आहे. त्याचे वर्णन करताना स्थळ (कोठे), काळ (केव्हा) यांचीच भाषा वापरावी लागते. ती अर्थात अपुरी पडते. म्हणून परस्पर विरुद्ध विशेषणांनी आत्म्याचे वर्णन करावं लागतं ते असं-

  • आसीनो दूरं व्रजाति
    कस्तं मदामदं देवम् |
    शयानो याति सर्वतः
  • मदन्यो ज्ञातुमर्हति ॥

म्हणजे आत्मा अचल (स्थिर) असला तरी दूर जातो व एके ठिकाणी असला तरी त्याचवेळी सर्व ठिकाणी जातो. आनंदरूप अन् आनंदाच्या पलीकडे (आनंदातीत) असणार्‍या त्या आत्म्याला माझ्यावाचून कोण जाणील?
त्याचप्रमाणे –

  • अशरीरं शरीरेषु
    अनवस्थेषु अवास्थितम् |
    महांतं विभुम् आत्मान्ं
    मत्वा धीरो न शोचति ॥
    अर्थ स्पष्ट आहे –
    आत्मा स्वतः शरीररहित (अशरीरं) असून शरीरात राहतो. अनित्य वस्तूंमध्ये नित्यपणानं वास करतो. अशा महान् सर्वव्यापी आत्म्याला जाणून ज्ञानी माणूस (धीरो) दुःखाच्या पलीकडे जातो. ( न शोचति) अखंड आनंदात राहतो.
    एका अर्थी हे खर्‍या (आत्म)ज्ञानी, सच्च्या कर्मयोगी नि अस्सल भक्ताचं आत्मचरित्र आहे. गीतेत पंडितासारखं भाषण करून (प्रज्ञावादांश्च भाषसे) प्रत्यक्षात शोक करायला योग्य नाही अशा गोष्टींबद्दल शोक करणार्‍या अर्जुनाला भगवंत पुनःपुन्हा ‘न त्वं शोचितुमर्हसि|’ असं म्हणतो. म्हणजे ज्याच्याविषयी (आत्म्याविषयी) शोक करणं योग्य नाही अशा अमर, शाश्‍वत आत्म्याला शरीर मानून तू शोक करणं योग्य नाही. असा शोक करणं तुला शोभत नाही. हाच विचार कठोपनिषदात व्यक्त झाला आहे.

आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी हा आत्मा- परमात्म्याचा विचार कितपत योग्य नि उपयुक्त आहे? – हा प्रश्‍न आपल्या मनात येणं शक्य आहे. खरंच, दैनंदिन जीवनाच्या धकाधकीत नि ओढगस्तीत असा विचार करायला वेळ कुठून मिळणार? समजा विचार करून हे समजावून घेतलं तरी जीवनात त्याचा उपयोग कसा करायचा?
ही गोष्ट अगदी खरी आहे. उपनिषदं शिकवणारे नि शिकणारे खूपच निराळ्या काळात नि वातावरणात होते. खरं तर वेद, उपनिषदं ही काही शिकवण्याची पाठ्यपुस्तकं नव्हेत. पण चर्चेसाठी, संवाद- परिसंवादासाठी आधार असावा म्हणजे वेद म्हणजे शुद्ध, उत्स्फूर्त ज्ञान हे शक्य झालं तसं शब्दांकित केलं गेलं. त्याचे ग्रंथ तयार झाले. ही गोष्ट ज्ञानाच्या प्रसारासाठी अतिशय पूरक ठरली. त्याकाळचं वातावरण संस्कृतमय होतं. ग्रंथांचा अभ्यास करून लोकभाषेत त्यातील विचार लोकांपर्यंत पोचवणं सुरू झालं होतं.

कठोपनिषदासारख्या तत्त्वज्ञान नि शुद्ध आत्मज्ञान असलेल्या ग्रंथातील विचार सोपे, सौम्य व्हावेत म्हणून ते कथेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवले गेले. यम-नचिकेता ही अनेक दृष्टींनी अमर नि सोज्वळ कथा आहे. नचिकेता ही म्हटलं तर आपला प्रतिनिधी आहे. मृत्यूचं रहस्य तो आपल्या वतीनं .यमराजांना विचारतोय. जीवनाचा विचार करताना मृत्यूचा विचार अपरिहार्यपणे येतोच. तो कसा करायचा नि शांत समृद्ध जीवन जगत असतानाच मुक्त व्हायचं हाच मुख्य विषय यम-नचिकेता संवादाचा आहे.

आजच्या आपल्या जीवनाच्या संदर्भात कठोपनिषदातील आत्मा- परमात्मा, जीवन- मृत्यू, देह- देही (देहबुद्धी – आत्मबुद्धी) या विषयाच्या आत्तापर्यंतच्या मार्गदर्शनाचा क्रमानं विचार करू या –

  • वाजश्रवा ऋषींचा लोभ – आपली कीर्ती दूरवर पोचावी असं सर्वांना वाटतं. काही अपवाद अर्थातच असतात. ‘वाजश्रवा’ या नावातच खूप अन्नदान (वाज) केल्यामुळे दूरवर वाजश्रवा ऋषींची कीर्ती आधीच पोचली होती. नंतर त्यांनी सर्वश्रेष्ठ विश्‍वजित यज्ञ करायचं ठरवलं. यज्ञ संपन्न झालासुद्धा पण ज्यावेळी याचकांना गोदान करण्याची वेळ आली तेव्हा मरतुकड्या गाईंचं दान देण्यास प्रारंभ केला. या गाईंचं वर्णन करण्यासाठी अतिशय समर्पक शब्द वापरलेयत. शेवटचं दूध दिलेल्या, अखेरचं गवत खाल्लेल्या नि शेवटचं पाणी पिलेल्या अशा गाईंचं दान करणं हे लोभाचं प्रतीक होतं. कारण गोशाळेत खूप धष्टपुष्ट गाई होत्या. असं करण्यामागचं मुख्य कारण होतं लोभ. जो विश्‍वजित यज्ञाच्या उद्दिष्टांच्या नि संस्कारांच्या अगदी विरुद्ध होतं.
  • बालक नचिकेताची जिज्ञासा – काही मुलं अगदी लहान वयात अतिशय परिपक्व बुद्धिमत्तेचा परिचय करून देतात. नचिकेता हा असाच जिज्ञासू नि मेधावी (कुशाग्र बुद्धिमत्तेचा) किशोर होता. त्यानं विचार केला की अशा मरतुकड्या गायी दान म्हणून देऊन नि धष्टपुष्ट गायी मागे ठेवून बाबा मोठं पाप तर करत नाहीत ना? निश्चित ते त्या गायी माझ्याचसाठी राखून ठेवत असणार – त्यांना पापापासून वाचवण्यासाठी आपलंच दान दिलं गेलं तर? तो नुसता विचार करून थांबत नाही तर पुढे येऊन वडीलांना विचारतो, ‘पिताश्री, मला कुणाला दान देणार?’
  • पिता वाजश्रवांचा मनाचा गेलेला तोल – प्रथम प्रथम आपल्या मुलाचा- नचिकेताचा हा बालिशपणा समजून त्यांनी नचिकेत्याकडे दुर्लक्ष केलं. पुन्हा पुन्हा नचिकेता, ‘पिताश्री, मला कुणाला दान करणार?’ असं विचारू लागल्यावर वाजश्रवा ऋषी रागावून म्हणाले, ‘जा, तुला मी मृत्यूला दान दिलंय.’
  • नचिकेताचा सत्यवचनीपणा- पित्याच्या तोंडचे ते उद्गार ऐकून नचिकेत्यानं निर्धारपूर्वक पिताश्री, पितामह यांचा निरोप नि आशीर्वाद घेऊन मृत्यूच्या म्हणजेच यम-राज्याच्या दिशेनं निघाला. यमगृही पोचल्यावर सांगितलं गेलं की यमदेव काही कामासाठी दूर गेलेयत. यमपत्नीच्या घरात येण्याचा, भोजनविश्रांती घेण्याचा आग्रह त्यानं नम्रपणे नाकारला. तीन दिवस (नि तीन रात्री) प्रायोपवेशन करत घराबाहेर बसून राहिला.
  • नचिकेताच्या बुद्धीची तेजस्विता – त्याही परिस्थितीत स्वतःची बुद्धी उत्स्फूर्तपणे वापरून त्यानं वर मागितले जे मृत्यूदेवानं तत्काळ दिले. पण जेव्हा नचिकेत्यानं मृत्यूच्या रहस्याबद्दल प्रश्‍न विचारला तेव्हा त्या सहस्याच्या बदल्यात त्याला दीर्घ जीवन, सेवेला स्त्रिया दिल्या. एका राजाला शोभेल असं वैभवही देऊ केलं. पण नचिकेतानं सारं नाकारून आपल्या प्रश्‍नावर तो अढळ राहिला.
  • श्रेयस नि प्रेयस – यमराजानं आधी जीवनाची दोन प्रमुख ध्येयं सांगितली. प्रापंचिक वैभव नि आध्यात्मिक किंवा पारमार्थिक अनुभव दोन्हीही यथार्थ नि कृतार्थ जीवनासाठी आवश्यक आहेत. सांसारिक सुखं नि त्याची साधनं मिळवताना (प्रेयस) मनुष्य जीवनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट मुक्ती (श्रेयस) याचा विसर पडता कामा नये. यालाच समर्थ रामदासांसारखे विचारवंत संत म्हणतात- ‘प्रपंच करावा नेटका | मग घ्यावे परमार्थ विवेका ॥ कठोपनिषदात प्रपंच- परमार्थ यांची सांगड घालताना इतरही अनेक जीवनाचं सार्थक करणार्‍या सूत्रांचा विचार केला गेलाय. सद्गुरूकृपेनं, ऋषींच्या प्रेरणेनं आपण त्यावर सहचिंतन करत राहू या.