गर्भनिरोधन भाग – १

0
309
  • डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर
    (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)

कंडोम जसे करते तसे ह्या गोळ्या तुमचा लैंगिक संबंधांतून पसरणार्‍या संक्रमित रोगांपासून बचाव करत नाहीत. म्हणूनच प्रत्येक गोष्टीमध्ये तज्ञ वैद्यांचा/ स्त्रीरोगप्रसूतीतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक. असे करण्यास उशीर झाल्यास किंवा स्वतः उपचार करत बसल्यास, जीवदेखील जाऊ शकतो.

हा विषय थोडा वादग्रस्त वाटेलही पण सामाजिक शिक्षणाचा, कुटुंब नियोजनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. अशी अनेक लोक आहेत ज्यांच्याद्वारे ही संकल्पना चुकीच्या पद्धतीने पसरवली जातेय आणि आपल्यासारखे लोक त्यांचे अनुसरणदेखील करतात. ह्या लेखाचा उद्देश फक्त गर्भनिरोधनाला प्रोत्साहन देणे (गरज भासल्यास) असा घेऊ नये तर त्याबद्दल जनजागृती होणे असाही अपेक्षित आहे. करायचे झाल्यास ते उचित प्रकारेच केलेले बरे.

पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणू/शुक्रजंतु(स्पर्म) जेव्हा स्त्रीच्या गर्भाशयामध्ये जाऊन तेथील बीजांड़(ओव्हम) यांच्याशी मिळतात तेव्हा कुठे गर्भाची उत्पत्ती होते. आणि हीच प्रक्रिया रोखण्यासाठी ज्यागोष्टी केल्या जातात त्याला गर्भनिरोधन म्हणतात व त्या उपायांना गर्भनिरोधक उपाय म्हटले जातात. असे जवळपास १५ गर्भनिरोधक उपाय आहेत.

गर्भनिरोधन हे ३ प्रकारे काम करत असते
१) ते बीजांड व शुक्राणू यांचा संयोग होऊ देत नाही.
२) बीजांडांची उत्पत्तीच बंद करते.
३) एकत्रित आलेले शुक्राणू व बीजांड(गर्भाधान) यांना गर्भाशयाच्या भिंतीला संलग्न होऊ न देणे.
कंडोम (संभोगाच्या वेळी पुरुषाने जननेंद्रियावर घालायचे एक लवचिक आवरण) हे गर्भनिरोधनासाठी सर्वात जास्त प्रमाणात वापरल्या जाणार्‍यांपैकी एक. गर्भधारणा रोखणे एवढ्यासाठीच नव्हे तर लैंगिक संबंधांतून पसरणार्‍या आजारांचे (एसटीडी) संक्रमणही याच्या वापराने रोखू शकतो. त्या जोडप्याचे लैंगिक स्वास्थ्य हे टिकवून ठेवते. आता तर महिलांसाठी सुद्धा कंडोम आले आहेत. पण वापरायचे झाल्यास थोड़े जपूनच. मार्केटिंग फंड्यांना, जाहिरातींना भुलवून न जाता, योग्य तेच कंडोम वापरावे. काहिनां त्यातील रबरची(लॅटेक्स) किंवा रसायन/अत्तर/स्निग्धीकरण करणार्‍या ल्यूब/शुक्राणुनाशक द्रव्यांची ऍलर्जी सुद्धा होते व गुप्तांगाच्या त्वचेवर पुरळ, खाज येणे, शीतपित्त (अर्टीकेरिया), रक्तदाब कमी होणे, नाक वाहणे यासारख्या तक्रारी चालू होतात. कंडोम जर हीन दर्जाचे किंवा कालबाह्य झालेले असतील तर ते फाटूही शकते व ते वापरण्याचे उद्देशच नष्ट होईल. एकदा वापरलेले पुनः वापरू नये.
काही लोकांचा असाही समज असतो की कंडोमसारख्या वस्तू वापरल्याने शारीरिक संबंधाच्या बाबतीत व्यत्यय येतो. येतही असेल पण एखादा गर्भाधान(फर्टिलायझेशन) झाल्यावर गर्भाशयातील वाढणार्‍या गर्भाला मारणे किंवा निष्कासित करणे हे खूप कष्टदायक असते व एकप्रकारची हत्याच तर आहे.

दुसरा उपाय जो गर्भनिरोधनासाठी सध्याच्या काळात सर्रास वापरला जातो तो म्हणजे पिल्स किंवा गोळ्यांच्या स्वरूपामध्ये. ह्यालाच ओरल कॉन्ट्रासॅप्टिव पिल्स असेही म्हणून ओळखले जाते. यामध्ये २ प्रकार असतात.

  • एक हे प्रोजेस्टेरॉन ओन्ली पिल्स (अशा महिलांना दिले जाते ज्यांना ईस्ट्रोजन देणे सोईस्कर नाही आणि स्तनपान करणार्‍या बायकांसाठीसुद्धा कारण हे स्तन्यनिर्मितीवर काहीही परिणाम होऊ देत नाही.
  • दुसरे कम्बाईन्ड पिल्स ज्यात प्रोजेस्टेरॉन व ईस्ट्रोजन असते.
    अगोदर सांगितल्याप्रमाणे हे दोन्हीही हॉर्मोन्स जे स्त्रीच्या शरीरामध्ये ओव्हुलेशन (बीजकोश/अंडाशय फुटून स्त्री जनन पेशी/बिजांड बाहेर येण्याची क्रिया)ची प्रक्रिया थांबवतात. त्यासोबत गर्भाशयातील आतील भिंतीमध्ये बदल घडवून आणतात जेणेकरून तेथे गर्भधारणा होऊ नये. तसेच गर्भाशयाच्या मुखातील/गर्भाशय ग्रीवा(सर्विक्स)मधील श्लेष्मा अशा प्रकारे तयार करते की शुक्राणूंचा आत प्रवेश होऊ नाही शकत.
    १ मास/महिना हा २८ दिवसांचा मानतात. त्यानुसारच ह्या गोळ्या २१ किंवा २८ च्या पॅकिंगमध्ये उपलब्ध असतात. २१ जर असतील तर ते सर्वच हॉर्मोनल पिल्स असतात. लैंगिक समागमानंतर ७२-१२० तासाच्या आत(अर्थातच कुठच्या गोळ्या वापरतात त्यावर अवलंबून असते) त्या चालू करायच्या असतात. असे सलग २१ दिवस घेऊन त्यानंतर ७ दिवसांचा खंड/अंतर(गॅप) ठेवून मग पुनः त्याच गोळ्या चालू करायच्या (ज्या दिवशी त्या घेणे सुरुवात केली गेली होती, तो वारसुद्धा तोच येईल). ह्या मधल्या ७ दिवसाच्या अंतरात मासिक रज:स्राव होईल पण कमी प्रमाणात. २८ च्या पॅकमध्ये २१ ह्या हॉर्मोनल पिल्स असतात आणि उर्वरित ७ (ह्या हॉर्मोन विरहित) रीमायंडर ज्यामध्ये कधीकधी आवरण/लौह असते(हे बर्थ कंट्रोल रेजिमेन नियमित ठेवण्यास मदत करते) किंवा थोड्या प्रमाणात ईस्ट्रोजन असल्यास मासिक रजस्राव कमी होण्यास फायदेशीर ठरतात. ह्या ७ गोळ्यांचा रंगदेखील इतर २१पेक्षा वेगळा असतो. हे असे ८४ दिवस (१२ आठवडे) करावे लागते. व त्यानंतर नियमित मासिक पाळी होऊ लागते. वैद्यांच्या सल्ल्‌‌यानुसार त्या १ वर्षेपर्यंत सुद्धा घेऊ शकतो जर त्यांचे काही दुष्परिणाम/साईड ईफेक्ट्स नाही दिसून आले तरच. एक मात्र लक्षात ठेवावे की दिवसाच्या ज्यावेळी ह्या गोळ्यांचे सेवन केले जाणार तो वेळ एकच ठेवावा. पण एक मात्र नक्की की कंडोम जसे करते तसे ह्या गोळ्या तुमचा लैंगिक संबंधांतून पसरणार्‍या संक्रमित रोगांपासून बचाव करत नाहीत. म्हणूनच प्रत्येक गोष्टीमध्ये तज्ञ वैद्यांचा/स्त्रीरोगप्रसूतीतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक. असे करण्यास उशीर झाल्यास किंवा स्वतः उपचार करत बसल्यास, जीवदेखील जाऊ शकतो.
    (क्रमश:)