…आणि असे होत्याचे नव्हते झाले!

0
34
  • विघ्नेश शिरगुरकर

दहा ते सव्वादहा या दरम्यान संपूर्ण घर आम्हा सर्वांच्या डोळ्यांदेखत जमीनदोस्त झालं. तो कडाकडा कोसळणारा शंभर वर्षे जुना डोलारा आमचं अंतःकरण पिळवटून गेला. जणू आमचा देहच तो! आम्ही लहानपणापासून मनात जपून ठेवलेली ही वास्तू आणि तिच्यासोबत आम्हीदेखील कडाकडा मोडून उन्मळून पडतोय की काय असा भास व्हावा. तटातट तुटणार्‍या कांबी, वासे, कोनवासे देहाच्या आतील हाडं तुटावीत, शिरा तुटाव्यात तसे तुटत होते आणि या आवाजागणिक आम्हा सख्ख्या, चुलत भांवडांना असह्य वेदना होत होत्या.

काही व्यक्ती, वस्तू आणि वास्तू यांना आपल्या आयुष्यातून आणि मनातून वगळू शकत नाही; किंबहुना ते नेमस्त, भावनिक आणि हळव्या मनाच्या आत्ममग्न माणसांना जमत नाही. म्हणून विलक्षण आठवणींनी भारलेला भूतकाळ जागवण्याचा अन् त्या वसुंधरेसम वात्सल्यपूर्ण वास्तूचं शब्दांत स्मरण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न.

गेल्या पावसाळ्यात माझं आजोळचं घर पुराच्या पाण्यात जमीनदोस्त झालं आणि हा प्रचंड मोठा मानसिक आघात होता. या वास्तूत अनेक लोक घडले, अशा या घराची ही हृदयद्रावक कथा.
रविवार, २२ जुलै २०२१!
संध्याकाळ जवळपास रात्रीएवढी काळवंडलेली होती. आषाढ महिना! मागचे चार दिवस धो-धो पाऊस पडत होता. अक्षरशः मुसळधार पाऊस… ‘जनजीवन विस्कळीत’ ही पेपरमधील बातमी अख्खा गोवा अनुभवत होता. या वर्षी खरं तर गोव्यातील सगळ्या पुलांना पाणी टेकलं होतं. कोकण आणि महाराष्ट्रातील नद्यांवर असलेले पूल आणि त्यांवरून पावसाळ्यात वाहणारे पाणी पाहून आम्हा गोवेकरांची परिस्थिती किती चांगली आहे असे वाटायचे. पण या वर्षीच्या पावसाने हे आणि असे अनेक गोड समज पुसून, नव्हे धुवून काढले. रविवारी संध्याकाळी मी माझ्या आजोळी म्हणजेच अडवईला आलो होतो. धो-धो पाऊस कोसळत होता. थांबायचं तर नावच नाही! काकीआजीकडं रात्रीचं जेवण झालं. पिठलं-भाकरी असा रात्रीचा बेत होता. दुसर्‍या दिवशी सकाळी मला वाळपईतील एका उच्च माध्यमिक विद्यालयात इंटरव्ह्यू असल्याकारणानं, त्या दिवसाचा कार्यक्रम ठरलेला होता.
माझ्या आजोळी आजोबांच्या दोन खोल्या कौटुंबिक, तर वासरी (माजघर), वसरी (ओसरी), माळी (माडी) या जागा सर्व बिर्‍हाड मंडळीत सार्वजनिक म्हणून वापरत. देवघर हे माजघराचाच भाग आणि त्याच भल्यामोठ्या लांबलचक माजघरात सगळे कार्यक्रम पार पडत.

पहाटे पाच वाजता आबा, काकीआजी, बाबलमामा, मामी, गोविंदमामा या बहुतांश वयस्क मंडळींची सकाळ व्हायची. त्यात आबा आणि काकीआजी ही दोघंजण पंचावन्नच्या आसपासची म्हणजे तुलनेने मध्यमवयीन आणि उत्साही. बाबलमामा सकाळी रेडिओ लावायचे. पहाटेच्या वेळी आल्हाददायक वातावरणात रेडिओची कर्णमधुर निवेदने आकाशवाणीवर ऐकणे ही खरेतर आजही एक पर्वणीच. पहिलं वंदेमातरम् गीत आणि नंतरची उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांच्या सनईने होणारी दिवसाची सुरुवात. हा दिनक्रम घरात कधी चुकला नाही.

सकाळचा पहिला वाङ्गाळता चहा आणि आणलेली वृत्तपत्रे वाचून झाल्यावर बेडे (ओली सुपारी) गोळा करायला जाणं. जाताना कमरेला पिस्तुल खोवतात तसं कोयतुल (छोट्या आकाराचा कोयता) खोवणं आणि हातात बादली घेऊन आगरात बेडे पुंजवायला जाणं. जाऊन आलं की नाश्ता आणि मग आंघोळ करून नित्यसंध्या आणि षोडशोपचार पूजा करणं हे घरातील कर्ते पुरुष आलटून-पालटून करायचे.

रोज पुरुषसूक्त, रूद्र, श्रीसूक्त, गणपत्यथर्वशीर्ष, अशी कंठस्थित सूक्तपठणं करून शाळिग्रामयुक्त पंचायतनाची पूजा घरातील पुरुष- सोयरसुतक वगळता- अगदी नेमाने न चुकता करत. माध्यान्ह संध्याकर्मानंतर षोडशोपचार पंचायतन पूजा, तद्नंतर पंचायतनाला अन्नमय नैवेद्य, काकरूपात मागीलदारी जुन्या आंब्यावर येऊन नेमाने वाट पाहणार्‍या पितरांना खाली असलेल्या चौथर्‍यावर मूठभर भात वाढणं आणि त्यानंतर पूजा करणार्‍या कुटुंबानं एक ते दीडच्या दरम्यान जेवणं हे सगळं दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून राहिलं होतं. संध्याकाळी देवासमोर पाट घालून, पाटावर बसून ‘शुभं करोति’ने सुरुवात करून गणपती स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, नवग्रह स्तोत्र, मनाचे श्लोक, विष्णू सहस्त्रनाम हा सगळा परवचा घरातील ठरावीक मंडळी म्हणायची. देव सोयरसुतक वगळता कधी पारोसे राहिले नाहीत. भागवत एकादशी सोडून कधी त्यांनी उपवास धरला नाही आणि पितरं मूठभर भात जेवल्याशिवाय सहसा भुकेली माघारी ङ्गिरली नाहीत. हा गुढीपाडवा ते तो गुढीपाडवा आणि यामधल्या सणावारांना, श्राद्धकर्माला माणसांची, ब्राह्मणांची आणि प्रयोग चालवणार्‍या पुरोहितांची ऊठबस व्हायची. नवीन वर्षाच्या चैत्र महिन्यातील तुळशी वृंदावनासमोरचं सुरेख चैत्रांगण, आषाढी एकादशीला देवाला ङ्गराळाचा नैवेद्य, श्रावणात पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली श्रावणी प्रयोग, चतुर्थीच्या आदल्या दिवशी सकाळी एका बाजूला पुरुषांनी माटोळी बांधणं तर बायकांनी गौरीपूजा करणं हे प्रतिवार्षिक इतिकर्तव्य. माझ्या आजोळी गणपती आणण्याची जबाबदारी एका बिर्‍हाडाची. पूजा करणारं बिर्‍हाड दुसरं आणि उत्तरपूजा करणं हे तिसर्‍या बिर्‍हाडाचं कर्तव्य. कोणता तरी एक दिवस धरून संपूर्ण घराण्यातील द्विभुज तसेच चतुर्भुज पुरुष मांडीला मांडी लावून गणपत्यथर्वशीर्षाची आवर्तने म्हणायचे. आश्विन महिन्यात देवघरात देव्हार्‍यासमोर नवरात्र बसायचं. आश्विन शुद्ध प्रतिपदेस स्थापन केलेल्या घटरूपी महालक्ष्मीला षोडशोपचार पूजा, वरण, पुरण, तळण असा पंचपक्वांन्नांनी युक्त नैवेद्य अर्पण व्हायचा. नऊ दिवस ऋतुकालोद्भव पुष्पांची माळ चढायची. संध्याकाळ देवीस्तोत्रांनी भारावून जायची. आई महालक्ष्मी कृपाछत्र धरत होती… दिवाळीच्या आदल्या दिवशी धनत्रयोदशीला मडकीचे पोहे, नरकचतुर्दशीला नरकासुरदहन आणि मग अभ्यंगस्नान करून गुळपोहे, दहीपोहे, ङ्गोडणीचे पोहे, कढीचे पोहे, सुके पोहे, शेव, चिवडा, चकल्या, लाडू असा हा एकूण पृथकखाद्याचा आगळावेगळा थाट धाकट्या दिवाळीला असायचा. व्हडली दिवाळी म्हणजे तुळसी विवाह. या सणाला किमान तीन प्रकारचे पोहे असायचे. सुक्या पोह्यात नुकताच तयार झालेला ऊस मानाचं स्थान पटकावून बसायचा. दिवाळी होऊन थंडीचा कडाका वाढला की कालौत्सवाची चाहूल लागायची. कालौत्सव झाला की शिगमा, शिगम्यात शबय मागणारे, गाणी म्हणत नाचखेळ करणारे मेळे पुढील दारी यायचे. त्यांना नारळ वगैरे देऊन संतुष्ट करणे हे घरातल्यांचे कर्तव्य.

हा असा संसाराचा रहाटगाडा निरंतर चालू होता. कुठेच काही अडत नव्हतं आणि कुणावाचून बिघडत नव्हतं. ङ्गक्त मागच्या दहा वर्षांत आबा आणि बाबलमामा अंतरले ही मोठी उणीव भासली. दुसर्‍या दिवशीची पहाट अडवई गावासाठी काय घेऊन येणार होती याची पुसटशी कल्पनाही कुणाला नव्हती. हा पाऊस नेहमीचाच असेल आणि ङ्गक्त आगरात पाणी भरून मग चोवीस तासात ओसरेल असा आमचा एकूण कयास होता.

मी काकीआजीच्या घरात वरच्या खोलीत, तर काकीआजी, अपूर्वा आणि रूक्मा खालच्या खोलीत झोपली होती. पिठलं-भाकरी खाऊन सुस्ती आलेली, आम्हाला गाढ झोप लागली होती. यात पावसाच्या रिमझिम सरी रात्रभर चालूच होत्या.
२३ जुलै २०२२ च्या सोमवारची पहाट! पहाटे सहा वाजता आजीच्या खालच्या खोलीचं मागीलदार कोणीतरी धडाधडा वाजवू लागलं. पहाटेही धुवांधार पाऊस चालूच होता. आजीने कानोसा घेतला तर दादामामा जिवाच्या आकांताने ओरडून सांगत होता, ‘‘उठा! उठा! पाणी आलें! खळें भरलें!’’ तसा एकच आरडाओरडा सुरू झाला. सगळ्या बिर्‍हाडांतून सगळीजणं पुढील दारी धावली. बघतात तर खळ्यात कमरेपर्यंत पाणी भरलं होतं. खालच्या बाजूला कृष्णा आप्पांचं घर मातीचं आणि आता पाण्यानं वेढलेलं. दादामामा जमिनीवर झोपलेला असता त्याच्या अंगाला पाणी लागलं अन् उठून बघतो तर अख्ख्या घरात आणि बाहेरच्या खळ्यात पाणी तुडुंब भरून वाढत होतं.

अभिषेक आणि साधना ही आप्पांची नातवंडं जे मिळेल ते सामान आणून वरच्या घरात ठेवत होती. मी, सिद्धेश, दिपुदा असे आम्ही तिघेही सरसावलो आणि थोडंङ्गार सामान आणलं. पाणी दर मिनिटाला जमत होतं. कमरेपर्यंत असलेलं पाणी अर्ध्या तासात पोटापर्यंत वाढलं. माझ्या आजोळचं घर ओढ्यापासून ङ्गक्त पन्नास मीटरवर आणि अचानक आलेल्या या पुराच्या पाण्यात ते दर तासाला वेढलं जात होतं.

आम्ही कंबरभर पाण्यातून जाऊन आप्पांच्या घरातून सगळ्यात शेवटी वॉशिंग मशीन आणलं आणि ते आणताना आम्हाला चर्र चर्र चर्र असा काळजात धडकी भरवणारा आवाज ऐकू येत होता. संपूर्ण मातीचं घर, मातीचे पारे… आणि अशा या घराचे मागचे पारे कोसळतानाचा आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू येत होता. एकेक भिंत धडाधड कोसळत होती. आप्पांच्या विहिरीचं पाणी आणि पुराचं पाणी एक झालं होतं. आम्ही त्या घरातून निघून कसेबसे पाण्यातून वाट काढत, तोल सांभाळत, पाण्याने तुडुंब भरलेल्या अंगणातून या घरात आलो आणि बघतो तर अर्ध्या तासात पाणी एक पायरी वाढून ओसरीवर आलं होतं. कदाचित ओसरीवर पाणी येणार नाही म्हणून आम्ही आप्पांच्या घरचं सामान ओसरीवर आणून ठेवलं आणि थोडंङ्गार आमच्या खालच्या खोलीतही ठेवलं. पण ते सामान तिथून उचलून परत माजघरात आणून ठेवावं लागलं. पुढच्या दहा मिनिटांत ओसरी पुराच्या पाण्याने भरली. आजीची खालची खोली पूर्णपणे भरली आणि आम्ही लोकं तिथलं सामान या आशेनं वरच्या खोलीत हलवत होतो की वरच्या खोलीत अजून पाणी भरणार नाही. पण पुराचं पाणी आमचे सगळे अंदाज भिजवून वाढता वाढता वाढतच गेलं. ओसरी आणि माजघर जोडणारी जागा तसेच आजोबांच्या दोन्ही खोल्या पाण्याने भरल्या. पुराचं पाणी आजीच्या वरच्या खोलीत पोहोचलं आणि बाहेर माजघरात ते एव्हाना शिरायला सुरुवात झाली होती. सकाळचे साडेसात वाजले. मातीच्या भिंती पडत होत्या आणि ते आवाज ऐकू येत होते. आप्पांचं घर पूर्णपणे पुरात जमीनदोस्त झालं होतं. आम्ही परत ओसरीवर जाणं धोक्याचं होतं, कारण संपूर्ण मातीच्या घरातील सर्व खोल्या पाण्याने भरल्या होत्या आणि ते कधीही कोसळलं असतं. पूर्वेला वहाळाच्या बाजूने उतार आणि दोन्ही घरांची मुख्य दारं पूर्वाभिमुख असल्याने पुढल्या दारी आधी पाणी भरलं. आणि जसजसं पाणी भरत गेलं तसतशी आम्ही सगळीजणं मागेमागे सरकलो. पुढल्या दारी त्या बाजूला जाऊन काय परिस्थिती आहे याची खात्री करून घ्यायचा धोका कुणीही घेतला नाही.
सकाळचे साडेनऊ वाजले. पाणी पूर्ण घरात भरून आब्बांच्या गोठ्याला टेकलं होतं. घरात एक पुरुष एवढं पाणी भरलं होतं. घरातल्या सगळ्या मंडळीनी गोठ्यात आश्रय घेतला होता. साडेनऊ नंतर आमची खालची खोली, गणपतीची खोली वगैरे पुढील भाग जमीनदोस्त झाला. दहा ते सव्वादहा या दरम्यान संपूर्ण घर आम्हा सर्वांच्या डोळ्यांदेखत जमीनदोस्त झालं. तो कडाकडा कोसळणारा शंभर वर्षे जुना डोलारा आमचं अंतःकरण पिळवटून गेला. जणू आमचा देहच तो! आम्ही लहानपणापासून मनात जपून ठेवलेली ही वास्तू आणि तिच्यासोबत आम्हीदेखील कडाकडा मोडून उन्मळून पडतोय की काय असा भास व्हावा. तटातट तुटणार्‍या कांबी, वासे, कोनवासे देहाच्या आतील हाडं तुटावीत, शिरा तुटाव्यात तसे तुटत होते आणि या आवाजागणिक आम्हा सख्ख्या, चुलत भांवडांना असह्य वेदना होत होत्या. आमच्यापैकी कित्येकजणांनी तर अक्षरशः हंबरडा ङ्गोडला.
एवढं थोरलं घर कडाकडा कोसळत असताना देवघरावरचं छप्पर मात्र शाबूत होतं. देवाने, शाळीग्रामयुक्त पंचायतनाने आपलं रक्षण मात्र आपणच केलं आणि पहाटे सर्वांना सावध करण्याची पूर्वयोजनादेखील त्याचीच असावी. त्याने माणसांना वाचवलं, पण घराला वाचवणं मात्र त्यालाही शक्य झालं नसावं.
हे घर कुणा एकाचं असं नव्हेच. या घराला जोडलेले आप्तेष्ट, स्नेही, मित्रपरिवार, नातेवाईक… आणि असा हा गोतावळा गेल्या सव्वादोन शतकांपासून या घराशी जोडला गेला होता. हे घर म्हणजे माप ओलांडून घरात आलेल्या सुनांचं हक्काचं घर, माहेरपणाला आलेल्या माहेरवाशिणीचं मायेचं घर. वर्षानुवर्षे देखभाल, दुरूस्ती करून हा डोलारा सांभाळणार्‍या कर्त्या पुरुषांचं हक्काचं छत्र! ज्यांनी खुंटी मारून मठी जोडली त्या पूर्वजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महावास्तू! एकेकाळी माड्या (पोङ्गळीची झाडं) मोजून आपली मुलगी या घरात देणार्‍या आईबापांच्या घराण्याशी सलगी राखून असलेलं हे घर! ज्यांना या घरच्या मुली सहचारिणी म्हणून लाभल्या त्या जावईबापूंची ही सासुरवाडी! परक्या घरी या घरच्या धुवांची (मुलींची) मायेने आणि वात्सल्याने पाठवणी केलेलं हे घर! एकेकाळी पाऊणशे लोकांचा राबता असलेलं आणि अनेकांना घरचे, बाहेरचे, आपले, परके असा भेदभाव न बाळगता आसरा देणारं हे घर! हे घरच होतं ज्याने माणसांना बांधून ठेवलं होतं, बिर्‍हाडांना गुंफून ठेवलं होतं आणि कुटुंबाला एकत्र ठेवलं होतं.

वेदमंत्रांचे उच्चघोष रोज या माजघरात घुमत होते. पंचसूक्त पवमान, श्रीसूक्त, पुरुष सूक्त आणि गणपत्यथर्वशीर्ष यासारख्या वेदोक्त सूक्तांची पठणं वासरीत केली जायची. कित्येक कार्यक्रमाच्या निमित्ताने जेवणावळी घातल्या जायच्या. मागीलदारातील भल्यामोठ्या वायनाच्या (दगडी रगडा) अवतीभवती बसून बायका रोजच्या जीवनातील सुख-दुःख वाटून घ्यायच्या. आब्बांच्या घरचं मागीलदार म्हणजे जणू गोलमेज परिषद. तिथं आरामखुर्चीत आब्बा आणि अनेक वयस्क मंडळींचा संवाद आणि वादविवाददेखील व्हायचा. आलेला पाहुणा-रावळा कधी विन्मुख होऊन परतला नाही. पण २३ जुलै महिन्याच्या सोमवारची सकाळ काळ होऊनच आली आणि कुणाचं आजोळ, कुणाचं माहेर, कुणाचं सासर तर कुणाची सासूरवाडी निष्ठूरपणे आणि निर्दयपणे लुटून घेऊन गेली. शेकडो लोकं या मोडून पडलेल्या शतायुषी वास्तूला पाहून गेले. अजून मोडून पडलेली मने आणि माणसे सावरायची आहेत. आम्ही सर्व भावंडांनी हे घर बघितलं, अनुभवलं, येथे राहिलो, खेळलो, बागडलो, हसलो, रडलो, भांडलो, एकत्र झालो हे आमचं भाग्य! पण ही आनंदवास्तू आमच्या पुढच्या पिढीला अनुभवता आली नाही याची मात्र खोलवर खंत राहील…