देशाच्या सर्वोच्च पदी द्रौपदी मुर्मू

0
20
  • – दत्ता भि. नाईक

श्रद्धा, कष्ट करण्याची तयारी व जिद्द यांच्या जोरावर सामान्यातील सामान्य माणसे यशाचे अत्युच्च शिखर गाठू शकतात हे या निवडणुकीने सिद्ध केले. आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी वंचित व दलित समाजाला विकासाचे गाजर दाखवून त्यांची फसवणूक केली. पण यावेळी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ओडिशा राज्यातील, जनजाती समाजातील महिला द्रौपदी मुर्मू यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आणि त्या विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यावर भरघोस मतांनी मात करून देशाच्या पंधराव्या, दुसर्‍या महिला व जनजाती समाजातील प्रथम व्यक्ती म्हणून देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून आल्या.

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जेव्हा ओडिशा राज्यातील जनजाती समाजातील महिला द्रौपदी मुर्मू यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले तेव्हाच त्यांचा विजय निश्‍चित झाला होता. दि. १८ जुलै रोजी मतदान होऊन २१ रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यावर भरघोस मतांनी मात करून द्रौपदी मुर्मू या देशाच्या पंधराव्या, दुसर्‍या महिला व जनजाती समाजातील प्रथम व्यक्ती म्हणून देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून आल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांना पडलेल्या मतांचे मूल्य ४ लाख ८३ हजार २९९ एवढे असून, यशवंत सिन्हा यांच्या वाट्याला १ लाख ८९ हजार ८७६ मूल्याची मते आली. द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने विरोधी पक्षांच्या कित्येक आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे वृत्त आहे.

लोकसंख्येनुसार मतांचे मूल्य
‘रालोआ’कडून ज्या पद्धतीने उमेदवाराची निवड झाली, ती पाहता सर्व विरोधी पक्षांना अडचणीत आणणारा असा हा निर्णय होता. द्रौपदी मुर्मू या ओडिशामधील व त्यातही जनजाती समूहातल्या, त्यामुळे बिजू जनता दलाचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी त्यांना त्यांच्या पक्षातर्फे ताबडतोब पाठिंबा दिल्याची घोषणा केली. अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरे यांनीही त्यांना पाठिंबा जाहीर केला.

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभा व राज्यसभा अशा संसदेच्या दोन्ही सभागृहांचे खासदार व राज्याचे आमदार मतदान करतात. याला इलेक्टोरल कॉलेज म्हणजे निर्वाचक मंडळ या नावाने ओळखतात. संसदेतील खासदारांच्या मतांचे मूल्य देशाच्या लोकसंख्येवरून ठरवतात, तर त्याच न्यायाने राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य अनुक्रमे त्या-त्या राज्यातील लोकसंख्येनुसार ठरवले जाते. गोवा व सिक्किम यांसारख्या छोट्या राज्यांतील आमदारांच्या मतांचे मूल्य कमी असते. प्रत्येक मतदाराला पहिल्या व दुसर्‍या पसंतीचे मत नोंदवता येते. निवडून येणार्‍यास पन्नास टक्क्यांहून जास्त मूल्याची मते मिळवावी लागतात. यंदाच्या निवडणुकीत दोनच उमेदवार असल्यामुळे हा प्रश्‍न उभा राहत नव्हता. कोणासही पन्नास टक्क्यांहून जास्त मते मिळाली नाहीत, तर तिसर्‍या उमेदवाराची दुसर्‍या पसंतीची मते मोजली जातात. १९६९ साली कॉंग्रेस पक्षाचे नीलम संजीव रेड्डी, पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे व्ही. व्ही. गिरी व विरोधी पक्षांचे सी. डी. देशमुख असे अनुक्रमे तीन उमेदवार होते. मतमोजणीत कॉंग्रेस पक्षाचे संजीव रेड्डी यांना बहुसंख्य मूल्याची मते असली तरी ती पन्नास टक्क्यांहून कमी होती म्हणून तिसरे उमेदवार सी. डी. देशमुख जे निवडून येणार नव्हते, त्यांची दुसर्‍या पसंतीची मते मोजण्यात आली व त्यामुळे इंदिरा गांधी यांचे उमेदवार असलेले व्ही. व्ही. गिरी हे देशाचे चौथे राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
१९६९ ते २०२२ या काळात देशातील सर्व नद्यांतून बरेच पाणी वाहून गेले आहे. ‘आमच्या पक्षाचे तत्त्वज्ञान इतके कठीण आहे की ते समाजाला समजेल व आम्हाला सत्ता मिळेल ही शक्यता दुरापास्त आहे’ असे मत भारतीय जनसंघाचे अध्वर्यू स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी वक्तव्य केले होते. त्याच जनसंघाचा नवीन अवतार असलेल्या भारतीय जनता पार्टीचे आज संसदेत बहुमत आहे.

मयुरभंजमध्ये आनंदोत्सव
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गेली पंचवीस वर्षे समाजकारण व राजकारणात कार्यरत आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द गावातील राजकारणापासून सुरू झाली. त्यानंतर त्या निरनिराळ्या मंडळांवर निवडून आल्या. ओडिशा राज्यातील रायरंगपूर मतदारसंघातून त्या विधानसभेवर निवडून आल्या व भाजपा- बिजू जनता दल संयुक्त सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले आहे. पाच वर्षे त्या झारखंडच्या राज्यपालही होत्या.
ओडिशामधील मयुरभंज जिल्ह्यातील त्यांचा जन्म. २० जून १९५८ हा त्यांचा जन्मदिवस. १९७९ मध्ये त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सुरुवातीला जलसिंचन खात्यात कारकुनाची नोकरी केली. त्यानंतर त्यांनी शिक्षिकेची नोकरी धरली. राजकारणात उतरल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. जनजाती म्हणजे समाजाच्या परिवर्तनाच्या प्रवाहापासून दुरावलेला समाज. घराण्याची प्रतिष्ठा नाही तर प्रसिद्धीचा भपका नाही, अशा वातावरणातून पुढे आलेल्या या द्रौपदी मुर्मू. त्यांच्या दोन मुलांचा एकापाठोपाठ एक असा मृत्यू ओढवला. त्यानंतर त्यांचे पती श्यामचरण मुर्मूही स्वर्गवासी झाले. आता काय करायचे अशा चिंतेने त्यांना ग्रासले होते. त्यातूनही त्या बाहेर आल्या. समाजातील मागे पडलेल्या जनतेची सेवा करण्याचे व्रत त्यांनी घेतले. आध्यात्मिक वृत्ती हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे.

उमेदवारी घोषित होताच त्या नेहमीप्रमाणे शंकराच्या मंदिरात गेल्या व झाडू घेऊन मंदिर स्वच्छ केले. त्यांनी मंदिरातील सर्व कर्मचार्‍यांसोबत गप्पागोष्टी करत वेळ घालवला. त्यांची उमेदवारी घोषित होताच मयुरभंजमध्ये लोकांनी आनंदोत्सव साजरा केला.
नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्याकडून समाजावर दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले गेले. आतापर्यंत पद्म पुरस्कार प्रसिद्धीच्या झोतात असलेल्यांनाच दिले जायचे. आज ज्या पद्धतीने तळागाळातील कलाकार व कार्यकर्त्यांची निवड केली जाते त्यावरून परिस्थिती किती बदलली आहे हे लक्षात येते. मोठी पदे मिळाल्यावर हवेत जाणारे व स्वतःच्या समाजाला विसरणारे खूप नेते असतात. असे नेते काही काळानंतर विस्मृतीच्या गर्तेत गेलेले दिसून येतात.
यशवंत सिन्हा का म्हणून?
वाट्याला आलेली कामे मुकाटपणे करणार्‍या जनजाती समाजाचे देशाच्या विकासात फार मोठे स्थान आहे. इंग्रजांच्या विरोधात लढणारे भगवान बिरसा मुंडा, कियांग नांगबाह, चुर्का मुर्मू, अल्लुरी सीताराम राजू यांसारखे अनेक क्रांतिवीर होऊन गेले. ते सशस्त्र क्रांतीचे प्रणेते होते म्हणून त्यांच्यावर स्वातंत्र्यानंतर बहिष्कार घालण्यात आला व त्यामुळे आजच्या पिढीला त्यांच्याबाबतीत विशेष माहिती असलेली दिसून येत नाही.

भारतीय जनता पार्टी हा उच्च वर्गीयांचा पक्ष असून कम्युनिस्ट व कॉंग्रेस धरून सर्व राजकीय पक्ष बहुजनांचे पक्ष आहेत असा प्रचार सतत केला गेला. मार्क्सच्या चष्म्यातून जगाकडे पाहणार्‍यांना खरी परिस्थिती दिसलीच नाही. विरोधी पक्षांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार सापडत नव्हता ही वस्तुस्थिती आहे. यशवंत सिन्हा हे स्व. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते. मोदी यांच्याशी त्यांचे कुठे बिनसले हे कळण्यास मार्ग नाही. पक्षाला चिकटून राहिले असते तर त्यांना कुठल्या तरी राज्याचे राज्यपालपद मिळाले असते. परंतु त्यांच्या अपेक्षा त्याहून वेगळ्या असाव्यात. ते प्रसारमाध्यमांसमोर मुलाखत देतात तेव्हा त्यांच्या बोलण्यात सुसूत्रतेचा अभाव असल्याचे लक्षात येते. मोदीविरोध सोडून त्यांच्याकडे कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याचे लक्षात येते. ही गोष्ट त्यांना उमेदवारी देणार्‍यांच्या लक्षात आली नसावी असे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु आपला कुणीतरी हवा म्हणून त्यांना उमेदवारी दिली गेली असावी.

देशाचे राष्ट्रपतिपद हे साधेसुधे पद नाही. राष्ट्रपतिपदावर विराजमान व्यक्ती सर्व न्यायालयांचा प्रमुख न्यायाधीश व सर्व सेनादलांचा प्रमुख सेनापती असते. श्रद्धा, कष्ट करण्याची तयारी व जिद्द यांच्या जोरावर सामान्यातील सामान्य माणसे यशाचे अत्युच्च शिखर गाठू शकतात हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे. आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी वंचित व दलित समाजाला विकासाचे गाजर दाखवून त्यांची फसवणूक केली असा अनुभव आहे. लक्षात भरेल अशी घटना म्हणजे ज्या भारतीय जनता पार्टीला उच्चवर्गीयांचा पक्ष म्हणून हिणवले जात असे, त्या पक्षाने वंचित समाजातील द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी दिली, तर वंचितांचे पक्षधर म्हणवून घेणार्‍यांनी राजघराण्यातील यशवंत सिन्हा यांना पुढे केले.