आठवणीतले गुरुवर्य ः बाळकृष्ण केळकर

0
167
  • गौरीश तळवलकर
    बोरी- फोंडा

एक उत्तम व्यक्ती, ध्येयवेडे असे संगीत शिक्षक, गुरु, एक उच्च दर्जाचे गायक कलाकार, एक उत्तम वक्ता अशा अनेक गुणांचे धनी होते आमचे केळकर गुरुजी. या लेखाच्या निमित्ताने मी त्यांना माझी आदरांजली अर्पण करतो. शेवटी एवढंच म्हणेन- ‘गुरु एक जगी त्राता| गुरु दयासिंधू गुरु दीनबंधू| गुरु जननी जन्मदाता|’

या जगातून सर्वांना कधी ना कधीतरी जायचंच आहे, पण थोड्यांचं जाणं हे मनाला काही काळ पटत नसतं. २५ मे रोजी निधनाची वार्ता कळली व हृदय हेलावून गेलं. आज त्यांना जाऊन पंधरा दिवस झाले त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मी हा लेख लिहायला घेतल्यावर अनेक आठवणीतले प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले.

त्यांना सर्वात प्रथम मी पाहिलं ते एका स्पर्धेत. त्या स्पर्धेत त्यांनी स्पर्धक म्हणून भाग घेतला होता व एक नाट्यगीत म्हटलं. एवढं प्रभावीपणे ते त्यांनी सादर केलं की त्या क्षणापासून मी ठरवलं की काही केलं तरी यांच्याकडे गाणं शिकायचंच. त्याच दरम्यान दादा वैद्य हायस्कूलमध्ये मी संगीत शिक्षक म्हणून रुजू झालो व तिथेच माझी भेट सौ. ज्योत्स्ना वझे यांच्याशी झाली. त्या त्यावेळी केळकर गुरुजींकडे गाणं शिकत होत्या. तर बोलता बोलता मी म्हटलं की मला तुम्ही त्यांच्याकडे घेऊन जाल का? मला गाणं शिकायचं आहे… तर त्या लगेच ‘हो’ म्हणाल्या व एक दिवस आम्ही दोघांनी केळकर गुरुजींची भेट घेतली व त्यांनी मला गाणं शिकवायचं मान्य केलं. त्यानंतर दर आठवड्याला दोन दिवस असे मी त्यांच्या घरी म्हणजेच खोर्ली, ओल्ड गोवा येथे नियमित जाऊ लागलो. मध्यमा प्रथम ते विशारद पूर्ण पर्यंतच गायनाचं शिक्षण माझं त्यांच्याकडे झालं. तिथे त्यांच्या अभिजात सांस्कृतिक मंडळ या संस्थेत मी काही काळ तबला पण शिकलो.

गाणं शिकताना आमचे खूप घरोब्याचे संबंध झाले. मी माझ्या सर्व गोष्टी त्यांना सांगायचो, संगीताविषयी जे काही विचार मनात येत ते सर्व त्यांच्याकडे मांडायचो व आमची खूप वेळ अशी चर्चापण व्हायची. या चर्चेदरम्यान मी केळकर गुरुजींच्या तोंडी कधीच कुठल्या कलाकाराबद्दल वाईट बोललेलं ऐकलं नाही, सदैव सर्व कलाकारांचं चांगलं काय ते मला सांगायचे. कुठे काही संमेलन असेल तर त्या संमेलनात कोण काय गायला, कसं गायला यासंबंधी आमची चर्चा व्हायची. केळकर गुरुजींचा व माझा संबंध अधिक दृढ झाला तो आम्ही दरवर्षी वझर्‍याला जायचो त्यामुळे. तिथे गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्या स्मारकानिमित्त काहीतरी हालचाली, घडामोडी व्हायला पाहिजेत म्हणून दरवर्षी देशभक्तिपर गीत व मनाचे श्लोक स्पर्धा व्हायच्या. हे सर्व आयोजन केळकर गुरुजी, गंगाराम वझे व गावातील काही मंडळी मिळून करायचे. तिथे मला ते परीक्षक म्हणून न्यायचे. दरम्यानच्या काळात त्यांचं हृदयाचं ऑपरेशन झालं, बायपास सर्जरी झाली व त्यामुळे ते काही काळ शिकवू शकले नाहीत, त्यादरम्यान मी त्यांच्या संस्थेत त्यांच्या जागी काही काळ मुलांना शिकवायला जायचो.
आणखी एक आठवण सांगायची झाली तर ‘संगीत मंदारमाला’ या नाटकात ते मंदारची प्रमुख भूमिका करायचे व त्यांचा नाट्यप्रयोग फोंड्याच्या कलामंदिरमध्ये होता, तुडुंब गर्दी होती आणि सुरुवातीलाच राग अहिर भैरवमध्ये आलापी सुरू केली.. इतकी सुरेल व अप्रतिम होती की ते सूर माझ्या कानात अजूनही गुंजन घालत आहेत. त्या नाटकात त्याचं गायन अफाट होतं. ज्यांनी ज्यांनी ते नाटक बघितलं ते जाताना त्यांचे सूर कानात साठवून घरी गेले असतील, त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडलं.

आणखी एक आठवण म्हणजे गांधर्व महाविद्यालयाचं तीन दिवसांचं शिबिर सुरत, गुजरातमध्ये होतं. तिथे गोव्यातून आम्ही तिघेजण गेलेलो… मी, केळकर गुरुजी व माधव मणेरीकर. तिथे तीन-चार दिवस आम्ही सलग एकाच ठिकाणी राहिलो, त्याच दरम्यान केळकर गुरुजींबरोबर मी त्यांच्या नातेवाईकांकडे गेलो, आम्ही खूप फिरलो. केळकर गुरुजी मला अजून जवळचे वाटू लागले. ते स्वतःला कधी मोठे समजतच नव्हते, सदैव विद्यार्थी म्हणूनच दुसर्‍यासमोर अदबीने वागायचे, बोलायचे. नम्रपणा त्यांच्यात ठासून भरलेला होता. माझी त्यांच्याबरोबर त्यांच्याच शिकवणीखाली विशारद ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मी अलंकार शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे जात होतो, पण त्यांनी मला आता तू दुसरा गुरु बघू शकतोस असं एकदम मोठ्या मनाने व आपुलकीने सांगितलं. त्यानंतर मी डॉ लक्ष्मीकांत सहकारी (पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य) यांच्याजवळ गाणं शिकायला सुरुवात केली, पण त्यानंतरही माझे व केळकर गुरुजींचे संबंध कायम तसेच होते, फोनवर बोलणे व्हायचेच.

त्यांची साठ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त एक मोठा कार्यक्रम घडवून आणला होता, त्यामध्ये मला त्यांच्याविषयी दोन शब्द बोलायची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
ज्यावेळी आम्ही आमचा गीत महाभारत हा कार्यक्रम कला अकादमी येथे आयोजित केला त्यावेळी आम्हाला केळकर गुरुजी प्रमुख पाहुणे तसेच सहकारी गुरुजी हे उद्घाटक म्हणून लाभले, माझ्यासाठी हा सुवर्ण योग होता. कारण माझ्या दोन्ही गुरुजींसमोर मला गीत महाभारत सादर करता आला.
मला शेवटचं त्यांच्याशी नीट बोलता आलं ते मडकई येथील एका स्पर्धेदरम्यान. त्या स्पर्धेत मीपण त्यांच्याबरोबर एक परीक्षक म्हणून होतो. त्यावेळीही त्यांनी खूप शिकण्यासारख्या गोष्टी सांगितल्या.

माझी व त्यांची शेवटची भेट झाली ते त्यांचे चि. मंदारच्या स्वागत समारंभाच्या वेळी, तीच आमची शेवटची भेट ठरली. आता फक्त आठवणी उरल्या आहेत. एक उत्तम व्यक्ती, ध्येयवेडे असे संगीत शिक्षक, गुरु. एक उच्च दर्जाचे गायक कलाकार, एक उत्तम वक्ता अशा अनेक गुणांचे धनी होते आमचे गुरुजी. या लेखाच्या निमित्ताने मी त्यांना माझी आदरांजली अर्पण करतो. शेवटी एवढंच म्हणेन
‘‘गुरु एक जगी त्राता | गुरु दयासिंधू गुरु दीनबंधू | गुरु जननी जन्मदाता|’’