आज गरज शक्तिउपासनेची

0
277

योगसाधना – ४८२
अंतरंग योग – ६७

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आज कोरोनामुळे प्रत्येकजण गोंधळलेला आहे. धीर धरायलाच हवा. संकटावर मात करण्यासाठी विविध उपाय शोधायलाच हवे. आनंदाची गोष्ट हीच आहे की असे सकारात्मक उपाय चालूच आहेत. यासाठी मुख्य गरज आहे ती म्हणजे अतूट ईशश्रद्धा आणि विविध शक्तींची – शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक.

ईश्‍वराने बनवलेले हे विश्‍व फार मोठे आहे. आमच्यासारख्या सामान्य मानवाच्या बुद्धीपलीकडे विचार केला तरी नक्की समजणार नाही आणि प्रत्येक क्षेत्रात किती वेगळेपणा…

  • जीव, जंतू, प्राणी, पशु, पक्षी….
  • मानव ः देश, भाषा, वंश, वर्ण, शिक्षण, बुद्धी, ज्ञान. मतं, धर्म…
  • पंचमहाभूते ः पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश
    चिंतन केले तर ही न संपणारी यादी आणि आश्‍चर्य म्हणजे तरीही सर्वकाही सृष्टिकर्त्याच्या पद्धतीने केले तर सुरळीत चालते. पण आपण मानव …
  • तथाकथित ज्ञानी किंवा विपरीत ज्ञानी
  • स्वार्थी – षड्‌रिपूंचे गुलाम, अहंकारी
    आपल्या मर्यादित बुद्धीप्रमाणे सगळीकडे लुडबुड करतो. त्यामुळे सृष्टीचा तोल बिघडतो. मग काय?
  • तंटे, बखेडे, लढाया
  • अत्याचार, लाचलुचपत, बलात्कार
  • पर्यावरण विनाश
  • रोगराई
    या सर्वांमध्ये अग्रेसर म्हणजे सध्या सगळीकडे धुमाकूळ घालणारा विषाणू- कोरोना. त्यामुळे प्रत्येकजण गोंधळलेला आहे. आता काहीजण उसना आव आणतात आणि ते बरोबरही आहे. नाहीतर सगळीकडे अव्यवस्था माजेल. धीर धरायलाच हवा. संकटावर मात करण्यासाठी विविध उपाय शोधायलाच हवे. आनंदाची गोष्ट हीच आहे की असे सकारात्मक उपाय चालूच आहेत.
    यासाठी मुख्य गरज आहे ती म्हणजे अतूट ईशश्रद्धा आणि विविध शक्ती – शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक वाढवण्याची.
    योगसाधनेत आपण नवरात्रीच्या निमित्ताने हाच विचार करत आहोत- अष्टशक्तींचा. त्यातील तीन शक्तींचा आम्ही विचार केला. आता चौथी शक्ती..
    ४) सामावून घेण्याची शक्ती – पॉवर टू ऍडजस्ट – संतोषी मॉं.
    विश्‍वातील विविधतेमुळे प्रत्येकासमोर अनेक समस्या ह्या उद्भवत असतात- मग ते छोटेसे कुटुंब असो किंवा कामाची, धंद्याची जागा असो, समाज असो अथवा देश असो… कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यातील अनेक लोक अनेकवेळा घडलेल्या गोष्टी आधी सहन करतात व नंतर सामावूनही घेतात. कारण त्यांचे तत्त्वज्ञान – ‘मी तुझा दोषांसकट स्वीकार करतो’.. असे असते.
    या भावनेसाठी माणसाचे मन फार मोठे असावे लागते. याचा अर्थ अन्याय सहन करावा असे नाही. त्या व्यक्तीला त्याने केलेली चूक – मुद्दाम किंवा अनावधानाने, दाखवून द्यावी पण नंतर मन मोठे करून क्षमा करावी. त्याच्यावर दया करावी.
    सहज समजण्यासाठी उदाहरणच द्यायचे झाले तर ते समुद्राचे दिले जाते. कारण समुद्रात अनेक नद्यांचे पाणी येते. कारण शेवटी नदी समुद्रालाच मिळते. त्यातील पुष्कळ पाणी घाण असते. गटारातून नदीत आलेले असते. पण समुद्र हा विशाल असतो. तो ते सगळे पाणी आपल्या पोटात सामावून घेतो. तो शांत असतो.
    आपल्यातील काही महापुरुषदेखील असेच समुद्रासारखे असतात. त्यांच्या संपर्कात नियमित येणार्‍या व्यक्तीचे दोष ते प्रेमाने सहन करून मग त्यांना आपल्यात सामावून घेतात. दुसरा कसाही वागला, मग तो त्यांचा शिष्य किंवा अनुयायी असू दे तरी ते आपली मर्यादा सोडत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे विश्‍वाच्या तत्त्वज्ञानाबद्दल त्यांचे ज्ञान अगाध असते- एका विशाल समुद्रासारखे.

समुद्राच्या तळाशी एवढी घाण साचलेली असते पण त्याच्या पाण्याला कधीही दुर्गंध येत नाही. तसेच आपले महापुरुष, त्यांचे विचार पवित्रच असतात.
समाजाचे हित बघणार्‍या अनेक महापुरुषांचे चरित्र बघितले तर त्यांचा हा स्वभाव दृष्टिक्षेपात येतो. बालपणी ऐकलेली संत एकनाथांची गोष्ट आठवते. ते महारवाड्यात जायचे म्हणून त्यावेळच्या सनातनी लोकांना राग यायचा. त्यांनी एका गरीब माणसाला सांगितले की ते नदीवरून आंघोळ करून घरी यायला निघाले की त्यांच्या अंगावर थुंकायचे. म्हणजे त्यांना राग येईल. त्याप्रमाणे त्याने तसे केले. संत एकनाथांनी वर बघितले पण त्यांना राग आला नाही. मागे वळले व परत आंघोळ करून आले तेव्हा ती व्यक्ती पुन्हा त्यांच्या अंगावर थुंकली. कथाकार सांगतात की याप्रमाणे शंभर वेळा ही क्रिया करण्यात आली. पण संत एकनाथ शांतच राहिले. शेवटी त्या व्यक्तीलाच आपल्या दुष्कृत्याची लाज वाटली. त्याला एका संत महात्म्याला त्रास दिल्याबद्दल पश्‍चात्ताप झाला. तो माडीवरून खाली आला व एकनाथांचे पाय धरले व क्षमा मागितली.
संत एकनाथ हसत त्यांना म्हणाले, ‘‘काही हरकत नाही. तुम्ही क्षमा मागायची काहीही गरज नाही. मीच तुमचे उपकार मानतो कारण तुमच्यामुळे मला गंगास्नानाचे पुण्य लाभले. प्रत्येक नदीत त्यांना पवित्र गंगेचेच दर्शन होत असे.

सारांश – त्यांची सहन करण्याची शक्ती व तदनंतर सामावून घेण्याची शक्ती जास्त होती.
प्रजापिता ब्रह्माकुमारी याबद्दल समजावताना सांगतात की स्वतः एक पवित्र, शांत आत्मा आहे याची जाणीव सदोदित ठेवा. त्याचबरोबर दुसरी व्यक्तीसुद्धा तशीच आत्मा आहे, परमात्म्याचे संतान आहे याचे ज्ञान ठेवा. या दोन शक्ती प्रत्येकाला सहज प्राप्त होतील.
अशा व्यक्ती सदाकाळ संतुष्ट असतात. त्यामुळे या शक्तीची देवी श्रीसंतोषी मातेच्या मुखावर संतुष्टता दिसते. आम्हाला ही शक्ती देण्याची प्रार्थना संतोषी मातेकडे करु या.
५) त्यानंतरची शक्ती आहे परखण्याची शक्ती – पॉवर टू जज्ज – गायत्री देवी.
प्रत्येकाच्या आयुष्यात विविध प्रसंग हे येतच असतात. त्यावेळी ही घडलेली घटना बरोबर की चूक याची पारख करावी लागते. कारण त्याप्रमाणे आपला निर्णय करून कर्म करायचे असते. प्रतिक्रिया द्यायची असते.
इथे शास्त्रकार उदाहरण देतात ते सोनाराचे. त्याला हिर्‍याच्या खर्‍या-खोट्याचे ज्ञान असावे लागते. नाहीतर त्याला धंद्यात नुकसान होईल. आपल्याला काचेचा एक गुळगुळीत तुकडासुद्धा हिर्‍यासारखाच वाटेल. म्हणून दगड का हिरा हे समजण्याचे ज्ञान जसे असावे लागते तसेच आपल्याबरोबर वावरणार्‍या व्यक्तीचीही पारख असावी लागते. ती नसल्यामुळे अनेक व्यक्ती त्रासात पडतात.

‘चकाकते ते सगळेच सोने नसते’, आज तर या गुणाची अत्यंत गरज आहे कारण असत्यच सत्याच्या रूपात मिरवते आहे.
या शक्तीची देवी आहे गायत्री देवी. तिच्या एका हातात चक्र व दुसर्‍या हातात शंख असतो. प्रजापित्याच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे हे चक्र म्हणजे ‘स्व दर्शन चक्र’ आहे. आम्ही बहुतेकवेळा ‘परदर्शन’ करतो म्हणजे मुख्यतः दुसर्‍याचे दोष बघतो.
आध्यात्मिक विचारांप्रमाणे स्वदर्शन अत्यंत सूक्ष्म आहे. प्रत्येकाने आपल्याला आत्मारूपातच बघायचे. त्याचे गुण बघायचे- पावित्र्य, शांती, सुख, आनंद, प्रकाश, शक्ती. असे नियमित केले तर प्रत्येकाला आत्मसाक्षात्कार होईल.
शंख हे आवाजाचे प्रतीक आहे. त्याचा आवाज शक्तिशाली तसाच मधुर असतो. म्हणून मंदिरात तो पूजेच्या वेळी वाजवला जातो. तसाच युद्धाच्या वेळीही वाजवला जातो.
श्रीमद्भगवद्गीतेच्या पहिल्या (अर्जुन विषादयोग) अध्यायात निरनिराळ्या शंखांचे सविस्तर वर्णन आहे.

  • सर्वांत आधी सिंहासारखी गर्जना करीत भीष्मांनी शंख वाजवला.
  • त्यानंतर श्रीकृष्णानी पाञ्चजन्य, अर्जुनाने देवदत्त, भीमाने पौष्ट्र, युधिष्ठिराने अनंतविजय, नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक नावांचे शंख वाजवले.
    शंख हे मधुर बोलाचे प्रतीक आहे. प्रत्येकाच्या शब्दात मधुरता असावी ही अपेक्षा असते. म्हणूनच म्हणतात- ‘वचने का दरिद्रता?’
    आम्हीही योग्य कल्याणकारीच शब्द बोलावे.
    देवीचे वाहन आहे शुभ्र असा हंस. शुभ्रता हे पवित्रतेचे लक्षण आहे. तसेच हंसाचा एक उच्च व सूक्ष्म गुण आहे. तो मोती व दगड एकत्र ठेवले तर मोत्यांची निवड करतो. त्याशिवाय दूध आणि पाणी एकत्र केले तर त्यातील फक्त दूधच पितो.
    तशीच प्रत्येक व्यक्तीला सत्य-असत्य पारखण्याची शक्ती असायला हवी. अनेक महापुरुष म्हणूनच पांढरे शुभ्र कपडे परिधान करतात. प्रजापितासंस्थेचे अनुयायीसुद्धा असेच कपडे घालतात. त्यांना बघितले की पवित्रतेचे दर्शन होते.
    (संदर्भ ः प्रजापिता ब्रह्माकुमारी यांची प्रवचने)