आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम

0
229
  • दत्ता भि. नाईक

आगामी मार्च-एप्रिलच्या काळात आसाम, प. बंगाल, तामिळनाडू व पुदुचेरी अशा तीन राज्यांत व एका छोट्याशा केंद्रशासित प्रदेशात राज्य विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. ७ मार्चपर्यंत अध्यादेश निघून उमेदवारी अर्ज भरण्यापासून मतमोजणीपर्यंतचा कार्यक्रम जाहीर केला जाईल व म्हणूनच या सर्व राज्यांमध्ये राजकारणाची कढई दिवसेंदिवस गरम होत चालली आहे.

आगामी मार्च-एप्रिलच्या काळात आसाम, प. बंगाल, तामिळनाडू व पुदुचेरी अशा तीन राज्यांत व एका छोट्याशा केंद्रशासित प्रदेशात राज्य विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. ७ मार्चपर्यंत अध्यादेश निघून उमेदवारी अर्ज भरण्यापासून मतमोजणीपर्यंतचा कार्यक्रम जाहीर केला जाईल व म्हणूनच या सर्व राज्यांमध्ये राजकारणाची कढई दिवसेंदिवस गरम होत चालली आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री स्व. जयललिता यांच्या सहकारी असलेल्या शशिकला यांची चार वर्षांच्या कारावासानंतर नुकतीच सुटका झाली आहे. लोकप्रिय अभिनेता रजनीकांत याने अलीकडेच स्थापन केलेला ‘मक्कल सेवई कच्ची’ नावाचा स्थानिक पक्ष, पुदुचेरीमध्ये कॉंग्रेसला गळती लागल्यामुळे मुख्यमंत्र्यांना द्यावा लागलेला राजीनामा, आसाममधील सर्वानंद सोनोवाल यांच्या भाजपा सरकारची पुनः एकदा लागणारी कसोटी व राजकीय संघर्षामुळे पश्‍चिम बंगालमधील राजकारणाची तापलेली भट्टी, यांमुळे गेल्या नोव्हेंबरपासून संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे.

पुदुचेरीचे राजकारण
पुदुचेरी हा छोटासा संघप्रदेश. यातील पुदुचेरीची मुख्य भूमी व करैकल हे दोन प्रदेश तामिळनाडूच्या पूर्व किनार्‍यावर आहेत. यानाम आंध्र प्रदेशच्या किनार्‍यावर आहेत, तर महे हा छोटा प्रदेश केरळच्या पश्‍चिम किनार्‍यावर आहे. असा हा तीन भाषांचा समूह असलेला संघप्रदेश असला तरी पुदुचेरीचे राजकारण साधारणपणे तामिळनाडूमधील राजकारणाशी संबंधित असते. आतापर्यंतचा अनुभव असा आहे की, तामिळनाडूमध्ये ज्या पक्षाची सत्ता येते तोच पक्ष पुदुचेरीमध्ये सत्तेवर येतो. मागच्या निवडणुकीने हा विक्रम मोडीत काढला व तामिळनाडूमध्ये अ. भा. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सरकार सत्तेवर आले असताना पुदुचेरीमध्ये कॉंग्रेस पक्ष सत्ताधारी बनला. आता त्याच कॉंग्रेस पक्षाला घरघर लागली आहे. निर्नायकी अवस्थेला पोहोचलेल्या कॉंग्रेस पक्षातून जसे बुडत्या जहाजातून उंदीर बाहेर पडतात तसे आमदार बाहेर पडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू लागले आहेत. सर्वप्रथम या प्रकरणात संघप्रदेशच्या नायब राज्यपाल श्रीमती किरण बेदी या गुंतलेल्या आहेत असे आरोप केले गेल्यामुळे राष्ट्रपतींनी त्यांची ताबडतोब उचलबांगडी करून तेलंगणा राज्याचे राज्यपाल श्रीमती तमिलीसाई सौंदराराजन यांच्याकडे तात्पुरता नायब राज्यपालपदाचा ताबा सोपवला. त्यामुळे राजकीय वादळ शमले नाही, परंतु ते पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्या पदत्यागामुळे तात्पुरते थांबल्यासारखे वाटते.

रजनीकांतचा प्रभाव
तामिळनाडू राज्याचे राजकारणही सध्या तापत आहे. निवडणुकांचे वातावरण सुरू झाले की राज्यातील सामान्यातला सामान्य नागरिक नेत्यासारखा बोलत असतो. १९६७ च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या के. कामराज यांचा निर्णायक पराभव करून अण्णादुराई यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने राज्यात सत्ता हाती घेतली होती. हिंदी भाषेला विरोध व द्रविड राष्ट्राची संकल्पना हे या पक्षाचे प्रेरणास्थान असल्यामुळे या निकालामुळे संपूर्ण देश हादरला होता. तिरंगी ध्वजासोबत तमिळ ध्वज फडकावणे व राष्ट्रगीताबरोबर ‘झंगू मुझंगू’ हे राज्यगीत म्हणण्याचे प्रकारही सुरू झाले होते. अण्णादुराईंच्या मृत्यूनंतर करुणानिधीनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. एम. जी. रामचंद्रन या अभिनेत्याने स्थापन केलेल्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघममुळे (ज्याचे नंतर अखिल भारतीय अण्णा द्र.मु.क. असे नामकरण करण्यात आले) राज्याचे राजकारण दोन द्रविड पक्षांच्या भोवती फिरू लागले. एम. जी. रामचंद्रन यांच्यानंतर अभिनेत्री जयललिता यांनी पक्षाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सत्तेच्या बाहेर दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहिल्यामुळे राज्यातील कॉंग्रेस हतबल झालेली आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये सिने कलाकारांचे नेतृत्व मानून घेऊन त्यांच्यामागे जाण्याची प्रवृत्ती दिसून येते. याचाच लाभ उठवून तमिळ, त्याचप्रमाणे इतर दक्षिणी भाषा व हिंदी सिनेसृष्टीमध्ये निरनिराळ्या भूमिकांच्या माध्यमातून लोकप्रिय बनलेला रजनीकांत याने नवीन पक्षाची स्थापना करून राजकारणात प्रवेश केलेला आहे. करुणानिधी यांच्या निधनानंतर द्रमुक पक्षामध्ये पुत्र स्टॅलिन व इतरांमधील मतभेद वाढत चाललेले आहेत. राज्यात सध्या अ. भा. अण्णा द्र. मु. क. पक्षाच्या हातात सत्ता आहे. मुख्यमंत्री ई. पलानीसामी व मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांचे नेतृत्व कणकर आहे असे वाटत नाही. जयललिता यांच्यानंतर पक्षाजवळ जनाधार मिळू शकेल असे नेतृत्व नाही ही मोठी समस्या आहे. जयललिता यांच्या अतिशय जवळच्या असलेल्या त्यांच्या सहकारी शशिकला यांनी आता पक्षात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना यापूर्वी पक्षाने महासचिव पदावरून हटवले होते. त्यांनी पक्षाच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले असून १५ मार्च रोजी या आव्हान अर्जावर सुनावणी केली जाणार आहे. रजनीकांत याचा ‘मक्कल सेवई कच्ची’ तामिळनाडूच्या राजकारणात कोणते स्थान मिळवील हे आता पाहायचे आहे. एम. जी. रामचंद्रन, जयललिता किंवा आंध्र प्रदेशचे एन. डी. रामाराव यांच्यासारखा रजनीकांतचा प्रभाव नाही. तरीही मतदारांच्या मनात काय आहे कळत नाही. तामिळनाडूच्या राजकारणापासून चार हात दूर असलेल्या भारतीय जनता पार्टीने हळूहळू राज्याच्या राजकारणात प्रवेश केलेला आहे ही एक लक्षणीय अशी बाब आहे.

आसाममधील परिस्थिती
आसाम व प. बंगाल राज्यांतही याच काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. परदेशी नागरिकांच्या मुद्यावर आसाम राज्यात भारतीय जनता पार्टीचे सर्वानंद सोनेवाल यांचे सरकार सत्तेवर आले. या घटनेला आता पाच वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारने नागरिकता सुधारणा कायदा पारित करून घेऊन या विषयात ठोस निर्णय घेतलेला असला तरी आसाममधील समस्येचा गुंता वाढलेला दिसून येतो. काही सरकारी अधिकार्‍यांनी राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे समस्या सुटण्याच्या मार्गातील अडथळे वाढलेले आहेत.
बांगलादेशमधून आसाममध्ये घुसलेल्या अवैध नागरिकांविरुद्ध स्थानिक लोकांनी जेव्हा आंदोलन सुरू केले होते, तेव्हा हे आंदोलन देशभरातील नागरिकांविरुद्ध असल्याचा तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी खोटा प्रचार केला होता. आजही कॉंग्रेस पक्ष हीच भूमिका चालवत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडून कोणतीही अपेक्षा बाळगता येत नाही.

पश्‍चिम बंगालचे ‘पोरिबोर्तन’
प्रादेशिक अस्मितेचा डंका पिटण्यात तामिळनाडूपाठोपाठ देशभरात सर्वत्र प्रसिद्ध असलेले दुसरे राज्य म्हणजे प. बंगाल. या अस्मितेच्या जोरावर अनेक वर्षे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बंगालला देशाच्या राजकारणापासून अलिप्त ठेवले. विकास या संकल्पनेची कम्युनिस्टांची जागतिक व्याख्या आहे. सत्ता हाती आली म्हणजे ती टिकवणे हाच कम्युनिस्टांच्या दृष्टीने विकास आहे व त्यासाठी पक्षाचा विकास करणे यालाच ते प्राथमिकता देत असतात. त्यामुळे हा सर्व तोल सांभाळणारे नेतृत्व नाहीसे झाले की पक्ष स्वतःच्याच वजनाखाली कोसळतो. या परिस्थितीचा तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी फायदा उठवला. कम्युनिस्ट पक्षाचे उच्चाटन करणारी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या गोटातही त्यांच्याबद्दल सहानुभूती होती. खालसा पंथाच्या तीनशे वर्षांच्या वर्धापनदिनाच्या प्रसंगी त्यांचे वर्णन ‘शेरनी-ए-बंगाल’ अशा शब्दांत केले होते. सध्या मात्र परिस्थिती वेगळी आहे. सरकारी कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांबरोबर मुख्यमंत्री उपस्थित असणे अपेक्षित असते. अशा कार्यक्रमात ‘जय श्रीराम’सारख्या घोषणा दिल्या गेल्यास त्या व्यासपीठ सोडून जात. या एकांगीपणामुळे त्यांच्याबद्दल समाजात चुकीचा संदेश पसरत आहे.

प. बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेच्या जवळ जाऊ शकेल असे वाटत नव्हते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या शक्तीमध्ये सुधारणा झाल्यामुळे व त्रिपुरा व आसाममधील यशामुळे भारतीय जनता पार्टीच्या आकांक्षांना अंकुर फुटले आहेत. ममता बॅनर्जींच्या कारकिर्दीची सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु आता पाच रुपयात भोजनाची थाळी यासारख्या सवंग घोषणा त्यांनी केलेल्या आहेत. कम्युनिस्टांच्या कारकिर्दीत अनेक उद्योग कोलकाता शहर सोडून गेले. याचा परिणाम म्हणून गरिबी व या गरिबीचा सरळ परिणाम म्हणजे भात आणि झोल यावर गुजराण करणारे असंघटित क्षेत्रातील हमाल व इतर कामगार यांचाच भरणा या शहरात आहे व या प्रकारालाच स्वस्ताई म्हणण्याची पद्धत सुरू झालेली आहे.

नरेंद्र मोदी, अमित शहा हे पंतप्रधान व गृहमंत्री, त्याचप्रमाणे पक्षाध्यक्ष जगतप्रसाद नड्डा हे सभा व रोड-शोद्वारे राज्यातील वातावरण ढवळून टाकत आहेत. नड्डा हे बंगालचे जावई आहेत. त्यांचा अपमान राज्यातील कित्येकांना रूचलेला नाही. ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी याला राजकारणात स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून नेमण्याचा प्रयत्न जारी ठेवलेला आहे. बंगलादेशी घुसखोरांना खूश करण्यासाठी ममतादीदीनी दुर्गापूजेवर बंधने लादली. बसंतपंचमीला बंगालमध्ये वाड्यावाड्यांवर सरस्वतीपूजन होते. यावेळेस लादलेली बरीच बंधने राजकीय परिस्थितीमुळे त्यांना मागे घ्यावी लागली. घटनाक्रमाचा एक अपेक्षित भाग म्हणजे मोठ्या प्रमाणात तृणमूल कॉंग्रेसला गळती लागलेली आहे. पक्षाचे अनेक नेते, कार्यकर्ते व आमदार-खासदारही पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल होऊ लागले आहेत.

हा प्रकार चालू असताना दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. दि. २० फेब्रुवारी रोजी भाजपाच्या युवा शाखेच्या प्रभावी कार्यकर्त्या पामेला गोस्वामी यांना त्यांचे सहकारी प्रबीर कुमार डे यांच्यासह ड्रग्स बाळगल्याबद्दल अटक केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पार्टीतील काही नेतेच यामागे असून त्यांना उगीच या प्रकरणात अडकवण्याचा डाव रचला गेला. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी अभिषेक बॅनर्जी व त्यांच्या कुटुंबीयांवर सी.बी.आय.ने छापा टाकून चौकशी सुरू केली.

ममता बॅनर्जी आता तोल सुटल्यासारख्या वागत आहेत. बंगालला बंगाली कन्येची आवश्यकता आहे, असेही वक्तव्य त्यांनी केलेले आहे. केंद्र सरकारचे आदेश धुडकावून बंगाल देशापासून वेगळा असल्याचे वातावरण तयार करणे यासारखे प्रकार सुरू झाले आहेत. मेदिनीपूरमधून निवडून आलेले खासदार व भारतीय जनता पार्टीचे प. बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिटिश राज्यकर्ते ज्याप्रमाणे वंदे मातरम् या घोषणेला घाबरत होते, त्याचप्रमाणे ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष ‘जय श्रीराम’ या घोषणेला घाबरत आहे. घोडामैदान जवळ आहे. देशाच्या मनस्थितीची चुणूक दाखवणार्‍या या निवडणुका आहेत. परिवर्तन हवे म्हणून प. बंगालमधील जनतेने तृणमूल कॉंग्रेसच्या हातात सत्ता दिली होती. परंतु खून, जाळपोळीचे प्रकार थांबले नाहीत. शांततेच्या शोधात असलेल्या बंगालच्या जनतेला होऊ घातलेले परिवर्तन भारतीय जनता पार्टी कसे काय प्रत्यक्षात आणून देईल हेच आता पाहायचे आहे.