तत्त्वज्ञान समजून आचरण करावे योगसाधना – ४९५ अंतरंग योग – ८०

0
190
  • डॉ. सीताकांत घाणेकर

जीवनाची गमावलेली खोली प्राप्त करण्यासाठी मानवाने प्रतीकांची उपासना केली पाहिजे. त्यांच्यामागे लपलेला दिव्य अर्थ समजून घेण्यासाठी त्याने शास्त्रांचे सखोल अध्ययन केले पाहिजे.

विश्‍व फार मोठे, विस्तृत, विशाल आहे. त्याची विविधता हीच त्याची लक्षणीय अशी सुंदरता आहे- अनेक देश, भाषा, जाती, वर्ण, धर्म, संस्कृती- खरेच सृष्टीकर्त्याचे कौतुक करू तेवढे थोडेच. प्रत्येक संस्कृतीत विविध विचार, पद्धती तशीच प्रतीकंसुद्धा. मूळ तत्त्वज्ञान समजण्यासाठी या प्रतीकांचा खूप उपयोग होतो. त्यांचाच सध्या आपण विचार करत आहोत.

अनेक महापुरुष या प्रतीकांमागची पूर्वजांची भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने समजावतात. त्यातील एक म्हणजे वैश्‍विक स्वाध्याय परिवाराचे प्रेरणास्रोत पू. पांडुरंगशास्त्री आठवले. विविध धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचा सखोल अभ्यास करणारे, तदनंतर त्यावर मनन, चिंतन, मंथन करणारे. मग साध्या, सोप्या शब्दात सामान्यांपर्यंत हे कठीण, उच्च तत्त्वज्ञान पोचवणारे.
प्रतीकांबद्दल ते अत्यंत उपयुक्त माहिती देतात-

  • प्रतीक म्हणजे जीवनात खोल उतरण्याची साधना.
    याबद्दल पुढे विवेचन करताना ते विश्‍वाच्या सत्यपरिस्थितीबद्दल सांगतात….
  • प्रवृत्तीमध्ये गळ्यापर्यंत बुडालेल्या आजच्या काळातील प्रत्येक मानवाचा व्यवहार वरवरचा बनला आहे. त्याच्या हास्यात प्रसन्नता नाही किंवा त्याच्या रुदनात अंतःकरणाची खरी व्यथा नाही.
    या वाक्यावर थोडा जरी विचार केला तर जो या विश्‍वात राहतो त्याला हे लगेच पटेल. कारण आजच्या प्रवृत्तीच श्रेष्ठ मानणारा मानव फक्त भौतिकतेकडेच आकर्षित झालेला आहे. स्वार्थच श्रेष्ठ मानल्यामुळे त्याचा व्यवहार वरवरचा म्हणजे दिखाऊ झालेला आहे. त्यातील काहीजण थोडेसे हसतात. पण हे हास्य नैसर्गिक नसते. त्यात कृत्रिमताच जास्त दिसून येते. म्हणून बळेच हसण्यासाठी त्याला ‘‘लाफ्टर क्लब’’ काढावे लागतात. सहज हसणे बंद झाल्यामुळे त्याच्या भावना मनात कोंडून राहतात. त्याचे षड्‌रिपू- क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर… हे सर्व सहज उफाळून येतात. त्यामुळे मनोदैहिक रोग वाढताहेत. अनेकांना या रोगांचा उपाय कसा करावा हे माहीत नाही. करायला वेळ नाही किंवा खर्च झेपत नाही. त्यामुळे मानवता आणखीनच गुदमरते आहे. तात्पुरता उपाय म्हणून तो व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे तो भयानक रोगांना बळी पडतो.

या परिस्थितीमुळे बहुतेक जण रुदनातच आहे म्हणजे रडतच आहेत- सकाळ ते रात्रीपर्यंत, चोवीस तास, वर्षानुवर्षे, जीवनभर ते रडतच असतात. विविध समस्या, संकटे त्यांना रडवतात. पण त्यांच्या या रुदनातच व्यथा कोणती असते ते पाहायला हवे. बहुतेकवेळा स्वतःच्या जीवनातील दुःखामुळे ते असे राहतात. त्यात वावगे काही नाही. पण खरी अपेक्षा असते ती म्हणजे इतरांच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या- विश्‍वाच्या वेदना बघून रडणे. असे फक्त महान आत्मेच करतात. पण आपण प्रत्येकाने विचार करायला हवा की आमचे विचार असे सूक्ष्म, भावनाप्रधान, विस्तृत का होत नाहीत? खरे म्हणजे व्हायला हवेत.
छत्रपती शिवाजी महाराज भारतीयांवर – जास्त करून स्त्रियांवर अत्याचार बघून रडले- त्यांनी मोगलांचा सामना केला. मराठा साम्राज्य स्थापन केले.
हुतात्मा भगतसिंग व त्याचे साथी ब्रिटिशांच्या छळाला कंटाळले. त्यांच्याविरुद्ध उभे राहून देशासाठी बलिदान दिले.
भारताच्या इतिहासात असे अनेक आहेत. ते फक्त रुदन करीत बसले नाहीत तर शस्त्रे उभारून समस्यांचा सामना केला. इतिहासात अजरामर झाले. धन्य ते आत्मे. धन्य ते मातापिता ज्यांनी अशा योद्ध्यांना जन्म दिला व संस्कार दिले.

मानवाच्या व्यवहाराबद्दल सांगताना शास्त्रीजी पुढे सांगतात –
‘‘त्याच्या सेवेत प्रेम नाही की त्याच्या कृतीत तत्परता नाही. त्याच्या अभ्यासात एकाग्रता नाही. त्याच्या संन्यासात विरक्तता नाही, सारांश, त्याच्या जीवनाचा विस्तार वाढलेला आहे, पण त्याने जीवनाची खोली गमावलेली आहे.
खरेच, असे महापुरुष असा विचार करतात. त्यावरच सखोल अभ्यास करतात. कारण त्यांच्या सेवेत प्रेम असते. आत्मीयता असते. म्हणून तत्परतादेखील सहज येते.

संन्यासी म्हणजे अविवाहित अशी सहसा मान्यता असते. खरे म्हणजे त्याच्यात विरक्तता हवी. वैराग्य हवे. वैराग्य म्हणजे सगळे कुटुंब, घरदार, संसार यांचा त्याग करून दूर जंगलात, पहाडावर, हिमालयात जाऊन बसणे नसून ज्याला वैर नाही, राग नाही – ते वैराग्य. हे दोन गुण प्रामुख्याने असणे आवश्यक आहे.
वैर – कुणाबद्दल वैरभाव नाही. जे त्यांच्यावर टीका करतात, जे त्यांना व त्यांच्या कुटुंबाला त्रास देतात, त्यांचा छळ करतात, त्यांच्याबद्दल तोच प्रेमभाव व क्षमाभाव ते ठेवत असतात. संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे बघा. त्यांच्याकडे काही स्वार्थी, तथाकथित ज्ञानी (खरे म्हणजे विपरीत ज्ञानी) कसे दुष्टपणाने वागले. पण त्यांनी सर्वांना क्षमाच केली. सूडबुद्धी, द्वेष, क्रोध… या नकारात्मक भावनांचा लवलेशदेखील नाही.

तसाच येशुख्रिस्त – त्याला तर क्रुसावरच खिळे ठोकून टांगले. त्याआधी त्याचा स्वतःचा क्रूस उचलून डोंगरावर न्यायला लावला. त्याच्याबरोबर गावातील जनता गेली. त्याला भयानक अपशब्द बोलले. पण हा महापुरुष अगदी शांत. उलट क्रूसावर असताना म्हणतो, ‘‘हे देवा, त्यांना क्षमा कर. ते काय करतात हे त्यांनाच माहीत नाही.’’
किती उच्च कोटीची दया व क्षमाभावना ही! उगाच कुणाला माउली, संत म्हणत नाही आणि उगाच कुणाच्या नावाने एक स्वतंत्र धर्म उभा राहत नाही.
मानवतेचे दुर्भाग्य हेच की त्यांच्या अनुयायांनासुद्धा त्यांचे हृदय समजलेच नाही. त्यांच्या जीवनाची, विचारांची खोली समजली नाही.
वैराग्यात दुसरा मुख्य शब्द आहे तो म्हणजे ‘राग’- राग म्हणजे क्रोध नाही. राग म्हणजे आसक्ती- कुणाबद्दलही म्हणजे व्यक्तीबद्दल, वस्तूंबद्दल (सर्व प्रकारची भौतिक संपत्ती, धनदौलत, घर-बंगला-गाडी…)
आम्हाला या कथा, ही उदाहरणं माहीत नाही असे नाही. पण आपण फक्त वरचेवर तरंगत आहोत. खोली प्राप्त करत नाही.

मग, प्रतीक या विषयावर बोलताना शास्त्रीजी काय विचारप्रदर्शन व मार्गदर्शन करतात ते बघुया.
जीवनाची गमावलेली खोली प्राप्त करण्यासाठी मानवाने प्रतीकांची उपासना केली पाहिजे. त्यांच्यामागे लपलेला दिव्य अर्थ समजून घेण्यासाठी त्याने शास्त्रांचे सखोल अध्ययन केले पाहिजे. प्रतीकांमध्ये असलेला भाव ते खालीलप्रमाणे व्यक्त करतात…
१. मनमंदिरात दिवा लावायचा आहे. हृदय- समुद्र- मंथन करायचे आहे.
२. कणामध्ये सृष्टी पाहायची आहे. बिंदूमध्ये सिंधू पाहायचा आहे.
३. दगडात पर्वत पाहायचा आहे.
४. क्षणात शाश्‍वतता पाहायची आहे. निमिषात प्रभू निरखायचा आहे.
५. भाळावरील चमकत्या टिकलीत आकाशातला सूर्य पाहायचा आहे. नेत्रांच्या आर्द्रतेत सागर उसळताना पाहायचा आहे.
६. जीवनाच्या लघुसूत्रात शास्त्रांचा समन्वय पाहायचा आहे.
७. कोमल कृष्ण करंगळीवर गोवर्धन उचललेला पाहायचा आहे.
८. शब्दांनी निर्माण झालेल्या सगळ्या सृष्टीत मौनाचा महिमा पाहायचा आहे.
९. पिंडात ब्रह्मांड पाहायचे आहे. जिवात शिव पाहायचा आहे.
पू. शास्त्रीजींची ही वाक्ये ऐकून व वाचून त्यांच्या तपश्‍चर्येची उंची जाणवते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी नियमित प्रवचनांतून ज्ञानदान, विचारदान अवश्य केले. पण ज्ञानयोगाबरोबरच, भक्तियोग व कर्मयोग केला. संपूर्ण विश्‍वात त्यांनी हजारो गाव- खेडे- शहरातून लाखो स्वाध्यायी तयार केले. त्यांना जीव- शिव यांचे अतूट नाते समजावले. निःस्वार्थ, निरपेक्ष, निराकांक्ष कार्यासाठी प्रवृत्त केले. कार्यान्वित केले. असे हे महान आत्मे. खरेच पुण्यात्मा असतात. त्यांचे अखंड कार्य ईशप्रेरित असते.
मला खात्री आहे की आपण सारे योगसाधकदेखील योगशास्त्राबद्दलचे तत्त्वज्ञान समजून त्याप्रमाणे अवश्य आचरण करीत आहोत. (संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री यांच्या प्रवचनांवर आधारित- संस्कृती पूजन)