आगंतुक पाहुणा

0
116

गोव्यात भाषा माध्यमाच्या तापल्या तव्यावर पोळी भाजायला शिवसेना आगंतुकासारखी पुढे सरसावली आहे. एखाद्याने निमंत्रणाविना पंगतीत घुसावे तसा हा प्रकार आहे. भाभासुमंने नवा राजकीय पक्ष काढण्याऐवजी सेनेला समर्थन दिले तर आर्थिक बाजू आम्ही सांभाळू आणि उमेदवारही परस्पर सहमतीने ठरवू असा प्रस्ताव सेनेने ठेवल्याचे त्या पक्षाचे नेते सांगत आहेत. पण भाभासुमंसाठी सेना हा शेवटचा पर्याय असेल! शिवसेनेचे गोव्यात आगमन होऊन तपे उलटली, परंतु अजूनही या संघटनेला गोव्याच्या जनमानसामध्ये स्थान मिळवता आलेले नाही. गोमंतकीयांची उदारमतवादी मानसिकता हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. द्रष्ट्या स्थानिक नेतृत्वाचा अभाव हेही सेनेच्या या अपयशाचे एक कारण आहे. निष्ठावंतांना संघटनेत स्थिर होऊ द्यायचे नाही, मग कोणालाही कुठूनही आणायचेे, संघटनेच्या शीर्षस्थानी आणून बसवायचे आणि निष्ठावंत शिवसैनिकांना ‘हा तुमचा नेता’ असे सांगायचे हा जो काही पोरखेळ शिवसेनेच्या मुंबईस्थित शिलेदारांनी गेली काही वर्षे गोव्यात चालवलेला आहे, त्यातून त्या संघटनेचा विकास खुंटला. आम आदमी पक्षाचे गोव्यात अगदी अलीकडे आगमन झाले आहे, तरीही त्याकडे जनता अधिक गांभीर्याने पाहते, पण शिवसेना गोव्यात अनेक दशकांपासून असूनही तिच्याकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही याचा विचार सेना नेत्यांना करावासा वाटत नाही. या पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्र वगळता देशाच्या इतर भागांमध्ये जसे केवळ नावापुरते आहे, तसेच ते गोव्यामध्येही असावे एवढाच मर्यादित विचार या नेत्यांनी केला. गोव्यातील शिवसैनिक तर गटातटांमध्ये वाटले, विभागले गेले आहेत. एकमेकांच्या कागाळ्या करणे आणि एकमेकांचा पत्ता कसा काटला जाईल हे पाहणे हेच या संघटनेमध्ये वर्षानुवर्षे चालत आले. अलीकडेच सुदीप ताम्हणकर यांच्या गळ्यात प्रमुखपदाची माळ घातली गेली. निष्ठावान शिवसैनिकांची त्यावर काय प्रतिक्रिया असेल याचा विचार करण्याची जरूरही सेना नेत्यांना भासलेली दिसली नाही. आपल्या संघटनेविषयी जनमत काय आहे त्याचा कानोसा घेण्याची गरज त्यांना वाटत नाही. मुळात या मंडळींच्या मनात भाषेपासून भाजपापर्यंत गोंधळच दिसतो. मध्यंतरी पणजीमध्ये भाजपाचा निषेध करणारी मोठमोठी बॅनर लावली गेली. पण त्याच काळात सेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते आले आणि भाजपाचे गुणगान करून गेले होते. भाषेसंदर्भात सेनेची आज काय भूमिका आहे? मध्यंतरी गोव्यात मगोशी हातमिळवणी करण्यासाठी दारे उघडी असल्याची गर्जना संजय राऊतांनी केली. अहो, तुम्ही दारे उघडून उपयोग काय? दारे मगोने उघडायला हवी होती. मगोने प्रतिसाद न दिल्याने आता गोवा प्रांत संघापाशी शिवसेनेने ‘मला तुमची म्हणा’ असे साकडे घातलेले आहे. पण तिथेही प्रतिसाद शून्य आहे. मुंबईस्थित नेत्यांनी पर्यटकासारखे येऊन येथे निवडणूक जिंकण्याची दिवास्वप्ने पाहायची हे उपयोगी नाही. शिवसेनेची उभारणी करताना बाळासाहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशी भूमिका मांडली आणि त्या दिशेने कार्य करीत ही संघटना रुजवली. गोव्यात सेनेचे समाजकारण शून्य आहे. थेट विधानसभेमध्ये उमेदवार उतरवण्यापेक्षा येथे सातत्यपूर्ण समाजकारण करण्याची आवश्यकता आहे, जनतेचा विश्‍वास कमावणे आवश्यक आहे, हे शिवसेनेच्या नेतृत्वाने आधी समजून घेतले पाहिजे. येथील सामाजिक प्रश्न हाताळले पाहिजेत, आंदोलने उभारली पाहिजेत, तडीला नेली पाहिजेत. हाताळण्यासाठी प्रश्न अनेक आहेत, त्यावर ठाम भूमिका घेऊन उभे राहावे लागेल. केवळ आयती समोर आलेली संधी साधण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर आगंतुकासारखे प्रकटू नये हे यांना कोण सांगणार?