आईची माया

0
233
  • प्राजक्ता गावकर

‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे होते. म्हणून आईचा आत्मा इथे आला होता. हे बाळलोण हो. तुझ्या आईने बाळासाठी आणलेलं.’’

दिवस मावळला. सूर्य लुप्त होऊन चंद्रोदय झाला. तरीही ती तशीच बसून राहिली. गावात… गाव कसलं, खेडंच ते! तर या खेड्यात येणारी शेवटची एसटीसुद्धा येऊन गेली. तरीही तिला भान नव्हतं.
शेजारची मावशी तिला हलवून म्हणाली, ‘‘अगं मालती, ऊठ आता. घरात जाऊन चार घास खा आणि झोप. आज काही सदाशिव यायचा नाही असे मला वाटते. तुझ्या आईला घेऊनच उद्या येईल तो. पोटातल्या बाळाची कीव कर… जा झोप जा! काही लागलं-सवरलं तर हाक मार मला. मी येईन हो’’, मालतीला घरात सोडून मावशी आपल्या घरी गेली.
मालती घरात येऊन चटईवर घोंगडी अंथरून तशीच पडून राहिली. तिला काही खावंसं वाटत नव्हतं. भूकच नव्हती. तिचे डोळे सदाच्या वाटेकडे लागले होते.

तिच्या डोळ्यांसमोर लग्नानंतरचे नव्या नवलाईचे दिवस उभे राहिले. सदा अनाथ होता. त्याच्या दूरच्या मामाने हे लग्न जमवून दिले होते. नक्षत्रासारखी सुंदर, गोरीपान, लांब सडक केसांची मालती सदाला पाहताक्षणी आवडली.
सदाच्या प्रेमात आकंठ बुडून गेली. मालती तशी आईवडलांची एकुलती एक लेक. वडील लहानपणीच वारलेले. घरात फक्त आई आणि ती… दोघीच. आता मालतीचे लग्न झाल्यामुळे आई एकटीच घरी होती.
लेकीचे लग्न झाले आणि वर्ष दीड वर्षात त्यांना ती गोड बातमी समजली. मालतीला दिवस गेले होते. तिच्या आईला तिला कुठे ठेऊ आणि कुठे नको असे होऊन गेले. ती मालतीला खूप जपायची.
सदा कामाला जाताना तिला सांगून जायचा,‘‘हे बघ मालती, मी कामावर जातो. मी येईपर्यंत काहीही करू नकोस. झोपून रहा किंवा शेजारच्या मावशीकडे जाऊन बैस.’’ मालती हसून ‘बरं’ म्हणायची.
आता मालतीचे नऊ महिने भरले होते. भार पेलत नव्हता. घरकाम झेपत नव्हतं. हे सारं पाहून सदा सासूला बोलवायला सासूरवाडीला गेला. त्या आधी चार दिवसांपूर्वी सासूला चिठ्ठी पाठवूनही ती आली नव्हती. म्हणूनच तो आईला घेऊन येतो असे सांगून गेला होता. आई का आली नाही, आजारी बिजारी तर नसेल ना? असा विचार तिच्या मनात आला.

‘‘तिन्हीसांजेच्यावेळी बाहेर जाऊ नकोस. ही वेळ चांगली नसते. यावेळी हडळ फिरते. तिची नजर तुझ्या भरल्या देहावर पडायला नको देऊस.’’ असे तिच्या आईने तिला बजावून सांगितले होते. ते तिला आठवले आणि तिच्या अंगावर त्या हडळीच्या विचाराने सर्रकन काटा आला. तिने कूस परतली आणि त्याच क्षणी ती कळवळून ओरडली,‘‘आई गं!’’ पोटात कळ उठली. उठतच राहिली, या कुशीवरून त्या कुशीवर येतच राहिली.

मालतीने ओळखले, प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या. कशीबशी तिने मावशीला हाक मारली. पण मावशीच्या कानात बहुधा ती हाक शिरलीच नसावी. मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात तिने घड्याळात पाहिले. रात्रीचे साडे अकरा वाजत आले होते. ती पुन्हा उठली. सावकाश एकेक पाऊल टाकत दारापर्यंत येऊन तिने पुन्हा मावशी, मावशी अशा हाका मारल्या.

मावशीला जाग आली. तिने बाहेर येऊन पाहिले मालती बोलावते आहे. एक हात पोचावर ठेऊन एका हाताने भिंतीचा आधार घेऊन कळा देतेय. मावशी लगबगीने आल्या. मालतीला त्यांनी हाताला धरून घरात नेऊन झोपवले.

मालतीला या कठीण काळी नवरा व आई जवळ नाही हे पाहून रडू आले. तिला रडताना पाहून मावशी म्हणाल्या,‘‘रडू नकोस पोरी. मी आहे ना? मी करीन सर्व. सकाळी तुझी आई व सदा येतील. आता रात्रीच्यावेळी दोघं गाडी नाही म्हणून आली नसतील. मी तुझ्यासाठी पाणी गरम करते हो.’’ असे म्हणून मावशी मागीलदारी गेल्या.
समोरचे दार बंद करायचे राहून गेले. इकडे मालती ओरडून, किंचाळून आईला हाका मारत होती. अखेर एक जोरदार किंकाळी मारून मालती हवालदील झाली. मावशीनी पळत येऊन पाहिले. मालतीची सुटका झाली होती. बाळ सुरक्षित आहे. त्यांनी मालतीसाठी खादीची साडी आणायला आपल्या घरी धाव घेतली आणि त्याचवेळी उघड्या दारातून एक उंच काळी अशी बाई दात विचकत घरात प्रवेश करती झाली. ती सरळ मालतीजवळ गेली आणि तिने दात विचकत बाळाच्या नाळेला आपल्या नखांनी तोडले आणि ती घेऊन मागच्या दाराने निघून गेली.

मालतीने त्या बाईला पाहिले. पण काही विचारायच्या मनःस्थितीत ती नव्हती. ती बाई गेली त्या दिशेला मालती पाहतच राहिली. तेवढ्यात बाहेरच्या दारातून तिची आई सुसाट धावत आत आली.
आईला पाहून मालतीने ‘आई… आई…’ अशा हाका मारल्या. आईने तिच्याकडे व बाळाकडे करुण नजरेने पाहिले. दुरूनच तिच्या दिशेने हात फिरवून तिने बोटे आपल्या कानशिलावर कडाकड मोडली. क्षण दोन क्षण मालतीकडे पाहून त्या हडळीच्या दिशेने रागाने पाहून ओरडली,‘‘अवदसे, माझ्या पोरीचा संसार खायला उठलीस काय? थांब तुला दाखवतेच आता.’’ असे म्हणून ती मागीलदारी धावली. तिने चुलीतले जळते कोलीत घेतले आणि पाठमोरी बसून वार खाणार्‍या त्या हडळीच्या मागील बरगडीमध्ये, फासल्यामध्ये घातले. त्याबरोबर हडळ किंचाळत, ओरडत तिथून नाहीशी झाली.

तोवर मावशी आपल्या दोन सुती साड्या घेऊन मालतीजवळ आल्या. मालतीने आई आल्याचे त्यांना सांगितले. मागील दारी गेली आहे असेही ती म्हणाली. मावशी मागीलदारी जाऊन पाहून आल्या. तिथे आई नाही असे त्यांनी मालतीला सांगितले. येतील त्या असेही म्हणून त्यांनी मालतीला व बाळाला आंघोळ घातली व नवीन बिछाना तयार करून त्यांना झोपवले. तोवर दिवस उजाडला.

रात्रीच्या जागरणानेे मालतीचा डोळा लागला. थोडा वेळ गेला. कुणीतरी बोलण्याच्या आवाजाने तिला जाग आली. तिने पाहिले.
तिच्या माहेरच्या गावातील रमेशभाऊ आले होते. ते मावशीला सांगत होते,‘‘काल इकडे यायला सगळी तयारी केली. गोड धोड खाऊ, बाळाला, बाळलोण, जावयाला, मुलीला सर्व भेटी एवढं सर्व करून शेजारच्या घरात सांगून पण आली ‘मुलीकडे जातेय तिचं बाळंतपण करायला. महिना दोन महिने राहणार आहे. घराकडे लक्ष असू द्या.’ आणि दुपारच्या बसला बसली. बस सुटली. चार गाव गेली. पाचव्या गावाजवळ वळणावर उलटली. त्यात मालतीची आई जाग्यावरच गेली.

मालती सर्व ऐकत होती. तिने हंबरडा फोडला. मावशीने पळत जाऊन तिला कुशीत घेतले. मालती आक्रोश करत होती,‘‘आई मला अशी टाकून तू का गेलीस?’’ मावशीला म्हणाली,‘‘मग रात्री मी पाहिले आई घरी आली होती, तिने दारातूनच मला आणि माझ्या बाळाला पाहिले व तशीच ती मागील दारी गेली. मग तुम्ही आल्यावर मी नाही का तुम्हाला सांगितले, आई मागीलदारी आहे. तेव्हा तुम्ही पाहून आलात. मला म्हणालात आई तिथे नाही. मग मला असे का दिसले?
ते ऐकून रमेशभाऊ म्हणाले,‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे होते. म्हणून आईचा आत्मा इथे आला होता. हे बाळलोण हो. तुझ्या आईने बाळासाठी आणलेलं.’’
सदा उद्या सर्व आटोपून येणार. तू जास्त शोक करू नकोस. मी येतो. असे सांगून रमेशभाऊ निघून गेले.