टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

0
181

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल केले.

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालक मागील अकरा दिवसांपासून संपावर आहेत. गोवा माईल्स ही ऍप आधारित टॅक्सी सेवा बंद करण्याची एकमुखी मागणी केली जात आहे. टुरिस्ट टॅक्सीचालकांकडून आझाद मैदानावर आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी निदर्शने केली जात आहेत. या निदर्शनांमध्ये टुरिस्ट टॅक्सीचालकांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेण्यास प्रारंभ केला आहे. गोवा माईल्स ही ऍप आधारित टॅक्सी सेवा बंद करीपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार टुरिस्ट टॅक्सीचालकांनी केला आहे.

टुरिस्ट टॅक्सीचालकांचा विषय वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो हाताळत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
टुरिस्ट टॅक्सीचालकांनी संप मागे घ्यावा. मुख्यमंत्री चर्चेस तयार आहेत, असे कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी काल आवाहन केले. टुरिस्ट टॅक्सीचालकांच्या प्रश्‍नांवरील बैठकीसाठी कुठलीही अट नको, असे वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले आहे. टॅक्सीचालकांची दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही. न्यायालयाने टॅक्सींना मीटर बसविण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचे पालन करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही गुदिन्हो यांनी म्हटले आहे. टॅक्सीचालकांचा प्रश्‍न वाहतूक खाते हाताळत असल्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांनी सांगितले.