अस्मिता आणि रिवाज

0
25

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागांचा कॉंग्रेसच्या माधवसिंह सोळंकींचा विक्रम मोडीत काढून अत्यंत नेत्रदीपक विजय संपादन केला आहे. १९९५ पासून २०१७ पर्यंत भाजपला तेथील सत्ता सातत्याने मिळाली होती खरी, परंतु प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या जागा मात्र कमी कमी होत गेल्या होत्या. १२७ वरून मागील निवडणुकीत ९९ पर्यंत खाली घसरलेल्या भाजपने या निवडणुकीत अभूतपूर्व व ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. अर्थात, समोर तुल्यबळ प्रतिस्पर्धीच उभा नसल्याने हा एकतर्फी विजय भाजपला संपादित करता आला आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या जागा वाढल्या, तरी त्यानंतर त्यांचे बरेच आमदार भाजपने फोडले. गेल्या निवडणुकीत ज्यांच्यामुळे फटका बसला होता, त्या पटिदार, ठाकूर आदी जातींच्या बड्या नेत्यांना आपल्याकडे ओढले. निवडणूक येईस्तोवर कॉंग्रेस तर राहुल गांधींच्या पोरकटपणामुळे गलितगात्रच झालेली होती. त्यात यावेळी ‘आप’च्या आगमनामुळे तिरंगी लढतीचा लाभही भाजपला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजराती अस्मितेप्रतीचे प्रेमही मतदारांनी भरघोस रीतीने व्यक्त केले आहे. गेल्या काही निवडणुकांत कॉंग्रेसच्या जागा ५१ पासून ७७ पर्यंत वाढल्या होत्या, मतांची टक्केवारीही ३३ वरून ४२ वर गेली होती, परंतु पक्षाच्या सध्याच्या निर्नायकी स्थितीत पक्षाने तो जनाधार सपशेल गमावला आहे. त्यातच आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या मतपेढीला यावेळी बर्‍यापैकी खिंडार पाडलेलेही दिसते. २०१७ च्या निवडणुकीत गुजरातमध्ये ज्या आम आदमी पक्षाचे डिपॉझिटही जप्त झाले होते, त्यांनी त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गतवर्षी चांगली कामगिरी करून दाखवली होती. त्या निवडणुकीत ‘आप’च्या मतांची टक्केवारीही १३ टक्क्यांवर गेली होती. यापैकी बरीच मते ‘आप’ने विधानसभा निवडणुकीत टिकवली असल्याचेही हा निकाल सांगतो. आता यामुळे ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचे स्थान प्राप्त झाले आहे आणि हळूहळू कॉंग्रेसच्या पडझडीतून निर्माण होत चाललेली पोकळी भरून काढण्याच्या दिशेने तो पद्धतशीर पावले टाकतो आहे. कॉंग्रेसची पारंपरिक मतपेढी काबीज करू पाहतो आहे.
गुजरातमध्ये विक्रमी विजय संपादन करणार्‍या भाजपला हिमाचल प्रदेशच्या मतदारांनी मात्र जोरदार झटका दिला आहे. दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा ‘रिवाज’ हिमाचल प्रदेशच्या जनतेने यावेळीही इमानेइतबारे पाळला. त्यामुळे कोणतीही विशेष मेहनत न घेता, कॉंग्रेसला तेथे भरघोस जागा आयत्या मिळाल्या आहेत. त्यात कॉंग्रेस नेतृत्वाचे योगदान किती हा प्रश्‍नच आहे. दर पाच वर्षांनी सत्ता उलथवण्याचा हिमाचल प्रदेशच्या जनतेचा हा रिवाज बदलण्यासाठी भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. परंतु ना ती ‘राज नही, रिवाज बदलेगा’ ची घोषणा कामी आली, ना मागासवर्गीयांसाठी केलेल्या घोषणा लाभदायक ठरल्या. गुजरातमधील महाविजयामुळे हवेत उडालेल्या भाजपला हिमाचल प्रदेशने जमीन दाखवली आहे. हिमाचल प्रदेशात भाजपच्या जागा बर्‍यापैकी कमी झाल्या आहेत. अर्थात, काहीही करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रकार भाजपने राज्याराज्यांतून चालवलेला असल्याने हिमाचल प्रदेशमध्ये हाती येऊ घातलेली सत्ता टिकवणे हेच कॉंग्रेससाठी फार मोठे आव्हान असेल. बंडखोरी टाळण्यासाठी आपल्या आमदारांना पक्षाच्या सत्तेखालील छत्तीसगढमध्ये रायपूरला नेण्याची तयारी जरी कॉंग्रेस नेतृत्वाने चालवलेली असली, तरी निर्वाचित लोकप्रतिनिधींना पाच वर्षे आपल्या पक्षात ठेवणे कॉंग्रेससाठी मुळीच सोपे नाही. भाजप हिमाचल प्रदेश कॉंग्रेसकडून हिसकावून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करील. त्यासाठी कोणत्याही थराला जाईल, कारण सध्या राजस्थान आणि छत्तीसगढ वगळता एकाही राज्यात कॉंग्रेसचा मुख्यमंत्री नाही आणि ही दोन्ही राज्ये पुढील वर्षी म्हणजे लोकसभा निवडणुकीआधीच निवडणुकीला सामोरी जाणार आहेत. त्यामुळे देश कॉंग्रेसमुक्त करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये भाजप काही कसर ठेवील असे वाटत नाही. त्यात कॉंग्रेसला या घडीला सक्षम नेतृत्वच नाही. राहुल गांधींचा पोरकटपणा संपता संपत नाही. मल्लिकार्जुन खर्गे नामधारी अध्यक्ष आहेत. त्यामुळे काही झाले तरी आजच्या परिस्थितीत कॉंग्रेस ही बुडती नौका आहे. लोक तिच्यातून धडाधड बाहेर पडत आहेत. गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष जरी पक्षाने निवडला असला तरी त्यातून पक्ष एकसंध बनलेला दिसत नाही. परिणामी, भाजप आपले स्थान अधिकाधिक भक्कम करीत चालला आहे हेच आजचे वास्तव आहे. येणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपला राष्ट्रीय स्तरावर आव्हान देईल असा पक्ष दृष्टिपथात नाही. केवळ प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची राहील.